Sunday, October 11, 2026

⚜️ संस्कृतशालिनी - वाग्देवी लीना रस्तोगी


आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय त्या आहेत वाग्देवी लीना रस्तोगी. संस्कृत साहित्यिका, व्याख्याता, संत साहित्य अभ्यासिका,अनेक ग्रंथ प्रकाशित सिद्ध लेखिका अशा नानाविध विश्वात रममाण असणाऱ्या तरी विदुषी या शब्दांत यथार्थपणे त्यांच्या कार्याचा गौरव करता येईल इतक्या प्रज्ञावान आहे. नुकतेच विद्यमान राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते लीना ताईंना केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयातर्फ डिलीट प्रदान केली गेली तसेच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने त्यांना ‘वाग्देवी’  नामाभिधानाने सन्मानित केले आहे. त्यांच्या संपर्कात आल्यावर "मूर्ती लहान कीर्ती महान" या म्हणीचे शब्दशः रूप अनुभवास येते. आज अनेक पुरस्कार प्राप्त असून सुद्धा प्रसिद्ध पराङ्गमुख राहत त्यांचे नियमित लेखन सुरू आहे. 

संस्कृत ही भाषांची जननी आहे. ती जनभाषा होती हे लक्षात घेऊन तिचे ज्ञानभाषा म्हणून असलेले महत्त्व आजही कायम आहे. भाषा हे निव्वळ अभिव्यक्तीचे साधन नसून ते मनुष्याच्या सामाजिक ओळखीचे एक महत्त्वाचे माध्यम असते. जात, धर्म, देश यांच्याबरोबरीनेच भाषा या संकल्पनेभोवती देखील सामूहिक अस्मिता विणली जाते. संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. सर्व भारतीय भाषांची जननी म्हणजे संस्कृत भाषा आहे आणि ह्या भाषेच्या प्रचार आणि प्रसार ह्यासाठी लीनाताई सदैव तत्पर असतात. संस्कृत एकांकिका, ललित, वैचारिक, सामाजिक लेखन आणि काव्यलेखनात हातखंडा आहे. संस्कृत भवितव्यम हे नागपूरातील संस्कृत भाषा प्रचारणी सभेचे मुखपत्र आहे. गेली ७५ वर्षांपासून प्रकाशित होत असलेले हे एकमेव वैश्विक संस्कृत साप्ताहिक आहे आणि विद्यमान प्रधान संपादिका म्हणून लीना ताई त्यातही कार्यमग्न आहे. 

आजचे युग हे विज्ञानाच्या चमत्काराचे युग मानले जाते. परंतु वैज्ञानिकांनाही थक्क करून सोडणारा,  तर्कापलीकडचा एक चालता बोलता चमत्कार या विसाव्या शतकातही घडला आहे. आपल्या महाराष्ट्रात घडला आहे आणि विदर्भात घडला आहे. प्रज्ञाचक्षु गुलाबरावमहाराज. लीनाताईंची संस्कृत, मराठी, हिंदी भाषेत गुलाबराव महाराजांवर विपुल ग्रंथसंपदा आहे आणि त्याविषयी कायमस्वरूपी भरभरून बोलत असतात. लीना ताईंचे गुरू स्वामी गोविंददेवगिरी ह्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर छायाचित्र काढण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि त्या क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले आहे.

आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेत त्या विशेष आमंत्रित असतात. अनेक विद्यालय, महाविद्यालय आणि विश्वविद्यालयात व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते, आजवर अनेक नाटय एकांकिका त्यांनी संस्कृत मध्ये लिहिल्या आहेत आणि रंगमंचावर त्याचे सादरीकरण सुद्धा झाले आहे. International centre for cultural studies ह्याच्या स्थापनेपासून त्या जुळून आहेत. आजही अनेक व्याख्यान व प्रवचनांसाठी त्यांचा देशभर प्रवास सुरु असतो. संस्कृत व संस्कृती विषयक चाळीस हुन अधिक मराठी ग्रंथ व अनेक संस्कृत ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे. नुकतेच बुकगंगा पुणे प्रकाशित रामगाथा पुस्तक प्रकाशित झाले आहे. संस्कृत मध्ये नारदीय कीर्तन त्यांनी सादर केले आहे. आजही अनेक संस्कृत व्याकरण कार्यशाळेत त्यांचा विशेष सहभाग असतो. त्यांच्या एका कृतीबद्दल कायम अप्रूप वाटते ते म्हणजे दर शनिवार हा त्यांचा मौनसाधनेचा आहे कारण संस्कृत भाषेच्या भवितव्याच्या दृष्टीने त्या सतत कार्यमग्न असतात. 

