Saturday, January 2, 2021

वर्ष नवे संकल्प नवा...

नवीनतेची ओढ असणं हे मानवी मनाचे वैशिष्ट्य आहे. कुठलीही नवी वस्तू घरी येणार असेल, तर ती येईपर्यंत तिची ओढ ही असतेच आणि त्यामुळे घरातील वातावरणही एका वेगळ्याच आनंदात असतं. डिसेंबर महिना आला की चाहुल लागते ती नवीन वर्षाची. जगन्मान्य असलेल्या नवीन वर्षाच्या आगमनाची किंवा त्याच्या स्वागताची तयारी प्रत्येक जण करत असतो. जणूकाही सर्वत्र नवीन घडणार असल्यासारखं कायम वाटत असतं आणि तोच उत्साह आणि आनंद दरवर्षी असतो. २०२० हे वर्ष एका जागतिक महामारीत गेले, पण तरी आपण सकारात्मकता दर्शवत २०२० ला निरोप दिला. इतिहासात या वर्षाची नोंद होईलच, पण ते होत असताना भारताने जगाला जी दृष्टी दिली त्याची नोंद नक्कीच होईल.
 
‘नवीन वर्ष आणि नवा संकल्प’ हे सध्या एक समीकरण झाले आहे. प्रत्येक जण जमेल तसे येणारे नवीन वर्ष साजरे करत असतात. प्रत्यकाचे ते साजरे करण्याची पद्धत निराळी असू शकेल. पण, बर्‍यापैकी प्रत्येक जण काही तरी संकल्प करत असतो. पूर्ण करता येवो अथवा न येवो, पण नवीन वर्षाचा संकल्प घ्यायची तात्पुरती मजा तर वेगळीच असते. आपण काहीतरी चांगलं करणार, अशी भावना मनामध्ये राहते. बरेचदा एकमेकांसोबत विचारांचे आदानप्रदानही करत असतो. आता नवीन वर्ष सुरु झालं आहे, तर नवीन वर्षाचा संकल्प काय?

मुळात वर्षभराचा संकल्प घेणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं कठीण वाटतं. न ठरवता, न सावरता जगण्याची मजा काही वेगळीच असते. जी परिस्थिती येईल तिला समोर जायचं. म्हणजे निदान पूर्ण करण जमलं नाही तर निराशा येणार नाही. संकल्प करणं ही तशी चांगली गोष्ट आहे, पण ते पाळण्यासाठी संयम आणि शिस्त हे गुण ही अंगिकारले पाहिजे आणि त्यातूनच वर्षाच्या शेवटी पूर्ण न झालेल्या संकल्पसिद्धी बद्दल वाईट वाटणार नाही. आपलं आयुष्य कसं असायला हवं, हे आपल्याच हातात आहे. आजूबाजूला काहीही झाले तरी आपण जसे सयंत आणि सतर्क असतो, तसेच वर्षभर हीच सतर्कता जीवनात सकारात्मकता प्रदान करत असते आणि या सकारात्मक वाटचालीत संपूर्ण वर्ष आपल्याला आनंद व नवा उत्साह प्रदान करत असतो.

सध्या रघुनाथ माशेलकर यांचं पुस्तक वाचनात आहे. त्यात ते लिहितात,“पुढचं दशक हे बुद्धीचं, प्रज्ञेचं आहे, ज्ञानाचं आहे आणि भारतामध्ये त्याचं नेतृत्व करण्याची सार्थ क्षमता आहे. ज्यामध्ये भारत अद्वितीय बौद्धिक आणि आर्थिक महासत्ता म्हणून गणला जाईल. पूर्वीच्या सहस्रकात असलेले गतवैभव भारताला पुन्हा प्राप्त होईल. या दशकाची ही पहाट भारताला गतवैभव प्राप्त करून देणारी, दिशा उजळणारी पहाट ठरेल. ही पहाट भारताला सोनेरी सकाळ नक्की दाखवेल,” असा माझा ठाम विश्वास आहे. हीच सकारात्मकता प्रत्येक भारतीयाने दाखवली, तर १३० कोटी लोकसंख्येच्या देशाचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. ‘आत्मनिर्भर भारता’ची वाटचाल प्रत्येकाला सामर्थ्य आणि सकारात्मकता देणारी व्हावी, हीच शुभकामना आहे.
 
संकल्प पाळायचा असेल तर तो नवी आशा, नवा उद्देश, नवा उजेड, नव्याची आस, नवे प्रेम, नवी मैत्री, नवीन नाती, नवीन आठवणी हे सगळे गुण हृदयाच्या एका कुपीत जपून ठेवत वर्षभर त्याचा सुगंध पसरत राहील आणि याने वर्षभर तो दरवळत राहील, यासाठी कायम तत्पर असायला हवे आणि या सगळ्यात आपल्यातील मानवी चेतना जागृत ठेऊन एकमेकांप्रति माणुसकी सांभाळत राहील व एकमेकांचे सुख-दुःखाचे साक्षीदार होत येणरे नवीन वर्ष सुखाचे समाधानाचे आनंदाचे व निरामय आरोग्याने तसेच मैत्रीपूर्ण प्रेमाने,नात्यातला विश्वासाने भरभराटीस जावो हीच सदिच्छा!
 
नव्या वर्षात...

एक संकल्प करूया सरळ,साधा, सोप्पा...
दुसर्‍याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा..

 - सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment