इकोब्रिक्स नाव ऐकून काहींतरी वेगळं वाटेल पण नागपूरात अनेक महिन्यांपासून टाकाऊ प्लास्टिकपासून 'इकोब्रिक्स' बनवणे सुरू आहे. जुई पांढरीपांडे आणि तिची संपूर्ण टीम हे काम करत आहे.
प्लास्टिकच्या बाटल्या आणि अविघटनशील प्लास्टिक ह्यांचा वापर करून ह्या अभियानाला देशभरात प्रारंभ झाला आणि आज नागपूरातही ह्याची सुरुवात झाली आहे. जुईच्या ह्या कार्याची अनेकांना ओळख व्हावी आणि त्यातून काही प्रेरणा व्हावी ह्या शुद्ध हेतूने हे लेखन आहे.
काल जुई पांढरीपांडे ह्यांच्या टाईमलाईन वर ह्या संदर्भातील व्हिडिओ बघितला. कशी तयार होते ही इकोब्रिक्स ? स्वतः प्रॅक्टिकल करून दाखवत त्यांनी एक लहान इकोब्रिक्स तयार करून दाखवली. बघूनच आश्चर्य वाटलं. अहिल्या मंदिरात गेल्यावर सुद्धा अशा अनेक इकोब्रिक्स बघायला मिळाल्या होत्या पण तेव्हा त्याबद्दल इतकी माहिती नव्हती पण काल व्हिडिओ बघितला आणि त्यातून हे लेखन होतं आहे.
प्रत्येकाच्या जगण्यात वस्तूंचा वाढता वापर असल्याने टाकाऊ प्लास्टिकचे प्रमाणही खूप जास्त असते. त्यातही सामान्य माणसांच्या वापरात बहुतांश वेळा अविघटनशील प्लास्टिकच असते. कचऱ्यात समाविष्ट झालेले हे कमी जाडीचे प्लास्टिक वर्षानुवर्षे पृथ्वीवर भार बनून राहतात आणि पॉलिथिनसारख्या वस्तूंचे विघटन होण्यास तर साधारणतः ५०० वर्षांपेक्षाही जास्त वर्षे लागतात. या कचऱ्यावरच पर्यावरण संरक्षण संस्थेने 'इकोब्रिक्स' तयार करण्याचा उपक्रम राबविला आहे.
प्लास्टिकची पाण्याची किंवा शीतपेयांची बाटली याकरिता उपयोगात आणली जाते. त्यामध्ये प्लॅस्टिक आणि पॉलिथिनच्या वस्तू तसेच तुकडे, वापरलेले प्लास्टिक खच्चून भरले जाते. असे भरपूर प्लॅस्टिक भरलेल्या बाटलीला इकोब्रिक असे नाव देण्यात आले आहे. पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया न होणारे प्लॅस्टिक, वेफर्सची रिकामी पाकिटे, हेअरपिन्स, खाद्यपदार्थांचे प्लास्टिक अशा अनेक गोष्टी यामध्ये भरण्यात येतात. मात्र, दुधाच्या पिशव्यांसारखे पुनप्रक्रिया होऊ शकणारे प्लास्टिक, सडणारे खाद्यपदार्थ यामध्ये वापरले जात नाहीत. सुमारे शंभर चौरस फूट जमिनीवर पसरू शकतील, इतक्या प्लास्टिकला एका एक लीटरच्या बाटलीत भरता येऊ शकते. अशा भरलेल्या बॉटल्स कचऱ्यात टाकल्या तर कचरा संकलन करणाऱ्यांनाही ते सोयीचे ठरते. याशिवाय, त्यापासून, स्टूल, ट्री गार्ड, पुस्तके ठेवायला कप्पे,बसायला बेंच अशा विविध गोष्टी आकारास येऊ शकतात. आज पर्यावरण संवर्धन संस्थेने देशभरात याबाबतचे अनेक प्रयोग सुरू केले आहेत. डेहराडून येथे इकोब्रिक्स बगिचा तयार करण्यात आला आहे. दिल्लीत बचतगटातील महिलांच्या मदतीने इकोब्रिक्स फर्निचर तयार करण्यात आले आहे. रस्तेबांधणीतही त्यांचा उपयोग करण्यात आला आहे. आज नागपूर येथे विविध सोसायटी,कॉलनी मधील नागरिकांची मदत या कामासाठी घेण्यात येते आहे आणि अनेक नागरिक स्वतः ह्या कार्यासाठी पुढाकार घेत आहेत. ह्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण जुई पांढरीपांडे ह्यांच्या टाईमलाईनवर व्हिडिओ बघू शकता.
✍️ सर्वेश फडणवीस
#ecobricks
No comments:
Post a Comment