Saturday, January 30, 2021

मधुबनी चित्रकलेसाठी पद्मश्री मिळालेल्या दुलारी देवी !!


मध्यंतरी ह्या माध्यमातून दुलारी देवी ह्यांचे चित्र बघितले आणि ह्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली. काही वाचनात आल्यावर आणि ऐकल्यावर आश्चर्य वाटलं. कधीही शाळेत न गेलेल्या, एकही वर्ग न शिकलेल्या दुलारी देवी आज "पद्मश्री दुलारी देवी" झाल्या आहेत. मधुबनी चित्रकलेसाठी त्यांना पद्म पुरस्कार  मिळाला आहे. त्यांचा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. 

बिहारच्या मधुबन जिल्ह्यातील रांती गावच्या दुलारी देवी यांना पद्मश्री पुरस्काराने ह्या वर्षी गौरविण्यात आले आहे. दुलारी देवी झाडलोट आणि फरश्या पुसण्या सारखे,धुणं भांड्याची कामे करत आपला उदरनिर्वाह चालवत असत. पण काही करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातूनच त्यांचा प्रवास सुरु झाला आणि आज पद्मश्री ह्या बिरुदावलीत दुलारी देवी हे नाव अलंकृत झाले आहे. 

खरंतर माणसाला जगायला शिकवते ती म्हणजे कला आणि माणूसपणाच्या जगण्याला एक उंची देते ती म्हणजे सुद्धा कला आहे. दररोजच्या कंटाळवाण्यातून हवाहवासा वाटणारा विरंगुळा म्हणजे कुठलीही कला कारण कला जगण्याला सौंदर्य प्रदान करतातच आणि ह्या कलेमुळे जगणे अधिक सुसह्य होत जाते त्यातली अनेकांच्या जवळची,अनेकांना उपजत असलेली कला म्हणजे चित्रकला. शब्दांपासून दूर नेण्याची ताकद ही चित्रात असते. चित्रं ही माणसाच्या मनात विचारांची स्पंदने निर्माण करतात आणि चित्र आपल्याला विचारांनी समृद्ध करत असतात आणि आज मधुबनी चित्रकलेसाठी पद्मश्री मिळवलेल्या दुलारी देवी ह्या सातव्या स्थानी आहेत. आजवर ह्याच मधूबनी चित्रासाठी सहा जणांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते,माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे देखील कायम कौतुक करत असत. मल्लाह जातीच्या अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या दुलारी देवी ह्यांचे वयाच्या १२ व्या वर्षी लग्न झाले. घरोघरी झाडझुड आणि फरश्या पुसण्याची काम करताना प्रसिद्ध मधुबनी चित्रकलाकार कपुरी देवी यांच्या संपर्कात आल्यावर त्यांचा कलाप्रवास सुरू झाला.

पुढे दुलारी देवी ह्यांनी घराचे अंगण लाकडापासून बनवून आपल्या कल्पनांना आकार द्यायला सुरुवात केली. कपूरी देव ह्यांच्या कडून शिक्षण घेत दुलारी यांनी मिथिला चित्रकला क्षेत्रात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली. दुलारी देवी यांनी आतापर्यंत विविध विषयांवर सात हजार मिथिला पेंटिंग्ज केल्या आहेत. दुलारी देवी ह्यांच्या कार्यासाठी त्यांना राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

गीता वुल्फचे 'फॉलोइंग माय पेंट ब्रश' पुस्तक आणि मार्टिन ले कॉज यांचे फ्रेंच पुस्तक मिथिला दुलारी देवी यांच्या जीवनाची कथा आणि कलाकृतींनी सुसज्ज आहेत. त्यांच्या चित्रकलेला सतरंगी नावाच्या पुस्तकातही जागा मिळाली आहे. इग्नूसाठी मिथिला चित्रामध्ये तयार केलेल्या आधार कोर्सच्या मुख्यपृष्ठासाठीही त्यांची चित्रकला निवडली गेली आहे. 