हिंदू धर्म तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणून प्राचीन दशोपनिषदांना मानले जाते. उपनिषदांना जरी वेदांत म्हणजे ‘वेदांचाच शेवटचा भाग’ असे म्हटले जाते तरी ते सयुक्तिक वाटत नाही. सध्या लीना ताईंची उपनिषदांची लेखमाला सुरू आहे. आजवर जेवढे उपनिषद ग्रंथ उपलब्ध आहेत त्याचा अन्वय, अर्थ आणि त्यावरील भाष्य लिहून ते प्रकाशित करण्याचे खूप मोठे कार्य त्यांचे सुरू आहे. 

डॉ.लीना रस्तोगी म्हणजे संस्कृत भाषेला मिळालेले एक मोठे देणं आहे. संस्कृत भाषेतल्या शीघ्र कवी म्हणून त्यांची ओळख यथार्थ होईल. या वयातला त्यांचा उत्साह आम्हा तरुणांनाही लाजवेल असा आहे. आजही त्यांचा संस्कृत संभाषणाचा आग्रह असतो. त्या म्हणतात की, ‘जिभेचा उत्तम व्यायाम म्हणजे संस्कृत उच्चारण आहे.’ संस्कृत शब्दसंपदेच्या त्या धनी आहेत. खरंतर त्यांना संस्कृत शब्दावलीचा चालताबोलता ज्ञानकोष म्हणणेच यथार्थ ठरेल. अतिशय नम्र, शालीन आपुलकी आणि सहजपणा यामुळे त्या आपल्याला वेगळ्या अशा वाटतच नाही. 

नव्वदीच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा त्यांच्या कार्याचा आलेख बघितला की थक्क होतो. बंगाली भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे. त्या म्हणतात की, बंगाली भाषा मुळात अतिशय मधुर आहे तर त्यातील साहित्य ही तसेच आहे. की-बोर्डच्या जमान्यात वही आणि पेनच्या साहाय्याने लेखन करणाऱ्या दुर्मिळ अशा लीना ताई एकमेव बघण्यात आहेत. सतत नवनवीन विषयावर अभ्यासपूर्ण शैलीत लेखन करणाऱ्या लीना ताईना अनुभवणे म्हणजे दैवीप्रतिभा हेच मनात येते. गाभारा मंदिराचा समृद्ध वारसा या पहिल्या पुस्तक प्रकाशनाला आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या लीना ताईंबद्दल विशेष आदर आणि प्रेम आहे. प्राकृत ज्ञानभाषा अर्थात संस्कृत भाषा आणि या ज्ञानभाषेची वाग्देवी हेच संबोधन त्यांना यथार्थपणे लागू होईल. वाग्देवी लीना रस्तोगी ह्यांना जगद्गजननीने निरामय आरोग्य प्रदान करावे हीच प्रार्थना आहे.

सर्वेश फडणवीस

#नवरात्र #लेखमाला #दिवस_दुसरा

Saturday, October 10, 2026

◆ वात्सल्यरूपिणी : विशुद्धानंद भारती

नवरात्रीच्या या जागर उत्सवात आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय त्या आहेत विशुद्धानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीच्या भारती ठाकूर. नर्मदेच्या किनाऱ्यावरील लेपा येथे पूर्णकालीन शिक्षणव्रती म्हणून त्या आजही कार्यमग्न आहेत. भारती ताईंचे काम अद्भुत आहे आणि त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. 

