Sunday, October 11, 2026

⚜️ संस्कृतशालिनी - वाग्देवी लीना रस्तोगी


आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय त्या आहेत वाग्देवी लीना रस्तोगी. संस्कृत साहित्यिका, व्याख्याता, संत साहित्य अभ्यासिका,अनेक ग्रंथ प्रकाशित सिद्ध लेखिका अशा नानाविध विश्वात रममाण असणाऱ्या तरी विदुषी या शब्दांत यथार्थपणे त्यांच्या कार्याचा गौरव करता येईल इतक्या प्रज्ञावान आहे. नुकतेच विद्यमान राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते लीना ताईंना केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयातर्फ डिलीट प्रदान केली गेली तसेच कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने त्यांना ‘वाग्देवी’  नामाभिधानाने सन्मानित केले आहे. त्यांच्या संपर्कात आल्यावर "मूर्ती लहान कीर्ती महान" या म्हणीचे शब्दशः रूप अनुभवास येते. आज अनेक पुरस्कार प्राप्त असून सुद्धा प्रसिद्ध पराङ्गमुख राहत त्यांचे नियमित लेखन सुरू आहे. 

संस्कृत ही भाषांची जननी आहे. ती जनभाषा होती हे लक्षात घेऊन तिचे ज्ञानभाषा म्हणून असलेले महत्त्व आजही कायम आहे. भाषा हे निव्वळ अभिव्यक्तीचे साधन नसून ते मनुष्याच्या सामाजिक ओळखीचे एक महत्त्वाचे माध्यम असते. जात, धर्म, देश यांच्याबरोबरीनेच भाषा या संकल्पनेभोवती देखील सामूहिक अस्मिता विणली जाते. संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. सर्व भारतीय भाषांची जननी म्हणजे संस्कृत भाषा आहे आणि ह्या भाषेच्या प्रचार आणि प्रसार ह्यासाठी लीनाताई सदैव तत्पर असतात. संस्कृत एकांकिका, ललित, वैचारिक, सामाजिक लेखन आणि काव्यलेखनात हातखंडा आहे. संस्कृत भवितव्यम हे नागपूरातील संस्कृत भाषा प्रचारणी सभेचे मुखपत्र आहे. गेली ७५ वर्षांपासून प्रकाशित होत असलेले हे एकमेव वैश्विक संस्कृत साप्ताहिक आहे आणि विद्यमान प्रधान संपादिका म्हणून लीना ताई त्यातही कार्यमग्न आहे. 

आजचे युग हे विज्ञानाच्या चमत्काराचे युग मानले जाते. परंतु वैज्ञानिकांनाही थक्क करून सोडणारा,  तर्कापलीकडचा एक चालता बोलता चमत्कार या विसाव्या शतकातही घडला आहे. आपल्या महाराष्ट्रात घडला आहे आणि विदर्भात घडला आहे. प्रज्ञाचक्षु गुलाबरावमहाराज. लीनाताईंची संस्कृत, मराठी, हिंदी भाषेत गुलाबराव महाराजांवर विपुल ग्रंथसंपदा आहे आणि त्याविषयी कायमस्वरूपी भरभरून बोलत असतात. लीना ताईंचे गुरू स्वामी गोविंददेवगिरी ह्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर छायाचित्र काढण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि त्या क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले आहे.

आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेत त्या विशेष आमंत्रित असतात. अनेक विद्यालय, महाविद्यालय आणि विश्वविद्यालयात व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित केले जाते, आजवर अनेक नाटय एकांकिका त्यांनी संस्कृत मध्ये लिहिल्या आहेत आणि रंगमंचावर त्याचे सादरीकरण सुद्धा झाले आहे. International centre for cultural studies ह्याच्या स्थापनेपासून त्या जुळून आहेत. आजही अनेक व्याख्यान व प्रवचनांसाठी त्यांचा देशभर प्रवास सुरु असतो. संस्कृत व संस्कृती विषयक चाळीस हुन अधिक मराठी ग्रंथ व अनेक संस्कृत ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे. नुकतेच बुकगंगा पुणे प्रकाशित रामगाथा पुस्तक प्रकाशित झाले आहे. संस्कृत मध्ये नारदीय कीर्तन त्यांनी सादर केले आहे. आजही अनेक संस्कृत व्याकरण कार्यशाळेत त्यांचा विशेष सहभाग असतो. त्यांच्या एका कृतीबद्दल कायम अप्रूप वाटते ते म्हणजे दर शनिवार हा त्यांचा मौनसाधनेचा आहे कारण संस्कृत भाषेच्या भवितव्याच्या दृष्टीने त्या सतत कार्यमग्न असतात. 

हिंदू धर्म तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणून प्राचीन दशोपनिषदांना मानले जाते. उपनिषदांना जरी वेदांत म्हणजे ‘वेदांचाच शेवटचा भाग’ असे म्हटले जाते तरी ते सयुक्तिक वाटत नाही. सध्या लीना ताईंची उपनिषदांची लेखमाला सुरू आहे. आजवर जेवढे उपनिषद ग्रंथ उपलब्ध आहेत त्याचा अन्वय, अर्थ आणि त्यावरील भाष्य लिहून ते प्रकाशित करण्याचे खूप मोठे कार्य त्यांचे सुरू आहे. 

डॉ.लीना रस्तोगी म्हणजे संस्कृत भाषेला मिळालेले एक मोठे देणं आहे. संस्कृत भाषेतल्या शीघ्र कवी म्हणून त्यांची ओळख यथार्थ होईल. या वयातला त्यांचा उत्साह आम्हा तरुणांनाही लाजवेल असा आहे. आजही त्यांचा संस्कृत संभाषणाचा आग्रह असतो. त्या म्हणतात की, ‘जिभेचा उत्तम व्यायाम म्हणजे संस्कृत उच्चारण आहे.’ संस्कृत शब्दसंपदेच्या त्या धनी आहेत. खरंतर त्यांना संस्कृत शब्दावलीचा चालताबोलता ज्ञानकोष म्हणणेच यथार्थ ठरेल. अतिशय नम्र, शालीन आपुलकी आणि सहजपणा यामुळे त्या आपल्याला वेगळ्या अशा वाटतच नाही. 

नव्वदीच्या उंबरठ्यावर असताना सुद्धा त्यांच्या कार्याचा आलेख बघितला की थक्क होतो. बंगाली भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे. त्या म्हणतात की, बंगाली भाषा मुळात अतिशय मधुर आहे तर त्यातील साहित्य ही तसेच आहे. की-बोर्डच्या जमान्यात वही आणि पेनच्या साहाय्याने लेखन करणाऱ्या दुर्मिळ अशा लीना ताई एकमेव बघण्यात आहेत. सतत नवनवीन विषयावर अभ्यासपूर्ण शैलीत लेखन करणाऱ्या लीना ताईना अनुभवणे म्हणजे दैवीप्रतिभा हेच मनात येते. गाभारा मंदिराचा समृद्ध वारसा या पहिल्या पुस्तक प्रकाशनाला आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या लीना ताईंबद्दल विशेष आदर आणि प्रेम आहे. प्राकृत ज्ञानभाषा अर्थात संस्कृत भाषा आणि या ज्ञानभाषेची वाग्देवी हेच संबोधन त्यांना यथार्थपणे लागू होईल. वाग्देवी लीना रस्तोगी ह्यांना जगद्गजननीने निरामय आरोग्य प्रदान करावे हीच प्रार्थना आहे.

सर्वेश फडणवीस

#नवरात्र #लेखमाला #दिवस_दुसरा

No comments:

Post a Comment