Sunday, August 1, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ४ !! 🚩🙏🏼


श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे "शिवशाहीर" या बिरुदावलीत कायमच शोभून दिसतात. छत्रपती घराण्याने दिलेली ही पदवी त्यांनी स्वतःच्या नावापूर्वी लावली आणि त्यातच ते समरसून गेले. आज अनेक मान्यवर पुरस्काराने सन्मानित असलेले बाबासाहेब श्रीमंत शिवशाहीर या पदवीने सुवर्णांकित झाले आहे आणि प्रत्यक्ष राजमातांकडून हा सन्मान त्यांना मिळाला आहे. 

१९५८ मध्ये 'राजा शिवछत्रपती' हे त्यांनी लिहिलेले चरित्र प्रकाशित झाले. १९६३ मध्ये छत्रपती राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्याकडून बाबासाहेबांना 'शिवशाहीर' हा सन्मान बहाल करण्यात आला. त्या वेळच्या मानपत्रात म्हटले आहे, "बाबासाहेब आपण शिवरायांचे सारे गडकोट किल्ले प्रत्यक्ष पाहिलेत. आग्रा ते राजगड असा ८५ दिवसांचा पायी प्रवास केलात. पन्हाळा ते विशाळगड अशी भर पावसात इतिहासातल्या त्याच तिथीला दौड केलीत. संशोधन, चिंतन, मनन आणि प्रत्यक्ष दर्शन यांमधूनच आपले लेखन घडत राहिले.'जाळत्या ठिणग्या', 'मुजऱ्याचे मानकरी', 'दख्खनची दौलत', 'प्रतापगड,'लोहगड', 'शिवनेरी', 'आग्रा', 'पुरंदऱ्याची नौबत', 'शिलंगणाचं सोनं', 'महाराज','शेलारखिंड', 'राजा शिवछत्रपती' इत्यादी आपली २५ ग्रंथांची निर्मिती महाराष्ट्र शारदेच्या दरबारास भूषण ठरली आहे. आपल्या लेखणीने आणि वाणीने लाखमोलाचे कार्य केले आहे. शिवचरित्रातून लोकजागृती न  लोकशिक्षण करून आपण राष्ट्रीयत्व, समत्व, बंधुत्व, मित्रत्व आणि ममत्व वाढीस लावलेत." 

बाबासाहेबांचे लेखन व व्याख्यानमाला सुरू होण्यापूर्वी इतिहासाच्या पुस्तकातून, बोलताना,'शिवाजीने शाहिस्तेखानाची बोटे कापली', 'शिवाजीने अफजलखानाचा वध केला','शिवाजीची आगऱ्याहून सुटका' असा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात असे. परंतु बाबसाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्राच्या विशेषत: त्यांच्या व्याख्यानांच्या प्रभावामुळे आता कोणीही तसा एकेरी उल्लेख करणे शक्य नाही, असे म्हणावयास हरकत नाही.

१९६७ च्या एप्रिल महिन्यात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना त्यांनी केली. १९७४ च्या मे महिन्यात मुंबईच्या शिवाजीपार्क मैदानावर त्यांनी भव्य मोठे 'शिवसृष्टी' या नावाचे प्रदर्शन आयोजित केले. असे प्रदर्शन कोणी आजतागायत कुठेही भरविल्याची नोंद नाही. ती 'शिवसृष्टी' पाहण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली. सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत सगळ्यांनी त्याला पसंतीची पावती दिली. न. र. फाटक सरांनी 'शिवसृष्टी चिरस्थायी व्हावी' अशी इच्छा व्यक्त करताना म्हटले आहे, "श्री. ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रेरणेने मुंबईच्या शिवाजी पार्कवर उभारण्यात आलेली भव्य 'शिवसृष्टी' नजरेखाली घालण्याचा योग साधला. या 'सृष्टीत' छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्राचे जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे सर्व पैलू, चित्रे व मूर्तिशिल्प या दोन्ही साधनांचा उपयोग करून दाखविले आहेत. ज्यांना शिवकालीन इतिहासाचे व महाराजांच्या पराक्रमाचे आणि जेथे तो पराक्रम घडला त्या स्थळांचे चांगले ज्ञान असेल त्यांना शिवसृष्टीतील दृश्ये पाहताना आपण शिवचरित्र काळातच वावरत आहेत असे वाटावे इतकी सजीवता शिवसृष्टीच्या उभारणीत नि:संशय आहे व त्यासाठी श्री शिवरायांचे एकान्तिक भक्त श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच होतील. ही सृष्टी पाहत असता मुंबई महापालिकेने अथवा महाराष्ट्र तिचा विस्तार करून या सृष्टीला चिरस्थायी स्वरूप का देऊ नये, असे सारखे मनात येत होते. जी कामे शासनाने करावी अशी कित्येक कामे श्री. बाबासाहेबांनी केली आहेत, त्यातलेच शिवसृष्टी हे एक आहे.भगीरथ प्रयत्नातून उभारलेली शिवसृष्टी आज पाहता आली."

