आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय त्या आहेत डॉ.धनश्री लेले. सप्तमी तिथी ही सरस्वती पूजनाची तिथी आणि याच तिथीचे औचित्य साधत निवेदन, व्याख्याता आणि आता भागवतकथाकार म्हणून अग्रक्रमावर घेतले जाणारे नाव म्हणजे धनश्री लेले. अतिशय दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण निवेदन कसे असावे ह्याचा पायंडा आज धनश्री ताईंनी आपल्या निवेदनाने संपूर्ण भारत आणि भारताबाहेर अर्थात अमेरिका, दुबई आणि ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशात केले आहे. याबद्दल लिहितांना सुद्धा आज ऑस्ट्रेलिया येथे 'सण आणि संस्कृती' या विषयावर त्यांचे व्याख्यान सुरू असेल. आता त्यांचा अनेक देशात फॅन क्लब आहे. मेघदूत असो किंवा मग दासबोधातील विचार सौंदर्य, विनोबांचे विचार सौंदर्य असो किंवा मग विवेकानंद, गांधी, सावरकर, लोकमान्य, ह्यांसारख्या असंख्य अभ्यासपूर्ण व्याख्यानातून विषयाची सर्वोत्तम मांडणी करण्याचे पैलू त्यांच्या वाणींतून आपल्याला सहजपणे वेचता येतात. गीता, रामायण असो किंवा मग सकल संतांची ओवी असो या आणि यांसारख्या असंख्य विषयांवर आपल्या सारख्या श्रोत्यांना श्रवणानंद देण्याचे महत्कार्य धनश्री ताई करत आहेत. धनश्री ताईंचा व्याख्यानाच्या निमित्ताने होणारा प्रवास बघून थक्क व्हायला होते.
खरंतर काही माणसांना भेटल्यावर आपण भारावून जातो, काहींना भेटल्यावर प्रभावित होतो; पण फार थोड्या माणसांना भेटल्यावर आपले मन शांत होते. ज्ञानवर्धक, ज्ञानदायीनी, ज्ञानदा, विदुषी अशा अनेक बिरूदावली ज्यांना शब्दशः लागू होतील अशा धनश्री ताई आहे. संस्कृत, संतसाहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती, अध्यात्म, इतिहास, मराठी साहित्य अशा अनेक विषयांवर त्यांचा असलेला अभ्यास आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या सगळ्या ज्ञानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी विलक्षण आणि अद्भुत आहे. एखाद्या विषयाबद्दल भरपूर माहिती असणे आणि त्या माहितीच्या पलीकडे जाऊन त्या विषयाचा गाभा समजलेला असणे यात फरक असतो पण अत्यंत आपलेपणाने आणि इतका प्रचंड व्यासंग असूनही त्याचे ओझे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर कुठेही जाणवत नाही. उलट अत्यंत सहजता, प्रसन्नता आणि विलक्षण आत्मीयतेने त्या समोरच्याचे मन जिंकून घेतात.
अतिशय रसाळ, अभ्यासपूर्ण आणि श्रोत्यांना खिळवून ठेवणाऱ्या व्याख्यातांमध्ये आघाडीचे एक नाव म्हणजे धनश्री लेले असले तरी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक मानाचे पान असणाऱ्या धनश्री ताईंचे संस्कृत आणि मराठी भाषांबरोबरच उर्दू भाषेवरही तितकेच प्रभुत्त्व आहे. जर्मन या परकीय भाषेच्या सुद्धा त्या जाणकार आहे. कबीर असो किंवा सुफी, शायरी, अत्यंत अस्खलित उर्दू भाषेतील त्यांचे प्रभुत्व कौतुकास्पद आहे. घरी लहानपणी आईकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यांची आई शिक्षिका असल्याने वाणीचे संस्कार त्यांना घरातून मिळाले. कालांतराने डॉ. श्रीराम भातखंडे त्या त्यांच्या सरांकडून त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. प्रत्यक्षात सरांनी त्यांना पुस्तके देऊ केली, अनेक शंका दूर केल्या आणि त्यांच्या अनेक मुलाखतीत व्याख्यानांमध्ये सरांचा उल्लेख आवर्जून करतात. सिंघानिया शाळेत संस्कृत शिकवत असल्यामुळे त्या वेळी त्यांचे वाचन खूप झाले आणि आता व्याख्यानाच्या निमित्ताने खूप वाचन होते. त्या म्हणतात, ‘आपल्याला ऐकत असलेला श्रोता हुशार असतो. व्याख्यानात संदर्भ द्यावे लागतात. त्यासाठी अवांतर वाचन होते. भास आणि कालिदास याशिवाय संस्कृतला पर्याय नाही.’ त्यामुळे हे साहित्यही त्यांनी खूप वाचले. या वाचनामुळे त्यांची अभ्यासाची बैठक पक्की झाली आणि विषयाची मांडणी करताना, स्वतःचे वेगळे मत तयार होताना ते व्याख्यानात मांडते असे त्या आवर्जून सांगतात. त्यांच्या अभ्यासपूर्ण शैलीने श्रोता भारावून जात असला तरी सतत विविध विषयांवरील वाचन आणि अभ्यास हीच त्यांच्या वक्तृत्वाची विशेष खुबी आहे. धनश्री ताईंच्या व्याख्यानात वहीमध्ये नोंदी करणारा श्रोता गंगालहरीच्या वेळी प्रत्यक्षात अनुभवला आहे. त्यांच्या या टप्प्यावरील अभ्यास, मनन आणि चिंतनासाठी त्यांना नमन आहे.
'सोनचाफ्याची फुलं' आणि 'अलगद' ह्या त्यांच्या ललित लेखपर पुस्तकांतून त्या आपल्याशी सहज संवाद साधत आहेत असाच वाचकाला अनुभव येतो. आपल्या दैनंदिन जीवनात युट्यूबच्या माहिती आणि विचारांनी अधिक समृद्ध होत असतानाच धनश्री लेले ह्या नावाने वैचारिक वाङ्मय आणि वाणीची श्रीमंती प्रदान केली. आज त्यांच्या व्याख्यान आणि भागवतात तरुणही आवर्जून येतात त्यांच्या शंका विचारतात आणि यातूनच जे जे आपणास ठावे ते इतरांसी सांगावे..या श्लोकाला अनुसरून आजवर करत असलेल्या अविरत कार्यासाठी त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, त्यांना दिगंत कीर्ती मिळो, वागीश्वरीची कृपा जी त्यांच्यावर आहेच, ती अशीच निरंतर राहो आणि त्यांची सुमधुर अमृतवाणी सदैव आपल्या कानी पडत राहो हीच सरस्वती चरणी प्रार्थना आहे.
सर्वेश फडणवीस
#नवरात्र #लेखमाला #दिवस_सातवा
No comments:
Post a Comment