पद्मविभूषण,महाराष्ट्रभूषण,पुण्यभूषण श्रीमंत शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात बाबासाहेब या इतिहासपुरुषाने मराठी मनावर जे अधिराज्य गाजवले नव्हे मराठी मनांत एक आदराचे,आपुलकीचे स्थान निर्माण केले त्याला शब्दात व्यक्त करणे तसे कठीण आहे. कालपासून अनेकांचे व्हाट्स अँप आणि इनबॉक्स ला विचारणा झाली की बाबासाहेबांबद्दल काहीतरी लिही. बाबसाहेबांबद्दल लिहिणे सोपी नाहीच. खरंतर हा फक्त छोटासा प्रयत्न करतो आहे. बाबासाहेबांना जाणून घ्यायचे असेल तर प्रत्यकाने आपल्या मनाच्या दिवाणखान्यात "राजा शिवछत्रपती" हे द्विखंडात्मक चरित्र ठेवावें म्हणजे श्रीमंत बाबासाहेब समजू शकतील. शिवतपस्वी असलेले बाबासाहेब आज शताब्दी वर्षात पदार्पण करत आहेत. आंग्ल दिनांकानुसार २९ जुलै आणि तिथीनुसार नागपंचमी (१३ ऑगस्ट) या दोन्ही दिवसांचे औचित्य साधत बाबासाहेबांचा एक एक पैलू मांडण्याचा प्रयत्न करतोय. खरंतर हे शिवधनुष्य पेलणे कठीण आहे पण तरी जे वाचलं, जे २-३ भेटीतून जाणून घेतलं त्यांच्या परिचयाचे जे आहेत त्यांच्याकडून ऐकल्यावर आणि त्यातून सलग १५ दिवस लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.
आज सकाळपासूनच वातावरणात एक वेगळा बदल जाणवतो आहे. या माध्यमातून त्यांच्यावर जो शुभेच्छारुपी वर्षाव होतो आहे त्याने प्रसन्नता निर्माण झाली आहे. शरीराने जरी काही किलोमीटर दूर असलो तरी मनाने पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या पुरंदरे वाड्यात आहोत की काय इतका भास क्षणोक्षणी जाणवतो आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज' या ऐतिहासिक युगपुरुषाला आणि त्यांच्या कर्तुत्वाला साहित्याच्या,कथा,कादंबरी, नाटक, चरित्र, व्याख्याने या विविध रूपांमध्ये समर्थपणे साकारणाऱ्या एकमेवाद्वितीय श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आहेत. या यज्ञासाठी त्यांच्याच शब्दांतील आई जगदंबेच्या चरणी 'वरदान' मागून आपण सुरुवात करूया..
चंडिके दे,अंबिके दे,शारदे वरदान दे
रक्त दे,मज स्वेद दे, तुज अर्घ्य देण्या अश्रु दे।
वादळासह प्रलयलाटा मज सभोती उसळु दे
खांडवालित अग्नितांडव मांडवा या बिलगु दे
सोसण्या ती आग शक्ती अन् शिशूचे हास्य दे
चंडिके दे,अंबिके दे,शारदे वरदान दे।
आहुतीचे मंत्र गाण्या मज शिबीची शक्ति दे
परी सतीची मुग्धता दे, हा देह भगवा होऊ दे
आग ती भडकून उठण्या स्निग्धता अस्थीस दे
चंडिके दे,अंबिके दे,शारदे वरदान दे।
तृप्त मी शिवशक्तिच्या गानात झालो शारदे
मागणे काहीच नाही, एवढे वरदान दे
मम चितेने यात्रिकांची वाट क्षणभर उजळू दे
चंडिके दे, अंबिके दे, शारदे वरदान दे।
ब. मो. तथा बाबासाहेब पुरंदरे
✍️ सर्वेश फडणवीस
#शिवशाहिरांची_शंभरी
( खालील छायाचित्र प्रतापगडावरील श्री भवानी मातेच्या मंदिरात पूजा करतांनाचे आहे)
खुप छान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteलेखाच्या प्रतिक्षेतच होतो! ह्या युगपुरूषां बद्दल काही बोलणे म्हणजे, सूर्याला दीप दाखवण्या सारखे आहे. इतके उत्तुंग व्यक्तीमत्व आहे. त्यांना सादर नमन!
ReplyDeleteखरंच या श्रीमंत शिवशाहीरांविषयी सर्वेशजी आपणसारखेच लिहु शकतात.त्यांना विनम्र अभिवादन!त्यांचे जाणता राजा बघत असतांना डोळ्यातून घळघळा अश्रु येतात,अंगावर वीरश्रीचा रोमांच उभा राहतो.छत्रपतींचा काळ जगत असल्याचा भास होतो याच कार्याखातर जीवन झोकुन देणे हे त्यांचायासारखे तपस्वीच करु शकतात.आम्हाला त्याच्या दर्शनाचे भाग्य लाभले,शिवछत्रपतींचा काळ अनुभवता आला हेही आमचे भाग्य समजतो.
ReplyDeleteसादर प्रणाम!