Tuesday, August 3, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ६ !! 🚩🙏🏼

श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले 'राजा शिवछत्रपती' हे शिवचरित्र अत्यंत लोकप्रिय ठरले. आजही अनेकजण त्याची पारायणं करतात.१९५८ मध्ये लिहिलेल्या या शिवचरित्राच्या वीस हुन अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या आहे. बाबासाहेबांच्या शिवचरित्राला एवढी प्रचंड लोकप्रियता लाभण्याचे पहिले कारण अर्थातच शिवरायांसारखा चरित्रनायक हेच आहे. शिवचरित्राचे लेखन करताना इतिहासाशी प्रामाणिक राहून त्यांनी लेखन केले. महाराष्ट्रातल्या तरुणांना नवीन इतिहास निर्माण करण्याची प्रेरणा या शिवचरित्रातून मिळाली पाहिजे, या एकाच निर्धाराने त्यांचे लेखन झाले आहे. 

शिवचरित्र लिहिताना नवनवोन्मेषशालिनी महाराष्ट्रशारदा जणू काही त्यांच्या सर्वांगात संचारलेली आहे असे वाटते. हे शिवजन्माचे आख्यान मांडताना चंडमुंडभंडासुरखंडिनी जगदंबा, उदंडदंड महिषासुरमर्दिनी दुर्गा आणि महाराष्ट्रधर्मरक्षिका तुळजाभवानी ह्याच जणू आपल्या आशीर्वादाचे हात त्यांच्या डोक्यावर धरून उभ्या आहेत असा भास होतो आणि हेच आशीर्वादाचे संचित त्यांच्या लेखणीची ताकद असावी असे वाटते. शिवचरित्रापेक्षा महाराष्ट्राला अधिक पवित्र, अधिक मादक किंवा अधिक उत्तुंग असे काही नाही. हिमालयाची उंची, गंगेची विशालता आणि काश्मीरचे सौंदर्य शिवचरित्रावरून ओवाळून टाकावे, एवढी त्याची योग्यता आहे.

'राजा शिवछत्रपती' या चरित्रलेखनामागची स्वत: बाबासाहेबांची भूमिका काय होती? ते सांगतात, ''शिवचरित्र हे कुणा एका व्यक्तीचे चरित्र नाही. ते चरित्र म्हणजे राष्ट्रधर्म आहे. समाजधर्म आहे. शत्रूशी कसे वागावे आणि स्वराज्यासाठी, सुराज्यासाठी मित्राच्या जिवाला जीव कसा द्यावा हे सांगणारे ते एक शास्त्र आहे. तत्त्वज्ञान आहे. विद्वत्ता गाजविण्यासाठी आणि शाली-मशालीचा मान मिळविण्यासाठी ही अक्षरे मी लिहिलेली नाहीत. मी हे शिवचरित्र एका सूत्रान्वये लिहिलेले आहे. "शिवाजीराजा.... एक प्रेरक शक्ती' हे ते सूत्र होय."

छत्रपती सुमित्राराजे भोसले लिहितात, ''साहित्यिक जर व्रतस्थ
आणि महत्त्वाकांक्षी बनतील तर राष्ट्रही व्रतस्थ आणि महत्त्वाकांक्षी बनेल." हे वाक्य जणू बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणारे आहे. पुढे त्या लिहितात, "ही साहसकथा चितारण्याच्या मागे बाबासाहेबांच्या मनातील हेतू..तरुणांच्या मनात साहसांची आवड निर्माण व्हावी हा आहे. त्यासाठी आधी त्यांनी स्वत: रायगड आणि सर्वच किल्ले अनेक वेळा चढले-उतरले. हा उद्योग कशासाठी तर आपले लेखन आणि वक्तृत्व जिवंत आणि प्रत्ययकारी व्हावे यासाठी!" बाबासाहेबांच्या लेखनामागील त्यांची भूमिका म्हणजे त्यांचे बोलके वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वच होय.

गो. नी. दांडेकर 'राजाशिवछत्रपती' या चरित्राबद्दल लिहितात, ''बखरींचा अभ्यास तर अनेकांनी केला आहे. पण आज शब्दकळा कुणाजवळ? बाबाचे शिवछत्रपती वाचू लागावे, तर भरजरी पाटाव नेसलेली, कानी-नाकी अलंकार ल्यालेली, वज्रचुडा पहेनलेली, कुण्या कुळवंताची कुळवंतीच हाती नीरांजन घेऊन उभी आहे, असा भास होऊ लागतो. बाबाने अवघ्या बखरी वाचल्या आहेत. अवघे शिवचरित्रसाहित्य साक्षेपाने, पदरमोड करून धांडोळले आहे आणि मग एक नवी लखलखीत, तेजाने पुंजाळलेली समप्रमाण बखरच लिहिली आहे! धन्य आमची पिढी, की तिच्यात बाबासारखा बखरकार जन्मास आला!"

