बाबासाहेबांच्या वाढणाऱ्या वयाबरोबर त्यांचा काम करण्याचा उत्साहही वाढणाराच आहे. या वयातील त्यांचा उत्साह तरुणाईला लाजवेल असाच आहे. कारण शिवसृष्टी चे स्वप्न बघितलेल्या बाबासाहेबांनी ते पूर्णत्वास नेण्यासाठी जगभ्रमंती केली आणि जे जे उत्तम उदात्त उन्नत या न्यायाने सर्वोत्तम असे सारे शिवसृष्टीत आपल्याला बघता यावे यासाठी त्यांचा सततचा ध्यास मंत्रमुग्ध करणारा आहे. पुणे-बंगलोर महामार्गावरील ही शिवसृष्टीदेखील पुण्याचं आणि महाराष्ट्राचं वैभव ठरणार आहे. पुण्याजवळ आंबेगाव येथे त्यांना भव्य स्वरूपात शिवसृष्टी उभी करायची आहे आणि त्याचे १/४ कामही झाले आहे. त्याबद्दल ते म्हणतात,
''माझी भविष्यात काही स्वप्नं आहेत. ती भव्य-दिव्य आणि अफाट आहेत असं म्हणावं लागेल. भव्य तटबंदी असलेला आणि सर्व ऐतिहासिक वैशिष्ट्यं असलेला एक भला-थोरला किल्लाच उभारायचा आणि त्यामध्ये शिवकालीन एका नगराचीच उभारणी करायची असा हा प्रकल्प आहे. तटबंदी, बुरुज, अश्वारोहण केंद्र, व्यायाम शाळा, सिंधुदुर्ग देखावा,खिंड-घाट, लोककला केंद्र, नगारखाना, पालखी दरवाजा, महादरवाजा, बाजारपेठ, पुष्करणी तलाव, वस्तुसंग्रहालय, शस्त्रसंग्रहालय, ध्वनी-प्रकाश योजना, ग्रंथालय,अभ्यासकांसाठी वसतिगृह अशा स्वरूपातील या शिवसृष्टीमध्ये येणाऱ्या शिवभक्तांना अगदी शिवकाळच अनुभवता यावा हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे. इथं दसरा होईल तो शिवकालीन. त्या वेळची जीवनपद्धती इथं सजीव स्वरूपात पाहता यावी, अनुभवता यावी, आपला वैभवशाली इतिहास अन् वारसा नव्या पिढीनं न्याहाळावा आणि त्यांच्या तो जगण्यात उतरावा ही या साऱ्या योजनेमागची तळमळ आहे. सुमारे ९० कोटी रुपयांची ही योजना होती. महागाईने खर्चाच्या अंदाजपत्रकात नेहमीच वाढ होत असते. पण वृक्षारोपण, अश्वारोहण केंद्र इथं सुरू झालं असून पहिल्या टप्प्यातील किल्लेदाराच्या वाड्याचं कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
वॅक्स आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण शिवचरित्र लोकांपुढे मांडायचं आहे. अमेरिकेतल्या 'डिस्नेलँड' सारखी ही शिवसृष्टी असावी, महाराजांच्या बारश्यापासून त्यांच्या निधनापर्यंतचे सारे प्रसंग, घटना आणि विचार त्यातून सर्वांना पाहता यावेत अशी त्यांची इच्छा आहे. शिवकालीन मुलांची खेळणी कशी होती? त्या वेळचे पोषाख कसे होते ? आपले पूर्वज जगले कसे, राहिले कसे, त्यांनी पराक्रम कसा गाजवला, त्यांचे स्वभाव कसे होते, त्या वेळच्या दरबाराचं काम कसं चालायचं, युद्ध कशी व्हायची ? हे सारं सारं आपल्या मुलाबाळांनी पाहावं, त्यांनी थेट शिवकाळातच जाऊन काही काळ जगावं अशी ही भव्य शिवसृष्टी उभारायची झाली तर कमीत कमी २०० एकर जमीन आणि हजारो कोटी रुपयांचं धन लागेल. हा एवढा ऐतिहासिक वारसा आणि बाबासाहेबांसारखा स्वप्नयोगी इतिहासकार युरोप,अमेरिकेत असता तर असे प्रकल्प केव्हाच साकारले असते. आपल्याला याचं राष्ट्रीय महत्त्व ओळखायला, समजायला,जाणवायला आणि मग कृतीत आणायला आणखी काही काळ जावा लागेल असं दिसतं आहे.
पण बाबासाहेबांच्या मनातली शिवसृष्टी आणखी भव्य आहे. त्यासाठी आपल्याला १२५ वर्षांचं तरी आयुष्य हवं असं ते म्हणतात. 'शिवसृष्टी'चे सुंदर सप्तरंगी स्वप्न मी हृदयाशी जपले आहे. हा शिवकालीन क्रांतीचा स्फूर्तिदायक इतिहास जगाने येऊन पाहावा आणि आमच्या तरुणांची मने अभिमानाने पोसली जावीत हीच त्यांची इच्छा आहे.'' खरोखरीच त्यांची स्वप्नं पाहिली की ती पूर्ण करण्यासाठी साक्षात तुळजाभवानीच त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याचा कृपाप्रसाद नक्की नक्कीच देईल असं आपल्यालाही वाटतं.
एवढे असूनही ते अत्यंत साधेपणाने जीवन व्यतीत करतात. स्वत:बद्दल त्यांच्या कोणत्याच भ्रामक कल्पना नाहीत. उलट ते म्हणतात, "मी विद्वान नाही, पंडित नाही, साहित्यिक नाही, बुद्धिवंत नाही, इतिहास संशोधकही नाही, इतिहासकारही नाही, भाष्यकार नाही. जो काही आहे, तो वरच्या गावरान महाठी सरस्वती भक्तांच्या केळीच्या पानावरच्या, त्यांच्या जेवणातून उरलेल्या चार शिताभातांवर गुजराण करणारा येसकर आहे." लौकिक आयुष्यातील अफाट लोकप्रियतेनंतरही बाबासाहेब स्वत:ला सरस्वतीच्या पायीचा नम्र सेवक आणि येसकर समजतात, हे समजल्यावर त्यांच्या मनाच्या आणि मानाच्या मोठेपणाची कल्पना येते.
✍️ सर्वेश फडणवीस
#शिवशाहीरांची_शंभरी
No comments:
Post a Comment