Tuesday, August 10, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - १३!! 🚩🙏🏼

आपले सर्वांचे लाडके भाई अर्थात पु. ल.देशपांडे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाबासाहेबांना पत्र लिहिले. ते पत्र आज देतो आहे. पत्र मुळातूनच वाचनीय आहे. त्यातील काही भाग आजच्या लेखात देतो आहे. बाबासाहेबांचे विविध पैलूंना स्पर्श करतांना भाईंनी त्यांच्याबद्दल केलेला गौरव अतिशय योग्य वाटतो.

प्रिय बाबासाहेब

यंदाच्या नागपंचमीला तुम्ही साठ वर्षांचे होत आहात त्या गोष्टीवर माझा काही केल्या विश्वासच बसत नाही. तुमच्या जीवनकार्याची संपूर्ण प्रेरणा असणाऱ्या छत्रपतीप्रमाणे तुमच्याही जन्मतिथीबद्दल काही गोंधळ तर नाही ना अशीही शंका येते. पंचवीस वर्षांपूर्वी शिवाजीराजांचा पोवाडा गायला ज्या उत्साहाने उभे राहून ज्या नाट्यपूर्ण शैलीने आणि आवेशाने समोरच्या विराट श्रोतृसमुदायाला त्या महान जीवनकथेत भिजवून काढीत होता ती किमया आजही तुम्ही करीत आहात. आपण प्रथम भेटलो त्या वेळी तुम्ही पस्तिशीत होता. सरकारला तुमचं वय नाकबूल आहे असंच मला वाटतं. आजही रात्री रोज दोन-तीन तास भान हरपून तुम्ही शिवचरित्र सांगत असता. हे चैतन्य प्राप्त करून देणारी अमृतवल्ली तुम्हाला शिवचरित्राच्या रूपानेच सापडली आहे. शिवरायाचं स्मरण होताक्षणी आपण आनंदवनभुवनात संचार करतो आहो असंच तुम्हाला वाटतं. एखाद्या कार्याशी तन्मय-म्हणजे त्यासारखं व्हावं म्हणजे काय हे पहायचं असेल तर तुम्हाला भेटावं. माणूस रामरंगी रंगो की गानरंगी रंगो, महत्त्व असतं ते तद्रूपतेला. तुम्हाला जीवनात असं तद्रूप होऊन जाण्यासारखं उदात्त प्रयोजन लाभलं. बुद्धिनिष्ठांचाही दैवी चमत्कारावर विश्वास बसावा असा हा शिवछत्रपती.

इतिहास संशोधक म्हटल्यावर जे चित्र डोळ्यापुढे उभे राहते त्याला तुम्ही भलताच धक्का दिला होता. त्याविषयी मी यापूर्वी लिहिलेलं आहे त्याची पुनरुक्ती करीत नाही. पण आजही मला तुमच्या डोळ्यात तीच चमक दिसते. संभाषणात तेच आर्जव आढळतं. शिवचरित्रातली, तुमच्या शब्दात सांगायचं म्हणजे नवी 'एखादी गंमत' सांगताना तोच उत्साह आहे. कॅलेंडरवरचे वर्षाचे आकडे फक्त बदलताहेत. ह्या कालखंडात यशाप्रमाणे मानहानीचेही प्रसंग तुमच्यावर आले. 'अर्थी विपर्यास' हे भोगही तुम्हाला भोगावे लागले. पण त्यामुळे तुमच्या कार्यात तुम्ही खंड पडू दिला नाही. आजही त्याच उत्साहाने शिवचरित्रविषयक कार्याची नवीनवी स्वप्नं तुम्हाला पडताहेत. केवळ भूतकाळात रमून न राहता आधुनिक काळात आवश्यक असणारं कार्यही तुम्ही हाती घेतलं आहे. दुर्गम जागी असलेल्या एका खेड्यातलं जीवन सुस्थिर करावं म्हणून तुमची धडपड चालू आहे. त्याखेरीज शिवकालाचं दर्शन घडवणारं एक संग्रहालय असावं असंही तुमचं एक स्वप्न आहे. अनेक ग्रंथ लिहिण्याचा तुमचा संकल्प आहे. त्यांची कच्ची सामग्री तयार आहे. केवळ वयाने तुमच्याहून थोडा वडील असणारा तुमचा मित्र म्हणून तुम्ही ह्या कार्याच्या पूर्ततेला लागावे असे मला तुमच्या साठाव्या वाढदिवसाच्या प्रसंगी सांगावेसे वाटते.

