Saturday, August 7, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - १० !! 🚩🙏🏼

शिवशाहीर बाबासाहेबांच्या पैलूंबद्दल आपण जाणून घेतांना त्यांच्या छंदांबद्दल वाचलं की आश्चर्य वाटतं. ऐतिहासिक लेखन या छंदासोबत बाबासाहेबांचा आवडता छंद म्हणजे  अश्वपालन अर्थात घोडे पाळण्याचा छंद आहे. लहान-मोठे घोडे बाबासाहेब कायम संग्रही ठेवायचे, त्यांचं पालन- पोषण करायचं, त्यांना प्रशिक्षण द्यायचं, घोड्यावरून रपेट करण्यासाठी आपण स्वतः आपल्या सहकाऱ्यांसोबत मैलोन्मैल लांबपर्यंत जायचं, लहान-मोठ्या युवक- युवतींनाही अश्वारोहणाचं शिक्षण देऊन त्यांच्या स्पर्धा घ्यायच्या हे सर्व उद्योग बाबासाहेबांसारखा इतिहास संशोधक आणि प्रतिभावान ललित लेखक करीत असेल,यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. पण आपल्या छंदासाठी वाटेल तेवढे परिश्रम घेण्याची तयारी आणि त्याबाबतची आवड लक्षात घ्यायची म्हटलं तर हे केवळ बाबासाहेबांनीच करावं असं वाटतं. 

घोडेस्वारी करणे हे भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि लष्कराच्या इतिहासातलं एक अविभाज्य आणि महत्त्वाचं पान आहे. आज जाणवत नसले तरी पण इतिहासकाळात प्रवासाकरिता आणि मुख्य म्हणजे लढायांसाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. मराठी घोडेस्वार हा अटकेपर्यंत जाऊन पोहोचला आणि तोही राजकीय पराक्रमासाठी, ही गोष्ट सामान्य नव्हतीच. आमचे घोडे अटकेपर्यंत गेले होते आणि आपल्या पूर्वजांनी अटकेच्या किल्ल्यावरती मराठी साम्राज्याचे झेंडे रोवले होते याचा अभिमान आजही व्यक्त केला जातो. यामध्ये शूर मावळ्यांचं आणि सहभागी शिलेदारांचं जेवढं कर्तृत्व त्यापेक्षा अधिक घोड्यांचं महत्त्वही लक्षात घ्यायला हवं.

भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात घोड्यांच्या अनेक जाती
आढळतात. छ. शिवाजी महाराजांच्या पदरी विविध प्रकारचे
घोडे होते. पायदळाप्रमाणेच घोडदळ हे सैन्याचं तेव्हाही स्वतंत्र अंग होतं. तोफखाना किंवा हत्तींपेक्षा घोड्याला अधिक महत्त्व होतं. घोडदळ आवश्यक होतं. महाराज आग्र्याला गेले आणि 
औरंगजेबाच्या कैदेत अडकले. तिथून सुटका करून घेतली तो दिवस म्हणजे श्रावण वद्य द्वादशी,१७ ऑगस्ट, १६६६. ऐन पावसाळ्याचे दिवस आणि छत्रपती राजगडावर पोहोचले १२ सप्टेंबरला. म्हणजे २५ दिवसांत. हा प्रसंग बाबासाहेबांकडून ऐकणं म्हणजे अंगावर अक्षरशः शहारे येतील इतकं सुरेख वर्णन बाबासाहेब करतात. अस्मादिकांनी स्वतः हा अनुभव घेतला आहे. घोड्यांचं महत्त्व त्या काळात किती होतं. ते महाराजांनी अचूक ओळखलं होतं आणि बाबासाहेबांनी छंद म्हणून घोडेस्वारी केली आहे. 

घोडा जसा धावतो तसा अडतोही," असं सांगून बाबासाहेब
म्हणतात की, "झाशीच्या राणीच्या अगदी शेवटच्या काळात
घोडा अडला आणि त्या वेळी कराव्या लागलेल्या लढाईत राणी भयंकर जखमी झाली. त्यातच या महान स्त्रीचा शेवट झाला. महाराणा प्रताप हे हळदीघाटीच्या लढाईत पराभूत झाले हे खरंच, पण बचावले तेदेखील एका घोड्यामुळेच."इतकंच काय, पण घोडा आणि कुत्रा यांच्याइतके विश्वासू आणि प्रेमळ प्राणी माणसाच्या जीवनामध्ये क्वचितच आढळतील असंही ते आवर्जून सांगतात.