पटना येथील बिहार संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दुलारी देवी यांना खास आमंत्रित केले होते. तेथे कमला नदीच्या पूजेवर बनवलेल्या चित्रांना स्थान देण्यात आले आहे. मधूबनी चित्रांसाठी पद्मश्री मिळालेल्या दुलारी देवी ह्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. विद्यमान सरकार २०१४ पासून अशाच सामान्यातल्या असामान्य व्यक्तींचा गौरव करत आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#पद्म_गौरव #Padmashri_Dulari_Devi 
#prideofmithila #prideofbihar

Thursday, January 28, 2021

फिल्ड मार्शल कोडानडेरा मडप्पा करिअप्पा


मध्यंतरी बंगलोर ला गेल्यावर गुगल मॅप्स मध्ये " करिअप्पा मार्ग " असं ऐकलं आणि बोलण्याच्या ओघात ह्या विषयी चर्चा झाली. करिअप्पा आर्मी मध्ये होते इतकंच माहिती होते. पुढे गूगल गुरू ची मदत घेतली आणि वाचल्यावर आश्चर्य वाटलं कारण इतके वर्ष झाले आर्मी ऑफिसर ह्या व्यतिरिक्त काहीच माहिती नव्हते. आपल्या पाठ्यपुस्तकांत ही ह्यांच्याबद्दल माहिती नाही ही खरंतर शोकांतिका आहे. असो.. तर आज फिल्ड मार्शल मेजर करिअप्पा ह्यांचा १२१ वा जन्मदिवस आहे. 

कोडानडेरा मडप्पा करिअप्पा यांचा जन्म २८ जानेवारी १८९९ साली कर्नाटक राज्याच्या डोंगराळ भागात झाला आणि ते ब्रिटीश वसाहत प्रशासन अधिकाऱ्याच्या सहा मुलांपैकी एक होते. त्यांचे शिक्षण भारतीय शाळांमध्ये आणि मद्रासच्या (आताचे चेन्नई) प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले. करिअप्पा टेनिस आणि फील्ड हॉकीमध्ये आवड असणारे एक सक्रिय विद्यार्थी होते. करिअप्पा ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात लष्करी प्रशिक्षण घेतले परंतु कोणतेही सक्रिय कर्तव्य त्यांनी बजावले नाही. युद्धाच्या समाप्तीनंतर भारतीय राजकारण्यांनी ब्रिटीशांना भारतीय अधिकार्‍यांना भारतातील ब्रिटीश सैन्यात सामावून घ्यावे अशी मागणी करण्यास सुरवात केली. त्यातूनच सन १९१९ मध्ये करिअप्पा भारतीय उमेदवारांच्या पहिल्या गटात निवडले गेले आणि त्यांना इंदूर येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. तेथून त्यांना मुंबई येथे कर्नाटक इन्फंट्रीमध्ये कमिशन देण्यात आले.

करिअप्पा ह्यांना १९२३ मध्ये लेफ्टनंट म्हणून बढती देण्यात आली, १९२७ मध्ये कॅप्टन,१९३८ मध्ये मेजर,१९४२ मध्ये लेफ्टनंट कर्नल आणि १९४६ मध्ये ब्रिगेडियर म्हणून ब्रिटिश काळात कार्यरत होते. १९४२ मध्ये संपूर्ण युनिटची कमान देण्यात येणारे ते पहिले भारतीय अधिकारी ठरले. दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी तेथील सेवेबद्दल मान्यता मिळाल्यामुळे त्यांना ब्रिटीश साम्राज्याच्या ऑर्डरमध्ये समाविष्ट केले गेले. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर भारतीय उपखंडाच्या फाळणीच्या वेळी अर्थात स्वातंत्र्याच्या अगदी अगोदर, करिअप्पा यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यात भारतीय लष्करी आस्थापना विभाजित करण्याचे कठीण काम पाहिले होते.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर करिअप्पा यांना जनरल स्टाफचे सरचिटणीस म्हणून नियुक्त केले गेले. लेफ्टनंट जनरल पदावरील पदोन्नतीनंतर ते नोव्हेंबर १९४७ मध्ये पूर्व आर्मीचे कमांडर झाले. त्यानंतरच्या जानेवारीत त्यांना दिल्ली आणि पूर्व पंजाब कमांड (आता वेस्टर्न कमांड) चे सैन्य कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले.

जानेवारी १९४९ मध्ये ब्रिटिश कमांडिंग सर सर रॉय बुचर यांच्या जागी करिअप्पा यांना भारतीय सैन्य दलात प्रथम भारतीय कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले. लष्करप्रमुख म्हणून करिअप्पा यांना ब्रिटिशांनी सोडलेल्या सैन्याचे राष्ट्रीय सैन्य दलात रूपांतर करण्याचा हुकूम होता. हे कार्य पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी दोन नवीन युनिट्सची स्थापना केली - गार्ड्स ब्रिगेड (१९४९) जे १९५८ पासून ब्रिगेड ऑफ गार्डस ओळखल्या जाते आणि पॅराशूट रेजिमेंट (१९५२) - जे सर्व जाती व वर्गातील सदस्य भरती करणारे पहिलेच म्हणून उल्लेखनीय होते. दरम्यान १९४९ मध्ये अमेरिकेचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार त्यांना मिळाला होता.

