पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली कोरोना प्रतिबंधक लस #CovishieldVaccine देशात पोहोचवण्यासाठी काल सकाळी पुण्याहून निघाले. त्यावेळी अदार पुनावाला यांनी ट्विट केलेले फोटो बघितले. काही घटनांमध्ये इतकं साम्य असतं की आश्चर्य वाटतं. रघुनाथ माशेलकर ह्यांचे पुस्तक वाचतांना एक संदर्भ वाचला. त्यात माशेलकर सांगतात,
भारतातील ज्ञानाधिष्ठित औषधउद्योग यांना नवीन आंतरराष्ट्रीय स्वामित्व हक्काच्या परिप्रेक्ष्यात नवीन आव्हानं स्वीकारावी लागणार आहेत. आपल्या औषधउद्योगाच्या बाबतीतही नेमकी हीच स्थिती आहे. पन्नास वर्षापूर्वी औषधांचे आराखडे आयात करणारा आपला औषधउद्योग आज निर्यात करणारा झाला आहे. त्यामुळे त्यालाही जागतिक खुल्या स्पर्धेला तोंड द्यावंच लागणार आहे. जागतिक बाजारपेठेतील औषधउद्योग हा ज्ञानाधिष्ठित उद्योग आहे. त्यामुळे भारतीय औषधउद्योग हाही ज्ञानाधिष्ठित बनेल, त्याला पर्याय नाही.
आजपर्यंत नवीन एकही रेणू तयार न करता हा उद्योग तरलेला आहे. पण यापुढील काळात ते शक्य नाही. गेल्या चाळीस वर्षाच्या इतिहासात भारतातील या उद्योगाने केवळ चौदा नवीन रेणू शोधून काढले आहेत त्यापैकी ११ हे सी.एस.आय.आर.च्या संघांनी तयार केलेले आहेत. पण नवीन पेटंटच्या कालखंडात ही मनोवृत्ती आपण
बदलायला हवी. सत्तरच्या दशकामध्ये भारतीय पेटंट कायदा अस्तित्वात आल्यावर ज्याप्रमाणे मोठ्या ताकदीने आणि श्रद्धेने भारतीय औषध उद्योगाने कात टाकली, त्याच जोशाने त्यांनी आता काम करायला पाहिजे. ज्ञात असणाऱ्या औषधांच्या उत्पादनप्रक्रिया शोधत बसण्याऐवजी त्यांनी पेटंट मिळवता येतील अशा मूलभूत संशोधनासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत. त्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळांबरोबर त्यांनी एकत्र येऊन काम करायला काहीच हरकत नाही. एक धोरण म्हणून औषधउद्योग असंही करू शकतात की, त्यांनी नवीन औषधाचं क्लिनिकल पायरीपर्यंत संशोधन करून त्याच्या पुढील विकासासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांशी भागीदारी करून त्याचा परवाना मिळवावा. काही औषध कंपन्यांनी हे धोरण राबवायला कधीच सुरुवात केलेली आहे. आता त्याची फळंसुद्धा त्यांना चाखायला मिळत आहेत.
नवीन सहस्रक हे आशियाचं असेल आणि मला खात्रीपूर्वक वाटतं की, त्यामध्ये भारताला मोठी संधी आहे. भारताकडे असणारी बौद्धिक संपत्ती आणि त्या ज्ञानाचं अर्थकारण करण्याची मक्तेदारी असल्यावर भारत नक्कीच आर्थिक महासत्ता बनेल. लक्षावधी भारतीयांकडे, प्रत्येकाकडे म्हणून असणारी स्वतंत्र सर्जनशीलता जागृत होईल. आपण खूप काळपर्यंत भारताच्या क्षमतेविषयी बोलत आहोत. पण मला खात्री आहे की, सर्जनशील भारतीयांची ही सुप्त क्षमता एक दिवस नक्कीच सर्जनशील आणि उत्पादनक्षम गतिमान शक्तीमध्ये परावर्तित होईल. परिणामी भारतीय नीतीमूल्यांवर आधारलेला एकमेवाद्वितीय ज्ञानाधिष्ठित समाज भारतात आकाराला येईल.
वरील संदर्भ त्यांनी १४ जानेवारी १९९९ रोजी नवी दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल सेंटर मध्ये सी.डी.देशमुख स्मृतीप्रीत्यर्थ दिलेल्या व्याख्यानातील आहे. आज २२ वर्ष व्याख्यानाला झाली आहेत. दूरदृष्टी आणि नव्या भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कटिबद्ध असलेले डॉ. रघुनाथ माशेलकर ह्यांचा प्रत्येक शब्द प्रत्यक्षात खरा ठरतो आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#seruminstindia #AatmanirbharBharat #NewIndia #AdarPoonawalla #raghunathmashelkar
No comments:
Post a Comment