Thursday, October 15, 2026

⚜️ सैन्यप्रचारिणी : अनुराधा प्रभुदेसाई

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय त्यांचे कार्य विशेष आहे. योगायोग असा की आजच राष्ट्र सेविका समितीच्या नागपूर महानगर विजयादशमी उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून अनुराधा प्रभुदेसाई उपस्थित राहणार आहे. चाकोरीबद्ध आयुष्य न जगता सीमेवर रक्षणासाठी सदैव तत्पर असणारा सैनिक व त्यांचे कार्य जनमानसात पोहोचवणारी सैनिकांची मावशी अर्थात अनुराधा प्रभुदेसाई. लक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या प्रखर वाणीने आणि संवेदनशील, प्रसंगी हळवी होत राष्ट्र जागृतीचा मंत्र देणाऱ्या अनुमावशीला एकदा तरी याची देही याची डोळा प्रत्यक्ष ऐकायला हवे. २००४ साली सुट्टीत फिरायला कारगिल येथे गेल्यावर आणि द्रास इथून प्रवास करत असताना भारतीय सेनेचा एक बोर्ड त्यांचे लक्ष वेधून घेते त्यावर लिहिलेलं असते..

“I only regret that, I have only one life to lay down for the country.” 

ते शब्द कुठेतरी त्यांच्या मनात खोलवर रुजतात. चौकशी केल्यावर त्यांना कळते, “आप को पता नही यहां तो हजारो लाशे गिरी थी” हे शब्द त्यांना आतून कुठेतरी अस्वस्थ करतात. आपले मुंबई मधील सुखवस्तू आयुष्य जगताना ज्या देशात आपण रहातो त्याच्या दुसऱ्या भागात काय झाले ह्याची सुतराम कल्पना मला नाही या अस्वस्थतेने मुंबईत परत आल्यावर कामाची दिशा ठरते आणि पुढे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. १९९९ साली कारगिलमध्ये भारत – पाकिस्तान युद्ध झाले; पण ती परिस्थिती आपल्याला जाणवली नाही. कारण अवघ्या २० ते २५ वयोगटातील तरुण मुलांनी युद्धभूमीवर आपले रक्त सांडले होते. आपला जीवाची पर्वा न करता आपल्या त्यागाने ह्या देशाची भूमी वाचवण्यासाठी प्रयत्न केला म्हणून आपल्या ठिकाणी सुखरूप आहोत. पण अनुराधा प्रभुदेसाईंचे मन आतून कुठेतरी त्यांना विचारू लागले की, तू या सीमेवरील जवानांसाठी काय करू शकते ? याच जाणीवेने त्यांनी कारगिलच्या विजय स्तंभाजवळ शपथ घेतली, ‘तरुण सैनिकांचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही. ह्या सैनिकांच्या बलिदानाची गाथा सामान्य नागरिकांपर्यंत नक्की पोहचवेन आणि त्यांचे कार्य सुरू झाले.’ त्यानंतर जो प्रवास सुरु झाला तो न थांबणारा आहे. 

कारगिल येथून परत आल्यावर अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून रक्षाबंधनाला कारगिल येथे येण्याची परवानगी मागितली. सगळे सोपस्कार पूर्ण करून अनुराधा प्रभुदेसाई रक्षाबंधनाला सैनिकांच्या भेटीला गेल्या. सैनिक आणि तिथल्या सगळ्यांसाठीच हे सगळे नवीन होते. एक सामान्य कुटुंबातील मध्यमवर्गीय स्त्री, आपल्या भेटीला इतक्या दूरवर सीमेवर येते ह्यातच सगळे काही आले होते. त्यानंतर सैनिकांशी जुळलेले नाते मग अजून घट्ट होत गेले.

लक्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी भारतीय नागरिकांना कारगिल आणि सीमावर्ती भागाचा प्रवास सुरु केला. ए.सी.रूम आणि महानगरात राहून सैनिक समजत नाही, तर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष युद्धभूमीवर पाय ठेवता तेव्हा कळते की इकडे एक पाऊल टाकणे पण किती कठीण असेल. अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी सैनिक आणि भारतीय नागरिक यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध निर्माण केले आणि आता कामाला प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अनेकांची मदत मिळते आहे.  

लक्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून आज भारतीय सैनिक आणि भारतीय नागरिक ह्यांच्या मधील दरी कमी करण्यासाठी अनेक उपक्रम राबावले जातात जसे युवा प्रेरणा, व्हॅलेंनटाईन माय सोल्जर, प्रत्येक सैनिक एक पणती, मिशन वीर यात्रा, दिवाळी- भाऊबीज विथ सोल्जर अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून काम सुरू आहे. मेरा देश मेरी पहचान हा कार्यक्रम लोकांना आपल्या देशाची जाणीव करून देण्यासाठी सुरु आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देशप्रेमाची गीते गायली जातात, देशाभिमानाच्या घोषणाही दिल्या जातात. पण जवानांसाठी प्रत्यक्ष कृती आपण काय करू शकतो, याचा विचार का मनात येत नाही, याची ताईंना खंत वाटते. 

अनुमावशीची विषय सांगण्याची शैली जोशपूर्ण असते आणि तो जोश आणि उत्साह त्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आहे याचा उल्लेख त्या आवर्जून करतात. सैन्यदलाचे कार्य प्रेझेन्टेशनमधून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवतांना उपस्थित प्रत्येकजण देशप्रेमाने भारावून गेलेला असतो. एक सामान्य स्त्रीने ठरवले तर काय करू शकते ते भारतीय सेनेतील प्रत्येक सैनिकाला समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न निःशब्द करणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले, तर आजही आपली छाती अभिमानाने भरून येते; कारण त्यांचा इतिहास सातत्याने बोलला जातोय. अगदी याप्रमाणे जवानांच्या शौर्यगाथा वेगवेगळ्या माध्यमातून तरुणांसमोर येत राहिल्या तर देशप्रेम नक्कीच पुन्हा जागे होईल. सैनिकाला, त्याच्या समर्पणाला सामान्य नागरिकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई यांना भारतमातेने दीर्घायुष्य द्यावे हीच तिच्याचरणी प्रार्थना आहे. 

सर्वेश फडणवीस

#नवरात्र #लेखमाला #दिवस_सहावा

No comments:

Post a Comment