भारती ठाकूर. हे नाव नाशिकसाठी ओळखीचे आहे कारण त्या मूळच्या नाशिकच्या आहेत. साहसाची आवड असल्यामुळे अनेक ट्रेकिंग, सायकलिंग अशा मोहिमा त्यांनी फत्ते केल्या आहे. काही काळ विवेकानंद केंद्राचे पूर्णकालीन काम करण्यासाठी त्या आसाममध्ये गेल्या आहेत. कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्रात वास्तव्य असताना भरपूर वाचन, चिंतन,मनन,अनेक विद्वत मंडळींशी चर्चा यातून मनात वेगळेच काही तयार होत होते. अशातच त्यांना नर्मदा परिक्रमेची इच्छा झाली आणि पुढे परिक्रमा सुरू झाली.

१४ ऑक्टोबर २००५ ते १२ मार्च २००६ या कालावधीत त्यांनी परिक्रमा पूर्ण केली. ५ महिन्यांच्या या परिक्रमेत त्यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. केवळ निसर्गदर्शन,अध्यात्मिक अनुभव अशा गोष्टींचा विचार भारती ताईंच्या मनात नव्हता तर नर्मदेवर बांधल्या जाणाऱ्या धरणांमुळे लाखो वर्षांची प्राचीन परंपरा, नर्मदा खोऱ्यातील संस्कृती, वैविध्यपूर्ण जैविक संपदा धरणाखाली जाण्यापूर्वी डोळे भरून पहावी, त्याच्या नोंदी ठेवाव्यात या विचाराने त्यांनी परिक्रमा करण्याचे ठरवले. नर्मदा किनाऱ्यावरील लोकजीवन आणि नर्मदा माईच्या किनाऱ्यावरून मार्गक्रमण करताना स्वत:शीच संवाद साधावा हे कारण ही होतेच. त्यांनी अनुभवलेला निसर्ग,भेटलेली माणसे सारे काही टिपून ठेवले आणि तेच अनुभव पुस्तक रूपाने आपल्याला 'नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा' ह्या त्यांच्या अंतर्मनाशी झालेल्या संवादात वाचायला मिळतात.  

आपल्या परिक्रमेत त्यांना नर्मदा घाटीतल्या परिस्थितीची जाणीव झाली. नर्मदेच्या घाटात त्यांनी अनेक मुलांना शिक्षणाविना झगडताना पाहिले. अवघी पाच-सात वर्षांची ही मुले घाटात फिरून फुले विकायची, पैसे गोळा करायची, नारळ जमा करायची. हे सगळे वास्तव पाहून भारती ताईंना राहवले नाही आणि त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली. पुढे त्यांनी स्वत:ला या कामात पूर्णवेळ वाहून घेतले. नर्मदेच्या घाटात त्यांनी या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. सुरुवातीला हातावर मोजता येतील अशी मुले या शाळेत होती, आता या शाळेत जवळजवळ शेकडो मुले आहेत.

खरे सांगायचे तर हा शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. स्वत:च्या पेन्शनच्या पैशातून मंडलेश्वर येथे राहून रोजची दहा-बारा किलोमीटरची पायपीट करत आदिवासी मुले आणि महिलांसाठी त्यांनी कामाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनौपचारिक शिक्षण सुरू केले. सुरुवातीला त्यांनी एकटीने लढा दिला. मंडलेश्वर ते आजूबाजूच्या परिसरात, पाड्यांमध्ये जाऊन कुटुंबातील सदस्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अत्यंत गरिबीमुळे व नैसर्गिक परिस्थितीमुळे ही मुले शेतातील कामे करणे, गुरे चरायला नेणे यासाठी कुटुंबात मदत करत असत. लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी पण या मुलांवर होतीच. त्यासाठी कुटुंबाचे मन वळवून या मुलांचा शिक्षणाकडे ओढा वाढावा यासाठी भारती ताईंनी प्रयत्न केले. या सर्व निरपेक्ष भावनेतून चाललेल्या आणि नर्मदामैयाच्या आशिवार्दाने पुढे जाणाऱ्या कामातून एकेक माणूस जोडला जाऊ लागला. भारतीताई यांच्या प्रयत्नातून शाळेत आलेले विद्यार्थी त्यांना मदत करू लागले आणि या चळवळीला 'नर्मदा' या संस्थेचे स्वरूप प्राप्त झाले. ऑक्टोबर २००२ मध्ये 'नर्मदालय' संस्थेची स्थापना झाली आणि प्राथमिक ते हायस्कूल आणि आज व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून निमाड प्रदेशातील अनेक छोट्या मोठ्या खेड्यांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचले आहे.