बाबसाहेबांच्या लेखनाबद्दल  पु. ल. देशपांडे आपल्या 'गणगोत'
या पुस्तकात म्हणतात, ''इतिहास हा आम्ही हातच्या कागदपत्रा इतक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांवर सोपवलेला विषय समजतो, रुमालात बांधून ठेवायचा,वर्गातही विद्यार्थ्यांच्या अंगी तो न लागता घोकंपट्टीत घुसवायचा . अशा वेळी शिवचरित्राच्या रूपाने त्या इतिहासाचे पाठ लोकमानसात नेऊन सोडणाऱ्या पुरंदरे यांचे खूप कौतुक व्हायला हवे होते. त्यांनी इतिहासकाराची पंडिती पगडी चढवली नाही. कुणाही पंडिताने धन्योद्गार काढावे इतका अभ्यास केला आणि मांडला मात्र गद्य शाहिरासारखा, त्या चरित्राला ते आधारपूर्वक लिहिलेली बखर म्हणतात, "इतिहास हा माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळण्यापर्यंत गेला पाहिजे. इतकंच नव्हे, तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे," असे म्हणणारा हा इतिहासकार मला तरी आमच्या आजवरच्या भारतीय इतिहासकारांपेक्षा एक निराळी- लोकशाहीला अत्यंत पोषक अशी- भूमिका घेऊन उभा राहिलेला दिसतो. ह्या माणसाचे इतिहास संशोधन भोवतालची ओजहीन, जिद्द नसलेली, मरगळलेली समाजपरिस्थिती पाहून उठलेल्या वेदनेतून झाले आहे आणि म्हणूनच संशोधनाने इथे साहित्यकलेच्या क्षेत्रात मानाचे पान मिळवले आहे. हा बखरकार आहे. इतिहासकार आणि बखरकार ह्यांच्यात वेदान्ती आणि कीर्तनकाराइतकाच फरक असला तरी शेवटी कीर्तनकारच तो वेदान्त लोकांपुढे संतांच्या सोप्या उत्तरांनी मांडीत असतो, वेदान्ती अभ्यासात रंगतात, कीर्तनकार निरूपणात! बाबांची भूमिका निरुपणकाराची आहे; पण कथांना भाकडकथांची जोड देणाऱ्या कथेकरी बुवाची नाही. शिवरायांविषयीच्या भावना त्यांनी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर घासून अधिक तेजस्वी केल्या आहेत.

बाबासाहेबांच्या मनोगतातून त्यांचे लौकिक आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतले मर्म उलगडत जाते. ते मनोगत असे आहे, "मी इतिहासाचा एक लहानसा विद्यार्थी आहे. हा शिवशाहीचा इतिहास मी महाराष्ट्र रसात महाराष्ट्राच्या कडेपठारांवर गात हिंडतो आहे. इतिहास हा पाचवा वेद आहे पण मी वेदांती नाही. मी विद्वान नाही. मी गोंधळी आहे. मी इतिहासकार नाही. अभ्यासपूर्वक इतिहास गाणारा मी एक शाहीर आहे. मी बखरकार आहे, इतिहासाचा अभ्यास मांडणे आणि इतिहासाचा उपयोग सांगणे ही या पाचव्या वेदाच्या वैदिकांची मुख्य कामे असतात. या इतिहास वेदाचा अभ्यासपूर्वक व पथ्यपूर्वक उपयोग करण्याचे व्रत घेतलेला मी एक कलावंत आहे. मला माझ्या व्रताची अतोनात आवड आहे, हौस आहे. अभिमान आहे. मी या पुण्यात जन्मलो, रांगलो, खेळलो. या पुण्यातील मंडईत गाणाऱ्या गोंधळ्यांचे पोवाडे ऐकले. भजने, लळिते, मेळे आणि लावण्या ऐकल्या. मी त्यात रंगलो. तो रंग माझ्या अंत:करणावर पडला, तो पक्काच जडला. माझ्या तनमनाला लागलेला खंडोबाचा भंडारा, भवानीचा मळवट, ज्ञानेश्वर- तुकारामांचा अबीरबुक्का आणि मंडईच्या गणपतीचा अष्टगंध गुलाल, मी साती समुद्राच्या पार पोहून गेलो-आलो असलो तरी थोडासुद्धा धुतला जाणार नाही. पुढे ते म्हणतात, ...या वेळी आणखी एक विचार मनात येतो, की हे जग सोडून आपल्याला केव्हातरी जायचे असते आणि मग आपल्याबरोबर काय येते? इमले, बंगले, गाड्या, धनदौलत, सोने-नाणे सारे सारे काही इथे राहते, असे असताना मग समाजऋण फेडण्याची कसूर का करायची?

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

No comments:

Post a Comment