श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पैलूंना स्पर्श करतांना पुरंदरे आणि मंगेशकर घराण्याचा स्नेहबंध आज सर्वदूर परिचित आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नजरेतून शिवशाहीरांबद्दल वाचल्यावर उर भरून येतो. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी लता दीदी आवर्जून त्यांना फोन करतात. हे ऋणानुबंध दोघांनीही जपून ठेवले आहे. लता दीदी बाबासाहेबांबद्दल लिहीतात,
बाबासाहेब पुरंदरे हे नाव प्रथम मी केव्हा ऐकले ते आज मला नीटसे आठवत नाही. पण मला वाटते, बहुसंख्य मराठी माणसांप्रमाणे माझाही त्यांच्याशी पहिला परिचय झाला असावा तो त्यांच्या लेखनातूनच. प्रतापगड, राजगड, आग्रा वगैरे नावाने बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचे अतिशय सुंदर चरित्र लिहिले आहे. शिवाय दहा खंडांतून लिहिलेल्या चरित्राच्या द्वारा बाबासाहेबांनी महाराजांचे चारित्र्य, त्यांचे शौर्य, त्यांचे सद्गुण वाचकांच्या मनावर फार परिणामकारक रीतीने ठसवले आहेत. मी ते दहाही खंड मोठ्या उत्सुकतेने वाचून काढले. इतिहासाशी नाते सांगणारी यामुळे हे सर्व खंड अत्यंत वाचनीय झाले आहेत. ते वाचून लेखकाविषयी माझ्या मनात कुतूहल होते. त्यामुळेही बाबासाहेबांना भेटण्याचे औत्सुक्य मला वाटत होते. त्यातूनच कधी तरी पुढे बाबासाहेब पुरंदरे यांचा आणि माझा परिचय झाला. शिवाजी महाराजांबद्दलची परमभक्ती हा बाबासाहेब व माझ्यात एक समान धागा आहे.
गप्पा मारण्याची हौस यामुळे बाबासाहेब पुरंदरेंविषयी आमच्या घरातल्या साऱ्यांनाच एक घरगुती जिव्हाळा, आपुलकी वाटू लागली. परकेपणाचा भाव पुसून गेला. बाबासाहेब हे जणू घरातले, नात्यातलेच एक माणूस असे आम्हा साऱ्यांना वाटू लागले. बाबासाहेब पुरंदरे यांचा आणि माझा परिचय हा असा खूप दीर्घकालीन आहे. ओळख झाल्यानंतर बाबासाहेब आमच्याकडे येऊ-जाऊ लागले. मुंबईला काही कामानिमित्त येणे झाले की बाबासाहेबांची आमच्याकडे भेट ठरलेलीच. माझ्याप्रमाणे मीना, उषा, हृदयनाथ या माझ्या भावंडांशी गप्पा मारण्यातही ते तासन्तास रंगून जात. आम्ही भावंडेही पुण्याला गेल्यावर त्यांच्या घरी जात असू. नंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये एक प्रकारचा घरोबाच निर्माण झाला. पुढे पुढे तर आम्ही त्यांना लहानसहान घरगुती बाबतीत सल्लामसलतही विचारू लागलो. आमच्याकडच्या कौटुंबिक कार्यक्रमात, मंगलकार्यात बाबासाहेब आप्तभावनेने हजर राहात. त्यांचे येणे ही एक सरावाची गोष्ट होऊन बसली.
छत्रपतींची थोरवी महाराष्ट्राला पटवून द्यावी हाच एक ध्यास त्यांना सतत लागलेला असे. त्यासाठी व्याख्याने देणे, लेखन करणे, शारीरिक व आर्थिक झीज सोसणे हे बाबासाहेबांनी सातत्याने चालू ठेवले होते. ते पाहताना मला आश्चर्य वाटे. बाबासाहेबांच्या व्याख्यानांनाही आम्ही सतत जात असू. शिवाजी महाराजांवरचे बाबासाहेबांचे व्याख्यान ऐकणे हा एक अविस्मरणीय, रोमांचकारक असा अनुभव आहे. आमच्या घराबद्दल बाबासाहेबांच्या मनात अकृत्रिम स्नेहभाव असे. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीला ते अनेकदा आवर्जून येतात.
इतक्या वर्षांच्या दीर्घ परिचयानंतर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही विशेष मला अधिकच ठळकपणाने जाणवत आहेत. बाबासाहेबांच्या स्वभावात एक निरागसपणा आहे. कमालीची ऋजुता आहे आणि वागण्याबोलण्यात घरगुती मोकळेपणा आहे. त्यांनी छत्रपतींच्या बाबतीत जे कार्य केलं आहे त्याला खरोखरीच तोड नाही. पण एवढ्या कर्तृत्वानंतरही त्यांच्या मनात अहंकाराचा कुठे स्पर्श झालेला दिसत नाही. किंवा पुढे पुढे येण्याचा हव्यास धरणे, मिरवणे हेही त्यांच्या वृत्तीत नाही. त्यांना खरोखर कसली हाव नाही. त्यांनी इतके लेखन केले, इतकी व्याख्याने दिली, इतके दौरे काढले पण सगळे द्रव्य 'शिवप्रतिष्ठान'साठी खर्ची घातले. आपला काही स्वार्थ साधला नाही. शिवछत्रपतींविषयी बाबासाहेबांच्या मनात जेवढा आदरभाव आहे तितकी शिवभक्ती आजच्या जमान्यात दुर्मिळच.