करिअप्पा सन १९५३ मध्ये सक्रिय सैन्य सेवेतून निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी सन १९५६ पर्यंत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून काम पाहिले. सन १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानशी युद्ध झालेल्या युद्धात ते सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी सैन्याच्या भेटी घेत राहिले आणि भारतीय सैन्याच्या कार्यात ते सहभागी होत राहिले. देशाच्या लष्कराला पाठिंबा देण्यासाठी ते भारताची औद्योगिक क्षमता वाढवण्याचे सतत प्रयत्न करत होते. भारतीय सैन्य सरकार आणि नागरिक ह्यांच्या अधीन राहण्याची गरज आहे यावरही त्यांनी जोर दिला. १९८६ मध्ये भारत सरकारने करिअप्पा यांना देशासाठी अनुकरणीय सेवांच्या सन्मानार्थ फील्ड मार्शलच्या मानद पदात बढती दिली. पुढे वयाच्या ९४ व्या वर्षी १५ मे १९९३ रोजी त्यांचं बंगलोर येथे निधन झाले. 

थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा। 
आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा।।

आपण त्यांच्याप्रमाणे वागावे. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जीवन व्यतीत करावे, असाच बोध ह्यामधून होतो म्हणून ही चरित्र प्रातःस्मरणीय आणि वंदनीय आहेत. 

मूळ माहिती स्रोत - Britannica
फोटो स्रोत - google

✍️ सर्वेश फडणवीस

Tuesday, January 26, 2021

आठवणीतला प्रजासत्ताक !! 🇮🇳


सलग दोन वर्षे अर्थात २०१९ आणि २०२० दिल्लीच्या राजपथावर परेड बघण्याचे भाग्य लाभले आहे. २०२० ला बिटिंग रिट्रीट ही बघता आले आहे. ह्यावर्षी दूरदर्शनवर बघतांना सगळं आठवत होते. बऱ्यापैकी आजच्या दिवसाची सुरुवात प्रत्येक भारतीय सकाळी दूरदर्शनवर परेड बघूनच घालवतो. तो राष्ट्र कुळाचार झाला आहे. पण प्रत्यक्षात राजपथावर परेड बघणे म्हणजे पर्वणीच आहे. ज्या पद्धतीने दिल्ली नटलेली असते ते बघून आपण काही काळ भारावून जातो . तो जोश, उत्साह आणि राष्ट्रभक्तीने मंतरलेला तो परिसर बघतांना आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याबद्दल गर्व होतोच कारण त्या वातावरणात इतके मोहवून टाकणारे भव्य आयोजन म्हणजे ही परेड असते. सकाळी दिल्लीच्या थंडीत कुडकुडत परेड बघतांना काही तास राष्ट्रीय अस्मिता अधिक जागरूक झालेल्या असतात हाच अनुभव तिथं गेल्यावर येतो. 
 
२६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्थापन झाले. अर्थात आपण भारतीय राज्य घटना स्वीकारून प्रजासत्ताक झालो. गेल्या ७१ वर्षात एखाद धोका सोडला तर भारतातील लोकशाही अगदी सुरळीत सुरू आहे. स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिले. संविधान प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे. खरं तर जे संविधान नागरिकांना भारतात जगण्याचा अधिकार देतो; तेच संविधान भारत संघराज्याच्या नागरिकांकडून काही अपेक्षा करते.

आपण जेव्हाही संविधानावर चर्चा करतो तेव्हा केवळ आपल्याला भारतीय नागरिक म्हणून मिळालेल्या हक्कांची चर्चा करतो. ते हक्क आपल्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाहीत, शिवाय ती हक्क हिरावून घेतली तर संविधानीक अथवा अगदी असंवैधानिक मार्गानेही तो मिळवण्यासाठी आपण भांडण्यास तत्पर असतो. संविधानाने आपल्याला समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्ध, धर्म स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क बहाल केले आहेत.