याच सुमारास म्हणजे १९७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या
राज्याभिषेकाला तीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने  'शिवकल्याण राजा' ही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. याबद्दल लता मंगेशकर म्हणतात, "छत्रपतींच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षे झाली. त्यानिमित्त 'शिवकल्याण राजा' ही ध्वनिमुद्रिका काढावयाचे आम्ही ठरविले, ही कल्पना बाबासाहेबांना मनापासून आवडली. त्यांनी या ध्वनिमुद्रिकेच्या बाबतीत करता येईल तेवढी सर्व मदत आम्हाला केली. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या खास शैलीने त्या गीतांना निवेदनहीं जोडले आहे. त्यातून बाबासाहेबांचे वक्तृत्वगुण जसे जाणवतात, त्याप्रमाणे छत्रपतींबद्दलचा आदरभावही शब्दाशब्दात प्रकट होतो.' यामध्ये कुसुमाग्रज, स्वा. सावरकर अशा दिग्गज कवींची दहा काव्ये होती. ही ध्वनिमुद्रिका अत्यंत लोकप्रिय ठरली आणि आजही जगाच्या पाठीवर असलेला मराठी माणूस आवडीने ती सगळी गीते ऐकत असतो. आजही ऐकतांना रोमांच प्रसंगी हळवेपणा ही सहज मनातून जाणवतो. 

लोणावळा येथील 'आय. एन. एस. शिवाजी' या नौदलाच्या संस्थेसाठी पुरंदरे यांनी इंग्रज आणि मराठे यांच्यातील आरमारी युद्धाचा सुमारे पावणेदोन तासांचा ध्वनिप्रकाशयुक्त असा कार्यक्रम तयार करून दिला. 'खांदेरी उंदेरी रणसंग्राम' म्हणून इतिहासामध्ये ते प्रसिद्ध आहे. 

बाबासाहेबांच्या या कार्यानिमित्त त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. अनेक ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला.'चतुरंग' संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा 'जीवनसाधना', कलकत्त्याचा 'हेडगेवार जीवनगौरव', पुण्याचा 'पुण्यभूषण', कोल्हापूरचा 'हुकूमतपन्हा', 'महाराष्ट्रभूषण' 'पद्मविभूषण' यांसारख्या अनेक पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्या पाठीशी आहे. 

शिवशाहीर बाबासाहेबांबद्दल ना. सं. इनामदार म्हणतात, "आजच्या अश्रद्धेच्या काळात स्वत:ला पटलेल्या विषयात झोकून देणारी माणसं दुर्मीळ झालेली आहेत. सोन्यासारखं आयुष्य एकाच ध्यासापायी पणाला लावणारी माणसं आता शोधून सापडत नाहीत. अशा वेळी इतिहासासारख्या रूक्ष विषयात आपल्या आयुष्याचं सर्वस्व पाहणारा एखादा शिवशाहीर लाख मोलाचा ठरतो. तशी शिवाजी महाराजांची बिरुदावली लावणारी माणसं महाराष्ट्रात थोडी का आहेत! महाराजांची जात सांगणारी माणसं गल्लीबोळातून ढिगांनी पडलेली आहेत. मिशीला पीळ भरणारी आणि वाऱ्यावर दाढ्या उडविणारी माणसंही कमी नाहीत. राजकारणात तर शिवाजी महाराज हे चलनी नाणंच झालं आहे. पण ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वानं भारून जाऊन त्यासाठी जिवाचं रान करणारा एकच ब. मो. पुरंदरे आहे."  

आपले गड-कोट,बुरुज-तटबंदी,पागा-अंबारखाना,तोफा-वाटा- पाऊलवाटा-चोरवाटा ,ऐतिहासिक दस्तऐवज जिवापलीकडे गेली १०० वर्षे  जतन करून ठेवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नावाचे  विद्यापीठ आजही पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या पुरंदरे वाड्यात आहे. तिथे गेले की शिवशाहीरांच्या वाणीने कुणीही मंत्रमुग्ध होतो. 

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

No comments:

Post a Comment