आमच्यासारख्या सामान्यांना तुमच्या कष्टांची काळजी वाटते. आपले इप्सित कार्य हीच विश्रांती कशी होऊ शकते हे उमगत नाही. स्वत:च्या शरीराची तुम्ही हेळसांड करता आहात असं वाटतं. इतक्या धडपडीतून तुम्हाला काय फायदा मिळणार आहे असाही एक सामान्य बुद्धीला पडणारा प्रश्न उभा राहतो. शिवचरित्र सांगून काय होणार आहे? ह्या प्रश्नाचं तुमचं उत्तर शिवचरित्र सांगितलं जाणार आहे हेच आहे हे मला ठाऊक आहे. फारतर ते मला सांगितल्याशिवाय राहावत नाही अशीही पुष्टी तुम्ही त्या वाक्याला जोडाल. तुम्ही पर्वत कशासाठी चढता? त्या प्रश्नाचं उत्तर एका गिर्यारोहकाने पर्वत आहेत म्हणून एवढंच दिलं होतं. शिवाजी नावाचा पर्वतासारखा एक उत्तुंग माणूस ह्या भारतात झाला एवढ्या एकाच कारणासाठी तुम्ही त्या पर्वतासारख्या माणसाच्या प्रेमात पडलात. त्याचं चरित्र सांगण्यात आयुष्य सार्थकी लावत आलात. व्याख्यानांतून होणाऱ्या आर्थिक प्राप्तीकडेही 'इदं न मम' ह्या भावनेने पाहून लक्षावधी रुपये समाजपुरुषाला अर्पण केलेत. ते द्रव्य जणू काय छत्रपतींच्या मालकीचेच होते आणि आपण केवळ शिवकालातले वसुलीचे अधिकारी आहोत ह्या भावनेने तुम्ही 'शिवार्पणमस्तु' म्हणून ते देऊन टाकले. ही गोष्ट सोपी नाही. शिवचरित्र कथनातून मिळालेली पै न् पै तुम्ही स्वत:साठी ठेवली असतीत तर त्यात वावगं असं काहीही नव्हतं. प्रवेशमूल्याच्या रूपाने घेतलेल्या प्रत्येक पैशाचं माप दहा दहा रात्री शिवचरित्र सांगून तुम्ही लोकांच्या पदरात ते भरपूर टाकत आला आहात. अंगात ताप असतो, घसा फुललेला असतो, शरीरात कित्येकदा उभं राहण्याचं त्राणही उरलेलं नसतं आणि 'छत्रपती श्री शिवाजी महाराज' हे शब्द तुमच्या तोंडून उच्चारले गेले की त्या शब्दांचाच मंत्र होतो. बाबासाहेब पुरंदरे नावाचे एक झाड फुलून येते. पुष्पवृष्टीसारखी शब्दवृष्टी सुरू होते. मरगळलेल्या मनाची माणसं देखील क्षणभर त्या दृष्टीने सुस्नात होऊन मैदानातून बाहेर पडताना दिसतात.

काय लिहावं आणि काय लिहू नये हे सुचवण्याचा मला अधिकार नाही. पण मनात आणलेली गोष्ट तडीला नेण्यासाठी तुम्ही जिवाचं रान कसं करता हे मी पाहिलेलं आहे. तुमच्या बोटाला धरून मी शिवसृष्टीत हिंडल्याबद्दलची कृतज्ञता माझ्या मनात आहे. त्या भावनेपोटीच मी तुमच्या ह्या संकल्पित ग्रंथांच्या पूर्ततेची प्रतीक्षा करतो आहे. शिवचरित्र कथनाच्या उपक्रमाला यंदा पंचवीस वर्षं तुमच्या साठाव्या वर्षाच्या वाढदिवसाच्या वेळीच पुरी होताहेत. एक उदात्त ध्यास घेऊन तुम्ही जगत आला आहात. यापुढला तुमचा प्रवास त्या ध्यासाच्या आनंदात आणखी अनेक वर्ष चालत राहो असं माझ्याप्रमाणे असंख्य लोकांना वाटत राहावं इतकं उदंड प्रेम तुम्हाला लाभलेलं आहे. ते प्रेम प्रतिपश्चन्द्रलेखेप्रमाणे सतत वर्धिष्णु राहो ही याप्रसंगी माझी आणि सुनीताची शुभेच्छा.

तुमचाच
भाई, पु. ल. देशपांडे

✍️ सर्वेश फडणवीस

#शिवशाहीरांची_शंभरी

No comments:

Post a Comment