गणतंत्र आणि नागरिक हे एकमेकांसाठीच बनले आहेत. सुखी , समाधानी , सुरक्षित आणि शांत समाज जीवनासाठी आपली कर्तव्ये योग्य पद्धतीने पार पाडणे हेच प्रत्येकाचे लक्ष्य असले पाहिजे आणि हीच भावना जपत राष्ट्रहित सर्वतोपरी हेच उद्दिष्ट समोर ठेवून सार्वजनिक जीवनातील वाटचाल करावी लागणार आहे.

आपण आपल्या अधिकाराची मागणी करीत असताना आपली समाजाप्रती देशाप्रती असलेली कर्तव्ये सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत याचे भान सर्वांनी पाळल्यास एक सुखी , समृद्ध ,आणि गौरव – गरीमामय ,आत्मनिर्भर, विश्वगुरु भारत पुन्हा उभा राहील यात शंका नाहीच. 

राष्ट्रीय सण म्हणून हा दिवस नक्कीच साजरा करावा. २६ जानेवारी आणि झेंडावंदन आणि राजपथावरील भारताची आन,बान,शान असलेली परेड हे एक वेगळेच समीकरण आहे .एक भारतीय म्हणून हा  गौरव सोहळा बघताना अभिमान वाटावा अशी ही परेड. प्रत्येक भारतीयाने एकदा तरी हा सोहळा प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवावा. रक्षा मंत्रालय विविध संस्थेच्या माध्यमातून ह्याचे enclosure मिळवता येते. ज्या पद्धतीने ही परेड संपन्न होते तेथील प्रत्येक छोटी गोष्ट बघतांना ह्या देशाचे पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी बाळगणे म्हणजेच राष्ट्रहित जपणे होईल. खरंच गर्व होतो आपण भारतीय असल्याचा..

आयुष्यात एकदा तरी २६ जानेवारीची परेड बघायचीच.दिल्ली गाठायचीच. छान थंडीत ह्या राजपथावरील उत्साह अवर्णनीय असतो. खरं तर रोजची लढाई ,आपण सगळेच लढतो.पण लढायची शिस्त शिकवते ,ती ही परेड. परेड बघून शिस्तीत जगायला शिकतो तो माणूस, ही परेड बघून सगळे एक आहोत, सगळे सारखे आहोत.
सगळ्यांना बरोबर घेवून चाललात,की देश पुढे जाणार आहे ह्याची जाणीव होते. सीमेवर लढणाऱ्यांची आठवण करून देते, ती ही परेड. कौतुकसोहळा हा देशाचा,तो चुकवायचा नाहीच."
भारत माता की जय 
वंदे मातरम !!

✍️ सर्वेश फडणवीस

#Memories #RepublicDay #Parade #Republicday2021

Saturday, January 23, 2021

Road Trip Nagpur-Banglore !! 🚘🛣️🚦🚧

नागपूरहुन निघतांना बऱ्याचदा वर्धा,वणी किंवा हिंगणघाट भागात जातांना आपण बंगलोर किंवा कन्याकुमारी किलोमीटरच्या पाट्या वाचत असतो पण तिथपर्यंत जाणे कधी होईल ह्या विचारांत असतांना काही कामानिमित्त कर्नाटक राजधानी बंगलोरला जाणे झाले. प्रवास वर्णन वाचतांना जी मज्जा असते त्याहून अधिक ती अनुभवणं आल्हाददायक असतं. कोरोना महामारीतून हळूहळू गाडी पूर्वपदावर येत असतांना जवळपास वर्षभराने प्रवास झाला. हा प्रवास आनंद देणारा होताच कारण बदल हा मानवी मनाचा आनंद आहे. 

काश्मीर ते कन्याकुमारी तब्बल ३९०० किमी आहे. श्रद्धेय अटलजी ह्यांच्या स्वप्नातील हा महामार्ग म्हणजे दूरदृष्टी आणि व्यापक विचार ह्याचीच अनुभूती देणारा आहे. काश्मीर म्हणजे भारताचे उत्तर टोक आणि कन्याकुमारी म्हणजे भारताचं दक्षिण टोक आणि नागपूर म्हणजे zero mile. भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे तिथून किमी ची गणना होते असे ठिकाण आहे. 

नागपूर सारख्या मध्यवर्ती ठिकाणापासून सुरूवात करत तब्बल ११०० किलोमीटर्सचा पल्ला कारने पार करत कुठेही न थांबता अवघ्या १३ तासांमध्ये हा प्रवास पूर्ण केला आहे कारण ज्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून जाणे झाले तो सर्वोत्तम असाच आहे. हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला हवा ह्या हेतूने हे लेखन करतो आहे. 