बाबासाहेबांनी एकदा म्हटले होते, 'माझे सारे जीवन 'शिवाजी या तीन अक्षरात सामावलेले आहे. त्यांचे उद्गार अक्षरशः सत्य आहेत.त्यांच्याकडे पाहताना मला तर अनेकदा असे वाटते की महाराजांच्या सेवेची इच्छा अपुरी राहिलेला त्यांचा कुणी निकटवर्ती सरदारच तर बाबासाहेबांच्या रूपाने पुन्हा जन्माला आला नसेल ना?
बाबासाहेबांची शिवभक्ती, त्यांचे इतिहासप्रेम अगदी लहानलहान गोष्टींतूनही जाणवत राहते. लग्नकार्यात दागिने खरेदी करताना बाबासाहेबांची पसंती विचारली तर ते शिवकालीन स्वरूपाचे, जुन्या डिझाइनचे दागिने हटकून निवडतील. लेखन करतील, व्याख्याने देतील त्यातल्या भाषेचे वळण अस्सल ऐतिहासिक बखरीतल्या सारखे असेल. पत्र लिहितील त्यात 'राजश्रिया विराजित' या मायन्यापासून ते शेवटच्या 'मर्यादेयं विराजते' पर्यंत सर्वत्र ऐतिहासिक पत्रव्यवहाराचा बाज आढळेल. मंदिरे, शिल्पे, चित्रे, कलाकृती, इमारती बघताना त्यामध्ये काही ऐतिहासिक आहे का हे बाबासाहेबांची नजर शोधकपणे न्याहाळीत असते. बाबासाहेबांचे ऐतिहासिकत्व असे सर्वव्यापी आहे. त्याच्याइतका शिवकालात रमलेला, अंतर्बाह्य इतिहास जगणारा माणूस आज महाराष्ट्रात दुसरा कुणीही नाही. शिवाजी महाराजांचे नुसते नाव काढले तरी बाबासाहेबांना विलक्षण उत्साह चढतो.
बाबासाहेबांच्या आत्यंतिक साधेपणामुळे अनेकांना ते भोळेभाबडे वाटतात. त्यांच्या आंतरिक उत्साहामुळे कुणाला त्यांच्या वर्तनात नाटकीपणाचाही भास होतो. पण वस्तुस्थिती तशी नाही. बाबासाहेबांचा उत्साह हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभावच आहे. ते वरकरणी भाबडे वाटले तरी भोळे नाहीत. माणसांची त्यांना चांगली जाण आहे. कोण कोणत्या हेतूने कसा वागतो, कशी
जवळीक दाखवतो हे त्यांना चांगले समजत असते. पण बाहेरून ते तसे दाखवीत नाहीत. सर्वांशी सारख्याच सौजन्याने, भलेपणाने वागतात.
आपल्या आयुष्याचा एक फार मोठा भाग त्यांनी शिवकार्यात खर्ची घातला आहे. आजही त्यांचे शिवप्रेम तितकेच ज्वलंत आहे. असंख्य कल्पना त्यांच्या मनात उचंबळत आहेत. रायगड- प्रतापगडसारखे शिवकालीन किल्ले त्यांच्या पूर्ववैभवानिशी पुन्हा तरुण पिढीला दाखवावेत, सुप्रसिद्ध डिस्ने लँडप्रमाणे 'शिवसृष्टी' साकार करावी अशी स्वप्ने बाबासाहेबांच्या डोळ्यांसमोर आहेत. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील शिवभक्त जनता आणि महाराष्ट्र शासन यांनी मिळून बाबासाहेबांची ही स्वप्ने सत्यसृष्टीत उतरवण्याचे ठरवले तर त्यात अशक्य ते काय ? आपली स्वप्ने मूर्त झालेली बघण्यासाठी बाबासाहेबांना उदंड आणि निरामय आयुष्य द्यावे.
(वयाची साठ वर्षे पूर्ण करून)एकसष्टाव्या वर्षात पदार्पण करीत असतांना भारतरत्न लता मंगेशकर यांनी काढलेले गौरवोद्गार.
✍️ सर्वेश फडणवीस
#शिवशाहीरांची_शंभरी
छायाचित्र सौजन्य - लता मंगेशकर ट्विटर हँडल
No comments:
Post a Comment