खरंतर लेखक ज्या काळात आपल्या साहित्यनिर्मितीला प्रारंभ करतो, त्या काळातील वाङ्मयीन वातावरणाचा त्यांच्या वाङ्मयावर खोल परिणाम होत असतो. बाबसाहेबांच्या वाङ्मयात संपूर्णपणे इतिहासाविषयी आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आस्था, भक्ती, कुतूहल, अभिमान आढळतो. परंपरेच्या इतिहासाच्या अनोळखी अंधाऱ्या वाटेने जात त्यातील व्यक्तिमत्त्वाचा शोध त्यांनी घेतला. इतिहासातील व्यक्तींच्या सुखदुःखांचा, त्यांच्या मनाच्या स्फुट- अस्फुट पैलूंचा शोध त्यांनी घेतलेला आढळतो. याचा अर्थ असा मात्र नव्हे, की त्यांचे वाङ्मय समकालाशी समरस होऊ शकत नाही. ते तसे समरस होत असले तरी यांच्या लिखाणाचा मूळ हेतू, गाभा अधिकतर ध्येय- ध्यास हा शिवकालावरील लेखनाचाच आहे. शिवभक्ती हा त्यांचा श्वास आहे.अर्थात काळापेक्षाही मानवाचे मूलभूत सुखदुःख, त्याचे अंतरंग, त्याच्या श्रद्धा, धर्म या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक काळ हा साहित्याला आव्हानच असतो. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही काळ साहित्यातील सौंदर्याच्या दृष्टीने सारखेच अर्थपूर्ण असतात.
ब. मो. तथा बाबासाहेब पुरंदरे यांनी 'मुजऱ्याचे मानकरी', 'जाळत्या ठिणग्या','सावित्री', 'पुरंदरच्या बुरुजावरुन', 'पुरंदांची नौबत', 'पुरंदऱ्यांची दौलत', 'पुरंदऱ्यांचा सरकारवाडा', 'कलावंतिणीचा सज्जा' हे कथासंग्रह, 'लालमहालातील लक्ष्मी', 'मी रायगड बोलतोय', 'झुंजारबुरुज', 'महाराजांची राजचिन्हे' ही छोटी पुस्तके आणि 'आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे' ही वृत्तपत्रातील लेखमाला, 'राजा शिवछत्रपती' हे शिवचरित्र, 'महाराज' हे सचित्र शिवचरित्र, 'आग्रा', 'पुरंदर', 'लालमहाल', 'सिंहगड', 'पन्हाळगड', 'राजगड', 'प्रतापगड' ही गडसंचातील सात पुस्तके, "शिलंगणाचं सोनं', 'शेलारखिंड' या दोन कादंबऱ्या, 'जाणता राजा' हे महानाट्य असे लेखन केले आहे. बाबासाहेबांनी १९५२ ते १९६० या कालखंडात भारत इतिहास संशोधक मंडळात केलेली नोकरी म्हणजे एक सुवर्णसंधी ठरली. वास्तविक तेथील दप्तरे, ऐतिहासिक कागदपत्रे अनेकांनी वाचली, अभ्यासली असतील. परंतु बाबासाहेबांनी त्यांचा योग्य तो उपयोग करून, माहितीचा आधार घेऊन आपल्या साहित्याची निर्मिती केली. म्हणजे सुवर्णकण वेचून त्यातून सुरेखसे, नक्षीदार, टिकाऊ अलंकार निर्माण केले आणि आज जगभरातील मराठी घराघरात ही ग्रंथसंपदा मोठ्या सन्मानाने मिरवते आहे, वाचण्यासाठी खुणावते आहे.
ज्या काळात ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, प्र. के अत्रे असे अनेक सिद्धहस्त लेखक अजूनही साहित्यप्रांत गाजवत होते, त्याच काळात बाबासाहेब शिवध्यासाने आपले लेखन करीत होते. त्यांच्यावर मुख्य प्रभाव होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, भालजी पेंढारकरांचा आणि त्यांच्या हृदयात वास करीत होते संत ज्ञानेश्वर! बाबासाहेबांच्या हृदयात ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी लिहिण्यामागची ज्योत प्रकाशित झाली आणि "भाष्यकाराते वाट पुसतु'' या ज्ञानदेवांच्या भूमिकेला पूज्यस्थानी ठेवून बाबासाहेबांच्या हातून शिवचरित्राची- 'राजा शिवछत्रपती'ची- निर्मिती झाली. १९५८ मध्ये 'राजा शिवछत्रपती' प्रकाशित झाले. सुरुवातीला ते दहा खंडांत होते. पु. ल. देशपांडे यांनी ते वाचले आणि म्हटले, "ते दहा खंडी चरित्र विकत घेऊन मी निघालो. दिल्लीला पोचेपर्यंत अखंड चोवीस तासांच्या सफरीत ते दहाही खंड संपवले.
आचार्य अत्रे यांनी ग्रंथाची व ग्रंथकर्त्याची प्रशंसा करताना म्हटले, "हे शिवचरित्र साऱ्या महाराष्ट्राने अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचत सुटावे इतके सुंदर आणि बहारदार झालेले आहे. हे शिवचरित्र गद्य आहे की काव्य, की इतिहास आहे, की नाट्य, याचा प्रत्येक शब्दाशब्दागणिक वाचकांना भ्रम पडतो आणि वाचताना मराठी भाषा इतिहासाची दासी बनली आहे का इतिहास मराठी भाषेच्या पायावर लोळण घेतो आहे, याचा डोक्यात विलक्षण गोंधळ उडतो."
विचारांची, भाषेची, उच्चाराची शुद्धता, सखोल चिंतन, विचार ठामपणे मांडण्याची शैली असा बाबासाहेबांचा एकंदर वाग्वैभव-विलास बघितला की सरस्वतीचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याची खात्री पटते. इतिहास आणि साहित्य यासंबंधी विचार करत असताना विशेषत्वाने ब. मो पुरंदरे हे नाव ओलांडून अथवा या नावकडे दुर्लक्ष करून आपण पुढे जाऊच शकत नाही. "वेड लागल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही.
इतिहासाचं वेड लागावं लागतं. शिवाजी महाराजांचा इतिहास हा 'वेड्यांचा इतिहास आहे," या पुरंदरे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना 'शिवचरित्राचे वेड लागले आणि त्यातूनच त्यांच्या लेखणी-वाणीने एक इतिहास घडविला' असे म्हणावे लागेल. पुढे ते असेही म्हणतात, ''इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उठेल, तो इतिहासाचाच!'' आणि खरोखरीच त्यांनी छत्रपतींचा इतिहास हृदयात उसळता ठेवला.
इतिहासाचा मागोवा घेणारा लेखक म्हणून त्यांची ओळख समाजापुढे आली. आपल्या साहित्यातून त्यांनी ऐतिहासिक कालातील जीवनानुभवांचा शोध घेतला आहे. आणि त्याला श्रेष्ठदर्जाचे साहित्यिक रूप प्रदान केले आहे. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग इतिहासाच्या पुस्तकातून वर्णन केले जात होते आणि अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या साहित्यकृती - चरित्र स्वरूपातच
त्यांच्यावर निर्माण केल्या जात होत्या. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेबांनी मराठी सारस्वताच्या अंगणात राजा शिवछत्रपती रुजवला , त्याला स्वतःच्या श्वासाचे, ध्यासाचे खतपाणी घातले .... आणि आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment