सलग दोन वर्षे अर्थात २०१९ आणि २०२० दिल्लीच्या राजपथावर परेड बघण्याचे भाग्य लाभले आहे. २०२० ला बिटिंग रिट्रीट ही बघता आले आहे. ह्यावर्षी दूरदर्शनवर बघतांना सगळं आठवत होते. बऱ्यापैकी आजच्या दिवसाची सुरुवात प्रत्येक भारतीय सकाळी दूरदर्शनवर परेड बघूनच घालवतो. तो राष्ट्र कुळाचार झाला आहे. पण प्रत्यक्षात राजपथावर परेड बघणे म्हणजे पर्वणीच आहे. ज्या पद्धतीने दिल्ली नटलेली असते ते बघून आपण काही काळ भारावून जातो . तो जोश, उत्साह आणि राष्ट्रभक्तीने मंतरलेला तो परिसर बघतांना आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याबद्दल गर्व होतोच कारण त्या वातावरणात इतके मोहवून टाकणारे भव्य आयोजन म्हणजे ही परेड असते. सकाळी दिल्लीच्या थंडीत कुडकुडत परेड बघतांना काही तास राष्ट्रीय अस्मिता अधिक जागरूक झालेल्या असतात हाच अनुभव तिथं गेल्यावर येतो.
२६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्थापन झाले. अर्थात आपण भारतीय राज्य घटना स्वीकारून प्रजासत्ताक झालो. गेल्या ७१ वर्षात एखाद धोका सोडला तर भारतातील लोकशाही अगदी सुरळीत सुरू आहे. स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिले. संविधान प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे. खरं तर जे संविधान नागरिकांना भारतात जगण्याचा अधिकार देतो; तेच संविधान भारत संघराज्याच्या नागरिकांकडून काही अपेक्षा करते.
आपण जेव्हाही संविधानावर चर्चा करतो तेव्हा केवळ आपल्याला भारतीय नागरिक म्हणून मिळालेल्या हक्कांची चर्चा करतो. ते हक्क आपल्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाहीत, शिवाय ती हक्क हिरावून घेतली तर संविधानीक अथवा अगदी असंवैधानिक मार्गानेही तो मिळवण्यासाठी आपण भांडण्यास तत्पर असतो. संविधानाने आपल्याला समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्ध, धर्म स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क बहाल केले आहेत.
गणतंत्र आणि नागरिक हे एकमेकांसाठीच बनले आहेत. सुखी , समाधानी , सुरक्षित आणि शांत समाज जीवनासाठी आपली कर्तव्ये योग्य पद्धतीने पार पाडणे हेच प्रत्येकाचे लक्ष्य असले पाहिजे आणि हीच भावना जपत राष्ट्रहित सर्वतोपरी हेच उद्दिष्ट समोर ठेवून सार्वजनिक जीवनातील वाटचाल करावी लागणार आहे.
आपण आपल्या अधिकाराची मागणी करीत असताना आपली समाजाप्रती देशाप्रती असलेली कर्तव्ये सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत याचे भान सर्वांनी पाळल्यास एक सुखी , समृद्ध ,आणि गौरव – गरीमामय ,आत्मनिर्भर, विश्वगुरु भारत पुन्हा उभा राहील यात शंका नाहीच.
राष्ट्रीय सण म्हणून हा दिवस नक्कीच साजरा करावा. २६ जानेवारी आणि झेंडावंदन आणि राजपथावरील भारताची आन,बान,शान असलेली परेड हे एक वेगळेच समीकरण आहे .एक भारतीय म्हणून हा गौरव सोहळा बघताना अभिमान वाटावा अशी ही परेड. प्रत्येक भारतीयाने एकदा तरी हा सोहळा प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवावा. रक्षा मंत्रालय विविध संस्थेच्या माध्यमातून ह्याचे enclosure मिळवता येते. ज्या पद्धतीने ही परेड संपन्न होते तेथील प्रत्येक छोटी गोष्ट बघतांना ह्या देशाचे पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी बाळगणे म्हणजेच राष्ट्रहित जपणे होईल. खरंच गर्व होतो आपण भारतीय असल्याचा..
आयुष्यात एकदा तरी २६ जानेवारीची परेड बघायचीच.दिल्ली गाठायचीच. छान थंडीत ह्या राजपथावरील उत्साह अवर्णनीय असतो. खरं तर रोजची लढाई ,आपण सगळेच लढतो.पण लढायची शिस्त शिकवते ,ती ही परेड. परेड बघून शिस्तीत जगायला शिकतो तो माणूस, ही परेड बघून सगळे एक आहोत, सगळे सारखे आहोत.
सगळ्यांना बरोबर घेवून चाललात,की देश पुढे जाणार आहे ह्याची जाणीव होते. सीमेवर लढणाऱ्यांची आठवण करून देते, ती ही परेड. कौतुकसोहळा हा देशाचा,तो चुकवायचा नाहीच."
भारत माता की जय
वंदे मातरम !!
✍️ सर्वेश फडणवीस
#Memories #RepublicDay #Parade #Republicday2021
No comments:
Post a Comment