ड्रायव्हिंग हे आपल्यापैकी अनेकांचं पॅशन आहे. या पॅशनला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णत्व मिळाले आहे. तब्बल चार राज्यांच्या महामार्गावरून गाडी चालवणे म्हणजे खरंतर भन्नाट अनुभव आहे. आंध्र आणि कर्नाटक मधील रस्ते हे भारतातल्या सर्वोत्कृष्ट रस्त्यांपैकी एक गणले जात असल्याने हा प्रवास सुखद ठरला आणि गाडीने येण्याचा निर्णय योग्य ठरला असे मनोमन वाटले. आज फास्टटॅग मुळे टोलवर ही वेळ जात नाही. चांगल्या सोयीसाठी थोडे पैसे द्यावेच लागतील. फक्त बंगलोरच्या प्रचंड रहदारीमुळे थोडा वैताग आला कारण पक्के नागपूरकर असल्याने त्याची सवय नाही. पण ज्या वातावरणात आपण जातो तिथले होण्यात अधिक मज्जा असते ह्या भावनेने आलेल्या परिस्थितीला पण मनावर ताबा ठेवत शांततेत प्रवास झाला. 

आज महामार्गावरून जातांना रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ह्यांच्याबद्दल जी आदराची भावना निर्माण झाली त्याला शब्दांत मांडणे कठीण आहे. कारण महामार्गांचे जे जाळे त्यांनी सबंध देशभर विणले आहे त्यामुळे ते आदर्श आहेतच पण निवडणूकीतील एका मताची किंमत कळली आहे. आज महामार्गामुळे नितीनजी ह्यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात त्यांनी एक आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कामाची नोंद येणारी प्रत्येक पिढी घेईल हाच विश्वास आहे. नितीनजी ह्यांच्या कार्यालयात हा quote लागला आहे. "American roads are not good because America is rich, but America is rich because American roads are good" -  John F Kennedy ह्यांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्याचे त्यांचे कार्य उत्तरोत्तर सुरू आहे. 

खरंतर आज हे रस्ते त्यांच्या रचनेमुळे सर्वोत्कृष्ट स्वरूपाचे झाले आहेत. त्यामुळे येथून प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे, पण ही गोष्टही लक्षात ठेवावी लागेल की, साधे वाटणारे रस्ते देखील कधी आपल्या जीवावर उठतील याची शाश्वती देता येत नाही. म्हणून रस्त्यावरचा प्रवास कोणताही असो लिमिटमध्ये गाडी पळवत आणि निसर्गाचा आनंद घेत प्रवास करणे अधिक श्रेयस्कर आहे. ह्याच प्रवासातील काही क्षण..

✍️ सर्वेश फडणवीस

#travel #roadtrip #RoadTrip2021 #NationalRoadSafetyMonth #NHAI

Tuesday, January 12, 2021

गोष्टी नव्या भारताच्या...

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस #CovishieldVaccine देशात पोहोचवण्यासाठी काल सकाळी पुण्याहून निघाले. त्यावेळी अदार पुनावाला यांनी ट्विट केलेले फोटो बघितले. काही घटनांमध्ये इतकं साम्य असतं की आश्चर्य वाटतं. रघुनाथ माशेलकर ह्यांचे पुस्तक वाचतांना एक संदर्भ वाचला. त्यात माशेलकर सांगतात,

भारतातील ज्ञानाधिष्ठित औषधउद्योग यांना नवीन आंतरराष्ट्रीय स्वामित्व हक्काच्या परिप्रेक्ष्यात नवीन आव्हानं स्वीकारावी लागणार आहेत. आपल्या औषधउद्योगाच्या बाबतीतही नेमकी हीच स्थिती आहे. पन्नास वर्षापूर्वी औषधांचे आराखडे आयात करणारा आपला औषधउद्योग आज निर्यात करणारा झाला आहे. त्यामुळे त्यालाही जागतिक खुल्या स्पर्धेला तोंड द्यावंच लागणार आहे. जागतिक बाजारपेठेतील औषधउद्योग हा ज्ञानाधिष्ठित उद्योग आहे. त्यामुळे भारतीय औषधउद्योग हाही ज्ञानाधिष्ठित बनेल, त्याला पर्याय नाही.
आजपर्यंत नवीन एकही रेणू तयार न करता हा उद्योग तरलेला आहे. पण यापुढील काळात ते शक्य नाही. गेल्या चाळीस वर्षाच्या इतिहासात भारतातील या उद्योगाने केवळ चौदा नवीन रेणू शोधून काढले आहेत त्यापैकी ११ हे सी.एस.आय.आर.च्या संघांनी तयार केलेले आहेत. पण नवीन पेटंटच्या कालखंडात ही मनोवृत्ती आपण
बदलायला हवी. सत्तरच्या दशकामध्ये भारतीय पेटंट कायदा अस्तित्वात आल्यावर ज्याप्रमाणे मोठ्या ताकदीने आणि श्रद्धेने भारतीय औषध उद्योगाने कात टाकली, त्याच जोशाने त्यांनी आता काम करायला पाहिजे. ज्ञात असणाऱ्या औषधांच्या उत्पादनप्रक्रिया शोधत बसण्याऐवजी त्यांनी पेटंट मिळवता येतील अशा मूलभूत संशोधनासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत. त्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळांबरोबर त्यांनी एकत्र येऊन काम करायला काहीच हरकत नाही. एक धोरण म्हणून औषधउद्योग असंही करू शकतात की, त्यांनी नवीन औषधाचं क्लिनिकल पायरीपर्यंत संशोधन करून त्याच्या पुढील विकासासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांशी भागीदारी करून त्याचा परवाना मिळवावा. काही औषध कंपन्यांनी हे धोरण राबवायला कधीच सुरुवात केलेली आहे. आता त्याची फळंसुद्धा त्यांना चाखायला मिळत आहेत. 

नवीन सहस्रक हे आशियाचं असेल आणि मला खात्रीपूर्वक वाटतं की, त्यामध्ये भारताला मोठी संधी आहे. भारताकडे असणारी बौद्धिक संपत्ती आणि त्या ज्ञानाचं अर्थकारण करण्याची मक्तेदारी असल्यावर भारत नक्कीच आर्थिक महासत्ता बनेल. लक्षावधी भारतीयांकडे, प्रत्येकाकडे म्हणून असणारी स्वतंत्र सर्जनशीलता जागृत होईल. आपण खूप काळपर्यंत भारताच्या क्षमतेविषयी बोलत आहोत. पण मला खात्री आहे की, सर्जनशील भारतीयांची ही सुप्त क्षमता एक दिवस नक्कीच सर्जनशील आणि उत्पादनक्षम गतिमान शक्तीमध्ये परावर्तित होईल. परिणामी भारतीय नीतीमूल्यांवर आधारलेला एकमेवाद्वितीय ज्ञानाधिष्ठित समाज भारतात आकाराला येईल.

वरील संदर्भ त्यांनी १४ जानेवारी १९९९ रोजी नवी दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल सेंटर मध्ये सी.डी.देशमुख स्मृतीप्रीत्यर्थ दिलेल्या व्याख्यानातील आहे. आज २२ वर्ष व्याख्यानाला झाली आहेत. दूरदृष्टी आणि नव्या भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कटिबद्ध असलेले डॉ. रघुनाथ माशेलकर ह्यांचा प्रत्येक शब्द प्रत्यक्षात खरा ठरतो आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#seruminstindia  #AatmanirbharBharat  #NewIndia #AdarPoonawalla  #raghunathmashelkar

Sunday, January 10, 2021

प्लास्टिकपासून 'इकोब्रिक्स'


इकोब्रिक्स नाव ऐकून काहींतरी वेगळं वाटेल पण नागपूरात अनेक महिन्यांपासून टाकाऊ प्लास्टिकपासून 'इकोब्रिक्स' बनवणे सुरू आहे. जुई पांढरीपांडे आणि तिची संपूर्ण टीम हे काम करत आहे. 
प्लास्टिकच्या बाटल्या आणि अविघटनशील प्लास्टिक ह्यांचा वापर करून ह्या अभियानाला देशभरात प्रारंभ झाला आणि आज नागपूरातही ह्याची सुरुवात झाली आहे. जुईच्या ह्या कार्याची अनेकांना ओळख व्हावी आणि त्यातून काही प्रेरणा व्हावी ह्या शुद्ध हेतूने हे लेखन आहे. 