घोडे उत्तमरीत्या सांभाळण्याबाबत महाराजांनी दिलेली
आज्ञापत्रंही सापडलेली आहेत. घोड्यांना वेळच्या वेळी
खायला घाला, त्यांची नालबंदी व्यवस्थित झाली पाहिजे,
त्यांची औषधं वेळेवर द्या, अशा आशयाचा त्यात उल्लेख
आहे. बाबासाहेबांच्या घरी पण घोडे होते. बाबासाहेबांना तर लहानपणापासूनच घोड्यावर बसण्याची आवड होती. तसे ते बसलेलेही होते, मात्र उत्तमपणे घोड्यावर बसणं अजूनही आपल्याला जमलं नाही असं ते नम्रपणे म्हणतात. 

घोड्यावरून नियमितपणे फिरणारे बाबासाहेब घोड्यावरून पडले आहेत. कारण घोडा हा फार हुशार प्राणी आहे. आपल्या पाठीवर बसलेला माणूस नवखा आहे की जाणकार, हे तो क्षणभरात ओळखतो. काही वर्षांपर्यंत बाबासाहेबांनी सुमारे १५ घोडे सांभाळले. पर्वती पायथ्याशी असलेल्या पुरंदरे वाड्याच्या सध्याच्या पार्किंगच्या ठिकाणी यापैकी काही घोडे बांधलेले असत. त्यामुळं बाबासाहेबांचं घर लगेचच ओळखता येई.

१९७९ च्या दरम्यान घोड्यांच्या खरेदीसाठी बाबासाहेब मुद्दाम पुण्याहून सारंगखेडला गेले होते. प्रत्येकी सात हजार रुपयांना एक याप्रमाणं एक पंजाबी आणि एक काठेवाडी अशी दोन घोडी त्यांनी खरेदी केली. 'समीर' आणि 'समशेर' अशी त्यांची नावं ठेवण्यात आली. बाबासाहेबांचे हे फारच लाडके घोडे होते. 'समीर हा तर तांबडा देवमणी घोडा. बाबासाहेब घरातून निघताना किंवा ते घरी परतल्यावर तो खिऽऽखिंऽऽ असा आनंदानं खिंकाळत असे. कितीही गडबडीत असले तरी ते त्याच्याजवळ जात, त्याला थोपटत. पाठीवरून प्रेमानं हात फिरवत. मगच त्यांचं पाऊल पुढं निघायचं. त्याला त्यांचा अन् बाबासाहेबांनाही 'समीर'चा लळा लागला होता.

हा ‘समीर' घोडा एकदा पर्वतीच्या पायथ्याशी घसरून पडला, तो विकत घेतल्यानंतर सुमारे ४ वर्षांनंतरची म्हणजे १९८३ च्या दरम्यानची ही घटना असावी. पडल्यामुळे त्याचा एक पाय घोट्यात मोडला होता. पुण्यातील रेसकोर्सवरील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले बाबासाहेबांनी औषधोपचारासाठी बराच खर्च केला. रोज स्वतः ते त्याच्या मुखात गूळ, पेढे भरवत असत. परंतु त्याच पाय बरा होणं शक्य नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांना खूप वाईट वाटलं. रेसचा घोडा निरुपयोगी झाला की, त्याला बंदुकीनं गोळी मारून ठार करतात, त्याप्रमाणं या घोड्याचं करावं असा सल्ला एका व्यक्तीनं बाबासाहेबांना दिला.वाक्य ऐकताच त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. काही न बोलताच ते घरात निघून गेले. 'समीर' वर उपचार चालूच ठेवले, त्यातून तो थोडा बराही झाला. मात्र घोडदौडीच्या दृष्टीनं त्याचा आता काहीच उपयोग होणार नव्हता तरीही बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाचाच एक सदस्य या मायेनं त्याचा शेवटपर्यंत सांभाळ केला. पुढे वृद्धापकाळान तो मरण पावला. त्या दिवशी त्याच्या कलेवरावरती बाबासाहेबांनी भारीपैकी जरीची शाल पांघरली, त्याला हळद-कुंकू वाहिलं, हार घातला आणि वाकून नमस्कार करून अखेरचा निरोप दिला.  त्या दिवशी बाबासाहेब जेवलेच नाहीत. आजही त्या पाड्याची आठवण निघाली की, आपल्या एखाद्या नातेवाईकाच्या स्मरणानं व्याकूळ व्हावं तसं ते व्याकूळ होतात. आजही दिग्विजय प्रतिष्ठानसारख्या ज्या अश्वारोहण संस्था कार्यरत आहेत, त्यांना बाबासाहेब आवर्जून प्रोत्साहन देत असतात, मार्गदर्शन करत असतात. आंबेगाव येथील शिवसृष्टीत घोडेस्वारी सुरू झाली आहे. 

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात आणि स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही देतात. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#शिवशाहीरांची_शंभरी 

छायाचित्र सौजन्य - बेलभंडार मधून साभार

No comments:

Post a Comment