Thursday, August 5, 2021

शिवशाहीरांचा शताब्दी उत्सव - ८ !! 🚩🙏🏼

शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल जाणून घेतांना त्यांच्या 'जाणता राजा' या महानाट्याविषयी माहिती नसलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.१९८५ मध्ये बाबासाहेबांनी एक नवीनच प्रयोग- लेखन, दिग्दर्शन, सादरीकरणामध्ये केला. तो म्हणजे 'जाणता राजा' या महानाट्याचा. समर्थ रामदासस्वामींनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेका प्रसंगी लिहिलेल्या पत्रातील 'जाणता राजा' हे संबोधन म्हणजे या नाटकाचे शीर्षक होय. बाबासाहेबांनी 'जाणता राजा' हे शिवाजी महाराजांवरील नाटक लिहिले आणि ते रंगमंचावरही सादर केले. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हे 'बॅले' स्वरूपाचे महानाट्य मानले जाते. याचे आतापर्यंत काही हजार प्रयोग झाले आहेत.

आज पिढीदरपिढी जाणता राजा महानाट्य घराघरात कुळाचाराचा भागच झाला आहे. दरवर्षी जिथे कुठे प्रयोग असतील तिथे गर्दी ही आपसूक असतेच.अस्मादिकांनी २००९ मध्ये जाणता राजाच्या प्रयोगात भाग घेतला होता. त्यावेळी १ महिना तालमी असताना प्रत्येक तालमीला शिवशाहीर बाबासाहेब स्वतः जातीने उपस्थित असायचे नव्हे आजही प्रत्येक प्रयोगाला  ते उपस्थित असतात. दिलेल्या वेळी हवेतर ५ मिनिटे आधीच ते उपस्थित राहत. मग तालमी सुरू असतांना ते काहीकाळ शिवकाळात घेऊन जात असत. ते दिवस आजही स्मरणात आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचं महानाट्य असलेल्या 'जाणता राजा'नं काही विक्रम तर मोडलेच, पण भारतीय नाट्यशास्त्र, इतिहास, परंपरा आणि आधुनिक तंत्र यांची जी सांगड घातली ती अत्यंत प्रभावी आहे.


हे नाटक हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये भाषांतरित झाले व पुण्यापासून ते दिल्ली,आग्रा,बडोदा, अहमदाबाद, मध्य प्रदेशापर्यंत त्याचे हिंदी प्रयोग व अमेरिकेमध्ये इंग्रजी प्रयोग झाले आहेत. बाबासाहेब व्याख्यानानिमित्त अनेकदा परदेशी गेले. त्यानंतर 'जाणता राजासाठी' गेले. एकदा 'फिलाडेल्फियाला'ला ते गेले असताना त्यांच्या त्या भेटीबद्दल आपल्या 'ठसे माणसांचे' या पुस्तकात मीना नेरूरकर लिहितात,

"फिलाडेल्फिया आर्ट म्युझियमची बिल्डिंग पाच मजले उंचीची आहे. आत गेल्यावर एखाद्या बालकाच्या उत्साहात बाबासाहेब दालनं पालथी घालत होते. पाचांपैकी तीन मजल्यांवरच्या बहुतेक सर्व गोष्टी बाबासाहेबांना परिचित होत्या. सगळी जुनी शस्त्रास्त्रे, मूर्ती, एवढेच नव्हे तर चित्रांबद्दलदेखील त्यांना सगळं ज्ञात होतं. ती कुठच्या काळची आहेत, कोणी केली आहेत ह्याची त्यांना तपशीलवार माहिती होती. एक चित्र तर त्यांनी लांबूनच बघून सांगितलं की हे काचेवर काढलेलं चित्र आहे म्हणून. मला तर ते चक्क चांगलं हँडमेड कागदावर काढलेलं, काचेची फ्रेम असलेलं चित्र वाटत होतं. मला वाटलं, की यांना दृष्टिभ्रम झाला असेल. पण अहो आश्चर्यम्, मी जवळ जाऊन त्या चित्रावरची माहिती वाचली तर ते चित्र काचेवर काढलेल्या जगातल्या काही अस्तित्वात असलेल्या चित्रांपैकी एक होतं. तशीच एका मूर्तीबद्दलची मजेशीर हकिगत! म्युझियमच्या एका दालनातून दुसऱ्या दालनात जाताना दाराशी लावलेली एक मूर्ती भारतीय होती. बाबासाहेबांनी केवळ दाराशी असलेल्या तिच्या स्थानावरून ती किती सालची असेल, कशासाठी घडवली असेल वगैरे सगळे डिटेल्स मला सांगितले. नंतर नंतर मला तो एक खेळच झाला. कसली तरी कोपऱ्यातली एखादी छोटीशी मूर्ती वा एखादे वेगळं दिसणारं शस्त्र मी बाबासाहेबांना ओळखायला सांगायचे. निमिषार्धात ते त्याबद्दलचा सगळा तपशील व्यवस्थित त्याच्या इतिहासासकट सांगायचे. कधीकधी तर त्या वस्तूच्या शेजारी लिहिलेल्या माहितीपेक्षा जास्त माहिती बाबासाहेबांना माहीत असायची. त्यांच्या अथांग, अगाध ज्ञानाने मी इतकी अवाक्, थक्क किंवा जे काही होतात तशी झाले होते, की त्या तिथे मी त्यांना केवळ लोटांगण घालायचं बाकी ठेवलं होतं. म्युझियमची सफर या विषयाचा जर काही अभ्यासक्रम असेल तर त्यातली पीएच. डी. मी एका मिनिटाचाही विचार न करता बाबासाहेबांना देईन."