काल जुई पांढरीपांडे ह्यांच्या टाईमलाईन वर ह्या संदर्भातील व्हिडिओ बघितला. कशी तयार होते ही इकोब्रिक्स ? स्वतः प्रॅक्टिकल करून दाखवत त्यांनी एक लहान इकोब्रिक्स तयार करून दाखवली. बघूनच आश्चर्य वाटलं. अहिल्या मंदिरात गेल्यावर सुद्धा अशा अनेक इकोब्रिक्स बघायला मिळाल्या होत्या पण तेव्हा त्याबद्दल इतकी माहिती नव्हती पण काल व्हिडिओ बघितला आणि त्यातून हे लेखन होतं आहे. 

प्रत्येकाच्या जगण्यात वस्तूंचा वाढता वापर असल्याने टाकाऊ प्लास्टिकचे प्रमाणही खूप जास्त असते. त्यातही सामान्य माणसांच्या वापरात बहुतांश वेळा अविघटनशील प्लास्टिकच असते. कचऱ्यात समाविष्ट झालेले हे कमी जाडीचे प्लास्टिक वर्षानुवर्षे पृथ्वीवर भार बनून राहतात आणि पॉलिथिनसारख्या वस्तूंचे विघटन होण्यास तर साधारणतः ५०० वर्षांपेक्षाही जास्त वर्षे लागतात. या कचऱ्यावरच पर्यावरण संरक्षण संस्थेने 'इकोब्रिक्स' तयार करण्याचा उपक्रम राबविला आहे.

प्लास्टिकची पाण्याची किंवा शीतपेयांची बाटली याकरिता उपयोगात आणली जाते. त्यामध्ये प्लॅस्टिक आणि पॉलिथिनच्या वस्तू तसेच तुकडे, वापरलेले प्लास्टिक खच्चून भरले जाते. असे भरपूर प्लॅस्टिक भरलेल्या बाटलीला इकोब्रिक असे नाव देण्यात आले आहे. पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया न होणारे प्लॅस्टिक, वेफर्सची रिकामी पाकिटे, हेअरपिन्स, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक अशा अनेक गोष्टी यामध्ये भरण्यात येतात. मात्र, दुधाच्या पिशव्यांसारखे पुनप्रक्रिया होऊ शकणारे प्लास्टिक, सडणारे खाद्यपदार्थ यामध्ये वापरले जात नाहीत. सुमारे शंभर चौरस फूट जमिनीवर पसरू शकतील, इतक्या प्लास्टिकला एका एक लीटरच्या बाटलीत भरता येऊ शकते. अशा भरलेल्या बॉटल्स कचऱ्यात टाकल्या तर कचरा संकलन करणाऱ्यांनाही ते सोयीचे ठरते. याशिवाय, त्यापासून, स्टूल, ट्री गार्ड, पुस्तके ठेवायला कप्पे,बसायला बेंच अशा विविध गोष्टी आकारास येऊ शकतात. आज पर्यावरण संवर्धन संस्थेने देशभरात याबाबतचे अनेक प्रयोग सुरू केले आहेत. डेहराडून येथे इकोब्रिक्स बगिचा तयार करण्यात आला आहे. दिल्लीत बचतगटातील महिलांच्या मदतीने इकोब्रिक्स फर्निचर तयार करण्यात आले आहे. रस्तेबांधणीतही त्यांचा उपयोग करण्यात आला आहे. आज नागपूर येथे विविध सोसायटी,कॉलनी मधील नागरिकांची मदत या कामासाठी  घेण्यात येते आहे आणि अनेक नागरिक स्वतः ह्या कार्यासाठी पुढाकार घेत आहेत. ह्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण जुई पांढरीपांडे ह्यांच्या टाईमलाईनवर व्हिडिओ बघू शकता. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#ecobricks

Saturday, January 2, 2021

वर्ष नवे संकल्प नवा...

नवीनतेची ओढ असणं हे मानवी मनाचे वैशिष्ट्य आहे. कुठलीही नवी वस्तू घरी येणार असेल, तर ती येईपर्यंत तिची ओढ ही असतेच आणि त्यामुळे घरातील वातावरणही एका वेगळ्याच आनंदात असतं. डिसेंबर महिना आला की चाहुल लागते ती नवीन वर्षाची. जगन्मान्य असलेल्या नवीन वर्षाच्या आगमनाची किंवा त्याच्या स्वागताची तयारी प्रत्येक जण करत असतो. जणूकाही सर्वत्र नवीन घडणार असल्यासारखं कायम वाटत असतं आणि तोच उत्साह आणि आनंद दरवर्षी असतो. २०२० हे वर्ष एका जागतिक महामारीत गेले, पण तरी आपण सकारात्मकता दर्शवत २०२० ला निरोप दिला. इतिहासात या वर्षाची नोंद होईलच, पण ते होत असताना भारताने जगाला जी दृष्टी दिली त्याची नोंद नक्कीच होईल.
 