आज नर्मदालयाचा प्रमुख उद्देश हा औपचारिक व अनौपचारिक शिक्षण,व्यवसायाभिमुख शिक्षण,आरोग्य आणि पर्यावरण या कामासाठी राहिला आहे. चांगल्या कामाला परमेश्वर पाठीशी असतोच इथं तर प्रत्यक्ष नर्मदा माई आहे. भारती ठाकूर ह्यांचे काम बघून तलवार बाबांसारख्या एका नागा साधूने त्यांच्या आश्रमाची जागा व बाजूची जमीन नर्मदालय संस्थेला दिली. या जागेवर रामकृष्ण शारदा निकेतन सुरू आहे आणि नुकतेच सुंदर असे रामकृष्ण - माँ सारदा आणि स्वामीजी यांचे मंदिर झाले आहे. आज औपचारिक शिक्षण व संस्कार याबरोबरच सुतारकाम, दुग्ध व्यवसाय, शेती, वेल्डिंग, माती परीक्षण याचे प्रशिक्षण देऊन हे विद्यार्थी ग्रामीण भागाशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडले गेले आहे. केवळ या भागातील वंचित कुटुंबातील मुलांना या शाळेत प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन व शिक्षण हे संपूर्णत: विनामूल्य दिले जाते. विशेष म्हणजे रामकृष्ण शारदा निकेतन लेपा पुनर्वास ही मध्य प्रदेशातील पहिली डिजिटल शाळा बनली आहे. अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग,डॉक्टर आदी पदवी प्राप्त करते झाले आहेत. या केंद्रांमध्ये शिक्षिका म्हणून अनेक ग्रामीण महिलांना रोजगार मिळाला आहे. या शिक्षकांना देण्यात येणारे ट्रेनिंग त्यांना संपूर्ण आयुष्यासाठी प्रेरक ठरत आहे. या सर्व उपक्रमांसाठी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता देणगी स्वरूपात रक्कम गोळा करून हा खर्च भागवला जातो आहे. 

नर्मदा संस्थेचा आणखी एक प्रकल्प म्हणजे 'नचिकेत छात्रावास'. आजूबाजूच्या पाड्यांवरून शिक्षणासाठी येणारी मुले या छात्रावासात राहतात. लेपा पुनर्वास भागात शाळा व छात्रावासाच्या नजीकच एक गोशाळेचा उत्तम प्रकल्पही चालू आहे. नर्मदा संस्थेतर्फे या भागातील महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी 'नर्मदा निर्मिती' नावाने शिलाई विभाग सुरू करण्यात आला आहे. यातील तयार वस्तूंना विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने विशुद्धानंद भारती ह्यांचा कार्याचा वटवृक्ष उत्तरोत्तर बहरतोय. अनेक पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्या पाठीशी आहे. गोष्ट नर्मदालयाची पुस्तक रूपाने आता उपलब्ध आहे. वाचनीय आणि भेट देण्यास सर्वोत्तम असें हे पुस्तक संग्रही असावे असेच आहे. त्यांच्या कार्याला कोटी नमन आहे. कवी बा. भ. बोरकर ह्यांच्या ओळींच त्यांच्या कार्यासाठी यथार्थ ठरतील...

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे ।। 
 
 सर्वेश फडणवीस 

#नवरात्र #लेखमाला #दिवस_पहिला