नागपूरहुन निघतांना बऱ्याचदा वर्धा,वणी किंवा हिंगणघाट भागात जातांना आपण बंगलोर किंवा कन्याकुमारी किलोमीटरच्या पाट्या वाचत असतो पण तिथपर्यंत जाणे कधी होईल ह्या विचारांत असतांना काही कामानिमित्त कर्नाटक राजधानी बंगलोरला जाणे झाले. प्रवास वर्णन वाचतांना जी मज्जा असते त्याहून अधिक ती अनुभवणं आल्हाददायक असतं. कोरोना महामारीतून हळूहळू गाडी पूर्वपदावर येत असतांना जवळपास वर्षभराने प्रवास झाला. हा प्रवास आनंद देणारा होताच कारण बदल हा मानवी मनाचा आनंद आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी तब्बल ३९०० किमी आहे. श्रद्धेय अटलजी ह्यांच्या स्वप्नातील हा महामार्ग म्हणजे दूरदृष्टी आणि व्यापक विचार ह्याचीच अनुभूती देणारा आहे. काश्मीर म्हणजे भारताचे उत्तर टोक आणि कन्याकुमारी म्हणजे भारताचं दक्षिण टोक आणि नागपूर म्हणजे zero mile. भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे तिथून किमी ची गणना होते असे ठिकाण आहे.
नागपूर सारख्या मध्यवर्ती ठिकाणापासून सुरूवात करत तब्बल ११०० किलोमीटर्सचा पल्ला कारने पार करत कुठेही न थांबता अवघ्या १३ तासांमध्ये हा प्रवास पूर्ण केला आहे कारण ज्या राष्ट्रीय महामार्ग ४४ वरून जाणे झाले तो सर्वोत्तम असाच आहे. हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला हवा ह्या हेतूने हे लेखन करतो आहे.
ड्रायव्हिंग हे आपल्यापैकी अनेकांचं पॅशन आहे. या पॅशनला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णत्व मिळाले आहे. तब्बल चार राज्यांच्या महामार्गावरून गाडी चालवणे म्हणजे खरंतर भन्नाट अनुभव आहे. आंध्र आणि कर्नाटक मधील रस्ते हे भारतातल्या सर्वोत्कृष्ट रस्त्यांपैकी एक गणले जात असल्याने हा प्रवास सुखद ठरला आणि गाडीने येण्याचा निर्णय योग्य ठरला असे मनोमन वाटले. आज फास्टटॅग मुळे टोलवर ही वेळ जात नाही. चांगल्या सोयीसाठी थोडे पैसे द्यावेच लागतील. फक्त बंगलोरच्या प्रचंड रहदारीमुळे थोडा वैताग आला कारण पक्के नागपूरकर असल्याने त्याची सवय नाही. पण ज्या वातावरणात आपण जातो तिथले होण्यात अधिक मज्जा असते ह्या भावनेने आलेल्या परिस्थितीला पण मनावर ताबा ठेवत शांततेत प्रवास झाला.
आज महामार्गावरून जातांना रस्ते,वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी ह्यांच्याबद्दल जी आदराची भावना निर्माण झाली त्याला शब्दांत मांडणे कठीण आहे. कारण महामार्गांचे जे जाळे त्यांनी सबंध देशभर विणले आहे त्यामुळे ते आदर्श आहेतच पण निवडणूकीतील एका मताची किंमत कळली आहे. आज महामार्गामुळे नितीनजी ह्यांच्याबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात त्यांनी एक आदराचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कामाची नोंद येणारी प्रत्येक पिढी घेईल हाच विश्वास आहे. नितीनजी ह्यांच्या कार्यालयात हा quote लागला आहे. "American roads are not good because America is rich, but America is rich because American roads are good" - John F Kennedy ह्यांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरवण्याचे त्यांचे कार्य उत्तरोत्तर सुरू आहे.
खरंतर आज हे रस्ते त्यांच्या रचनेमुळे सर्वोत्कृष्ट स्वरूपाचे झाले आहेत. त्यामुळे येथून प्रवास करताना योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे, पण ही गोष्टही लक्षात ठेवावी लागेल की, साधे वाटणारे रस्ते देखील कधी आपल्या जीवावर उठतील याची शाश्वती देता येत नाही. म्हणून रस्त्यावरचा प्रवास कोणताही असो लिमिटमध्ये गाडी पळवत आणि निसर्गाचा आनंद घेत प्रवास करणे अधिक श्रेयस्कर आहे. ह्याच प्रवासातील काही क्षण..
✍️ सर्वेश फडणवीस
#travel #roadtrip #RoadTrip2021 #NationalRoadSafetyMonth #NHAI
No comments:
Post a Comment