शिवशाहीर बाबसाहेबांच्या विविध पैलूंबद्दल आपण जाणून घेतोय. आज त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवडता विषयावर जाणून घेणार आहोंत तो म्हणजे व्याख्यान..
मराठी भाषेच्या आणि वक्तृत्वाच्या इतिहासात बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे हा एक स्वतंत्र विषय मानावा लागेल. गेली पाच तपे हजारोंच्या संख्येने मराठी माणसे बाबासाहेबांच्या व्याख्यानांना हजर असतात. शहरे,खेडी,सहकारी कारखाने, वाड्या, वस्त्या यातून व्याख्यानाच्या दिशेने माणसांची रीघ लागलेली दिसते. आजच्या काळात तिकिटे ठेवून व्याख्यानमाला चालणे कठीण, अशाही काळात आठ-आठ, दहा-दहा हजार श्रोते सात दिवसांच्या व्याख्यानमालेला नियमित येतात, ही पुरंदरे यांच्या वक्तृत्वाला निळालेली सार्थ अशी पावती आहे. तीच ती व्याख्याने पुन:पुन्हा ऐकवण्याचा आग्रह त्यांना होत असतो. ही गोष्ट व्याख्यानांच्या बाबतीत दुर्मीळ आहे. त्यांच्या वक्तृत्वाने प्रादेशिक सीमा ओलांडल्या आहेत. त्यांच्या व्याख्यानांनी दुबई, अमेरिका, इंग्लंडपर्यंत विक्रम केले आहेत. त्यांच्या वक्तृत्वाचा लाभ तीन पिढ्यांना झाला आहे. शिवाय ध्वनिमुद्रणाच्या रूपाने जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचलेला आहे नव्हे या तांत्रिक युगात पोहोचत राहील. बाबासाहेबांची ही वक्तृत्वकला त्यांनी लहानपणापासून ऐकलेल्या व स्वत: केलेल्या कीर्तनातून उदयास आली आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती'चे लेखक म्हणून जशी रूढ ओळख आहे, त्याचप्रमाणे त्यांचा अधिकतर लौकिक 'शिवशाहीर' असा आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बाबासाहेबांनी इतर व्याख्याने वगळता फक्त शिवचरित्रावर सुमारे बारा हजार व्याख्याने दिलेली आहेत. त्यांची ही व्याख्याने म्हणजे नेपथ्याविना केलेला 'एकपात्री प्रयोग' म्हणता येईल. त्यातील अभिनय,
त्याचप्रमाणे त्यांच्या लिखित व्याख्यानांचा वाङ्मयीन अभ्यास करण्याचा प्रयत्न येथे केला आहे. त्यांनी इतिहासावरचे शेकडो ग्रंथ वाचले, हजारो कागदपत्रे चाळली. ऐतिहासिक तपशिलाच्या बाबतीत सदैव दक्ष असल्यामुळे त्यांचे प्रत्येक विधान हे साधार असते. ते गडकोट पायी फिरले. एकेक गड अनेक वेळा चढले-उतरले. कसली प्राप्ती नाही; कोणाकडून अनुदान नाही. रक्त आटवीत मनाच्या तडफडीने ते कशाचा तरी शोध घेत, वेध घेत भ्रमंती करीत राहिले. व्यासंगाने आणि एका जीवननिष्ठेने काठोकाठ भरलेले बाबासाहेबांचे मन हे त्यांच्या वक्तृत्वाचे उगमस्थान मानावे लागेल.
शिवचरित्र गाताना त्यांच्या वाणीतून वैनगंगा, पैनगंगा, बाणगंगा, गोदा, कृष्णा, पूर्णा आणि इंद्रायणी या महाराष्ट्राच्या गंगा त्यांच्या जिव्हेतून दूधसागराप्रमाणे फेसाळत बाहेर पडत आहेत की काय, असा साक्षात्कार होतो. शिवरायाच्या अथांग पराक्रमाचा इतिहास मराठी लोकांच्या अंगणापर्यंत पोहोचवला पाहिजे, हृदयापर्यंत धडकला पाहिजे, इतकेच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे हाच त्यांचा अट्टहास आहे.
१९५४ च्या नोव्हेंबर महिन्यात पुस्तकविक्रीसाठी बाबासाहेब नागपूरला आले होते. तिथे राजाराम सीताराम दीक्षित ग्रंथालयात त्यांचे व्याख्यान झाले. तेच त्यांचे पहिले सार्वजनिक व्याख्यान. त्यानंतर मात्र व्याख्यानांच्या भरतीची लाट त्यांना थोपविता आली नाही. अनेक विक्रम करत आणि ते मोडत त्यांनी आत्तापर्यंत सुमारे बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत.
शिवजन्मपूर्वकाळापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा काळ घेऊन त्यावर सलग सात दिवस रोज दोन तास याप्रमाणे त्यांची तिकीट लावून व्याख्याने असत. एका वेळी सुमारे ५ ते ७ हजार श्रोतृसमुदाय त्या व्याख्यानाला हजर असे. या व्याख्यानाला बाबासाहेब स्वत: तिकीट काढून जात. या व्याख्यानमालांतून जमा झालेले कोट्यवधी रुपये त्यांनी शैक्षणिक संस्था, रुग्णालयांना दान केले.