इ. स. १८६१ मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेले विनायक जनार्दन कीर्तने यांचे 'थोरले माधवराव पेशवे' हे मराठीतील पहिले ऐतिहासिक नाटक. त्यानंतर अनेक ऐतिहासिक नाटके लिहिली गेली. एकट्या शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार केला तर अशी जवळपास दीडशे नाटके लिहिली गेली आहेत. शिवचरित्रावरील बालनाटकांची संख्याही पंधरा-वीस आहे. म्हणजे शिवचरित्रावरील नाटकांची एक लांबलचक परंपराच मराठीत आढळते. 'जाणता राजा' या बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवजन्मपूर्व ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा विस्तृत आलेख आलेला आहे, असे हे एकमेव नाटक आहे असे म्हणण्यास हरकतच नाही.

खरंतर आज जगभरात मराठी माणूस विस्तारित झालेला आहे. लता मंगेशकर आणि भीमसेनजींचं गाणं न ऐकलेला, पुलंचे विनोद ऐकून न हसलेला, बाबासाहेबांचं शिवचरित्र न वाचलेला, त्यांची व्याख्यानं न ऐकलेला, सचिनचं क्रिकेट न पाहिलेला आणि आता म्हणावं लागेल 'जाणता राजा' न पाहिलेला जगाच्या पाठीवर कुणीच भेटणार नाही. 

गेल्या ३६ वर्षांत हजारो प्रयोग झालेलं, होत असलेलं आणि कोट्यवधी प्रेक्षकांनी पाहिलेलं हे मराठीतलं एकमेव महानाट्य. सामान्य शिवभक्तापासून ते पंतप्रधानपदावर असताना अटलजींसारख्या साहित्यप्रेमी कवीनं 'जाणता राजा' पाहिले. आणि बाबासाहेबांच्या अफाट उत्तुंग, प्रतिभेला हर एक प्रकारे दाद दिली. पु. ल. देशपांडे 'जाणता राजा' बघायला आले. प्रयोग पाहून ते म्हणाले, मी 'जाणता राजा' पाहायला पुन्हा कधी तरी येणार आहे. आज मला ते पूर्ण पाहता आलं नाही. कारण ते पाहताना माझ्या डोळ्यातून वारंवार अश्रू येत होते. हे ऐकल्यावर बाबासाहेबांनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि हीच जादू महानाट्य बघतांना मराठी मनावर अधिराज्य गाजवणारी आहे. 

ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर नेहमी म्हणतात, 'नोबेल पुरस्कार मिळवणं हा भारतीयांचा छंद झाला पाहिजे.' नोबेल पुरस्कार टागोरांच्या रूपानं मिळाला, त्याचीही चोरी होते. तेही आपण नीट सांभाळू शकत नाही. इतिहासापासून आपण कोणता बोध घेतो? याचा आपणच बारकाईनं विचार केला पाहिजे. इतिहास हा केवळ लढाया आणि सनावळ्या लक्षात ठेवण्यासाठी नसतो, त्यापासून वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ घडवायचा असतो आणि 'जाणता राजा'ची हीच शिकवण आहे. इतिहासाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन हे महानाट्य आपल्याला देत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र म्हणजे केवळ मुजरे, लढाया आणि राज्याभिषेक एवढ्यापुरतं नाही. तर त्यांचा राज्यकारभार, प्रशासन, त्यांचं युद्धशास्त्र, माणसं हेरण्याचं आणि त्याला योग्य कामगिरी सोपवण्याचं त्यांचं कसब, त्यांची भविष्याकडं लागलेली नजर, राज्यविस्ताराच्या त्यांच्या योजना, प्रजेची काळजी, कायम सावधपणा, समाजातील साधू-सज्जनांप्रती त्यांच्याजवळ असलेला आदरभाव, मेल्यावरही शत्रूचा अपमान न करण्याची त्यांच्याकडील उदात्त माणुसकी, आपल्या सहकाऱ्यांवरील प्रेम, निष्ठावंतांचं आणि कर्तबगार मंडळींचं खुद्द महाराजांकडून आठवणीनं केलं जाणारं कौतुक यासाऱ्या गोष्टींकडं सूक्ष्मपणे पाहिलं पाहिजे. आणि या सगळ्याचे सार म्हणजे 'जाणता राजा'.. कारण या महानाट्यातील प्रत्येक प्रसंगातून  या साऱ्या गोष्टी प्रतिबिंबित झाल्या आहेत.

✍️ सर्वेश फडणवीस 

#शिवशाहीरांची_शंभरी 

No comments:

Post a Comment