‘नवीन वर्ष आणि नवा संकल्प’ हे सध्या एक समीकरण झाले आहे. प्रत्येक जण जमेल तसे येणारे नवीन वर्ष साजरे करत असतात. प्रत्यकाचे ते साजरे करण्याची पद्धत निराळी असू शकेल. पण, बर्‍यापैकी प्रत्येक जण काही तरी संकल्प करत असतो. पूर्ण करता येवो अथवा न येवो, पण नवीन वर्षाचा संकल्प घ्यायची तात्पुरती मजा तर वेगळीच असते. आपण काहीतरी चांगलं करणार, अशी भावना मनामध्ये राहते. बरेचदा एकमेकांसोबत विचारांचे आदानप्रदानही करत असतो. आता नवीन वर्ष सुरु झालं आहे, तर नवीन वर्षाचा संकल्प काय?

मुळात वर्षभराचा संकल्प घेणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं कठीण वाटतं. न ठरवता, न सावरता जगण्याची मजा काही वेगळीच असते. जी परिस्थिती येईल तिला समोर जायचं. म्हणजे निदान पूर्ण करण जमलं नाही तर निराशा येणार नाही. संकल्प करणं ही तशी चांगली गोष्ट आहे, पण ते पाळण्यासाठी संयम आणि शिस्त हे गुण ही अंगिकारले पाहिजे आणि त्यातूनच वर्षाच्या शेवटी पूर्ण न झालेल्या संकल्पसिद्धी बद्दल वाईट वाटणार नाही. आपलं आयुष्य कसं असायला हवं, हे आपल्याच हातात आहे. आजूबाजूला काहीही झाले तरी आपण जसे सयंत आणि सतर्क असतो, तसेच वर्षभर हीच सतर्कता जीवनात सकारात्मकता प्रदान करत असते आणि या सकारात्मक वाटचालीत संपूर्ण वर्ष आपल्याला आनंद व नवा उत्साह प्रदान करत असतो.

सध्या रघुनाथ माशेलकर यांचं पुस्तक वाचनात आहे. त्यात ते लिहितात,“पुढचं दशक हे बुद्धीचं, प्रज्ञेचं आहे, ज्ञानाचं आहे आणि भारतामध्ये त्याचं नेतृत्व करण्याची सार्थ क्षमता आहे. ज्यामध्ये भारत अद्वितीय बौद्धिक आणि आर्थिक महासत्ता म्हणून गणला जाईल. पूर्वीच्या सहस्रकात असलेले गतवैभव भारताला पुन्हा प्राप्त होईल. या दशकाची ही पहाट भारताला गतवैभव प्राप्त करून देणारी, दिशा उजळणारी पहाट ठरेल. ही पहाट भारताला सोनेरी सकाळ नक्की दाखवेल,” असा माझा ठाम विश्वास आहे. हीच सकारात्मकता प्रत्येक भारतीयाने दाखवली, तर १३० कोटी लोकसंख्येच्या देशाचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. ‘आत्मनिर्भर भारता’ची वाटचाल प्रत्येकाला सामर्थ्य आणि सकारात्मकता देणारी व्हावी, हीच शुभकामना आहे.
 
संकल्प पाळायचा असेल तर तो नवी आशा, नवा उद्देश, नवा उजेड, नव्याची आस, नवे प्रेम, नवी मैत्री, नवीन नाती, नवीन आठवणी हे सगळे गुण हृदयाच्या एका कुपीत जपून ठेवत वर्षभर त्याचा सुगंध पसरत राहील आणि याने वर्षभर तो दरवळत राहील, यासाठी कायम तत्पर असायला हवे आणि या सगळ्यात आपल्यातील मानवी चेतना जागृत ठेऊन एकमेकांप्रति माणुसकी सांभाळत राहील व एकमेकांचे सुख-दुःखाचे साक्षीदार होत येणरे नवीन वर्ष सुखाचे समाधानाचे आनंदाचे व निरामय आरोग्याने तसेच मैत्रीपूर्ण प्रेमाने,नात्यातला विश्वासाने भरभराटीस जावो हीच सदिच्छा!
 
नव्या वर्षात...

एक संकल्प करूया सरळ,साधा, सोप्पा...
दुसर्‍याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा..

 - सर्वेश फडणवीस