यशवंतराव चव्हाण याबद्दल म्हणाले होते,"शिवचरित्र त्यांच्या वाणीतून निथळत असे. पैसे देऊन व्याख्यान ऐकणं ही नवीन परंपरा त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केली. सतत पंचवीस वर्षं एकाच विषयाचा ध्यास घेऊन कार्य करीत राहणारी माणसं कमी आढळतात. त्यात बाबासाहेबांचं नाव अग्रभागी राहील. विषय एक आणि वक्ताही एक अशी साठ वर्षे व्याख्याने देण्याचा त्यांनी केलेला विक्रम अपूर्व आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहास जागरणापूर्वी थोडा काळ अगोदर नागपूरच्या बाळशास्त्री हरदासांची भाषणे महाराष्ट्रात गाजत राहिली. स्वत: बोलत बोलत इतरांना जो बोलते करू शकतो, तो खरा वक्ता! बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानात तल्लीन श्रोत्यांचा सहभाग मोठा असतो. त्यांच्या वक्तृत्वाबद्दल ना. सं. इनामदार म्हणतात, "गेली पंचवीस वर्ष बाबासाहेब आपल्या अमोघ वाणीनं शिवचरित्र महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत पोहोचवीत आहेत. दहा-दहा हजारांच्या सभा त्यांचं वक्तृत्व मंत्रमुग्ध होऊन ऐकत आहेत, राजकारण्यांनी हेवा करावा असा प्रचंड लोकसमुदाय बाबासाहेबांचे शब्द ऐकण्यासाठी आसुसलेला असतो. अखिल हिंदुस्थानात जिथं जिथं मराठी माणूस आहे, तिथं तिथ बाबासाहेबांनी शिवचरित्र कथन करून मराठी अस्मिता जागी केली आहे."
शिवाजीराव भोसले यांनी त्यांच्या व्याख्यानांचे कौतुक करताना म्हटले आहे की, ''एका व्यक्तीने एकाच विषयावर हजारो व्याख्याने दिली, हे स्पृहणीय आहे. बाबासाहेब पुरंदरे! एक व्यक्ती की संस्था हे उमगत नाही. व्यक्ती म्हणावे तर कार्य महाराष्ट्रभर विस्तारले आहे. संस्था म्हणावे तर तिला शाखा नाहीत, एका खांबावर उभी असणारी वर्तमानकालातील ही द्वारका आहे. जे पेरले ते उगवते असे म्हणतात; पण याला एक अपवाद आहे. बाबांनी इतिहासाचे वेड पेरले आणि त्यातून ऐतिहासिक जाणिवांनी बहरलेले राष्ट्रप्रेमाचे मळे उभे राहिले. या महाराष्ट्रभूमीस असा मुलखावेगळा माळी भेटावा ही भाग्याची बाब म्हटली पाहिजे. बाबा म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साक्षात सर्वज्ञता. पण या सर्वज्ञतेने पांडित्याची वस्त्रे परिधान करणे नाकारले. डफावर थाप देऊन देश जगविणाऱ्या शाहिराची वसने त्यांनी पसंत केली. परमपवित्र अशा सगुण चरित्राची चैतन्यशाली शाहिरी करायची ती बाबांनी शाबास,शाहिरा शाबास इतिहासानेसुद्धा तुला मुजरा करावा एवढा मोठा माणूस तू या सत्वहीन, तत्त्वहीन जगात शिवतत्वाचा जागर करीत रहा, तुझ्या या जागरणाला महाराष्ट्राची सारी दैवते जातीने हजर राहतील, तुझ्या शिवकथेत... न्हाऊन निघालेला महाराष्ट्र आपल्या तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती घडवील आणि खंडतुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंदवनभुवनाचे ऐश्वर्य प्रदान करील हे सर्व घडावे, यासाठी, हे इतिहासपुत्रा, शतायुषी हो।"
बाबासाहेबांच्या भाषणात व्यासंग तर आहेच पण लालित्य आहे, सतत झुळझुळत वाहणारा विनोदाचा प्रवास आहे आणि या सगळ्यांचा पाया आहे राष्ट्रीय पुनरुत्थानाचा विचार. ही शिवचरित्राची गाथा जो जो कोणी वाचील तो तो उचंबळून येईल, थरारून जाईल आणि त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची ठिणगीही
त्याच्या मरगळलेल्या मनात पडेल.
या व्याख्यानामागील दृष्टिकोन त्यांच्याच शब्दात सांगायचा
झाल्यास तो असा सांगता येईल. "छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि एकूणच शिवकाल यांच्याकडे आपण डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. केवळ भावनेच्या आहारी जाऊन जयजयकारात गुंतून पडण्यात काही अर्थ नाही महाराज हे युगपुरुष होते. पण आपण त्यांना देव मानू लागलो. त्यांची पूजा
करतो. एकदा देवत्व बहाल केले की आपले काम झाले असे आपल्याला वाटते. शिवचरित्रातील प्रेरणादायक प्रसंगांच्याही पलीकडे जाऊन आपण शिवाजी महाराजांच्या विचारांचा, विवेकाचा, श्रद्धांचा आणि मूल्यनिष्ठेचा शोध घेतला पाहिजे. हार, तुरे, पालख्या आणि पुतळे यांतच गुंतून पडण्यापेक्षा शिवचरित्रातील विचारधनाचे अनुकरण व आचरणच आज गरजेचे आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#शिवशाहीरांची_शंभरी
No comments:
Post a Comment