Saturday, October 17, 2026

⚜️ सेवाभाविनी : डॉ. मंदाकिनी आमटे

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय त्या आहेत डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे. पूर्वाश्रमीच्या मंदाकिनी वसंतराव देशपांडे पासून सुरू झालेला प्रवास डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे पर्यंत जाणून घेताना भारावून जातो. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेल्या सर्वसाधारण, सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात पण संस्कारी वातावरणात मंदाताईंचे लहानपण गेले. पुढे त्यांनी आपले डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले. भूलतज्ञ म्हणून आपले पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांची ओळख सर्जन असलेल्या डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी झाली. शस्त्रक्रियेच्या वेळी एकत्र काम करताना दोघांचे ऋणानुबंध जुळले ते कायमसाठी आणि तेथून बाबा आमटे यांनी दिलेल्या विलक्षण आणि जगावेगळी गोष्ट करण्याच्या ध्यासाने त्यांचा प्रवास सुरू झाला. स्वभावाने धाडसी असलेल्या मंदाताईंना कोणतीही नवीन गोष्ट शिकून घेण्याकडे त्यांचा कल होता. त्यांच्या तरुण वयात त्या उत्तम स्कूटर चालवत होत्या. लग्नानंतर साडीने पोहायला त्या शिकल्या आणि पुढे सुदूर प्राण्यांच्या गोकुळात त्या रमत गेल्या. मंदाताईंना त्यांच्या संसारात उत्तम माणसे भेटत गेली आणि ताईंचे जीवन भरारी घेण्यासाठी सज्ज होत गेले. 

आपण फक्त विचार केला तरी थक्क होतो. पण कल्पना करा की, दार नसलेले घर, वीज नाही, शुद्ध पाणी नाही अशी कोणतीही व्यवस्था नसलेल्या ठिकाणी मंदाताईंनी एका नवीन जीवनाची सुरूवात केली. माडीया-गोंड जमातीतील आदिवासी लोक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो लांब होते. भ्रामक समजुती आणि अंधश्रद्धा अश्या विळख्यात अडकलेल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे महत्वपूर्ण जबाबदारीचे काम होते. एकतर हे लोक दुसऱ्या लोकांच्या जवळ जायला घाबरत असत याशिवाय त्यांची भाषा वेगळी होती. भाषा शिकून त्याचवेळी कोणत्याही सुविधांपासून वंचित असलेल्या ठिकाणी घर चालवणे हे त्याहून कठीण काम होते. आपल्या जोडीदाराबरोबर त्याच्या सगळ्या निर्णयात ठामपणे उभे राहून समाज सेवेचे अविरत व्रत स्वीकारण्यासाठी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी किती त्याग केला असेल. १९९५ साली मोनॅको या देशाने डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेताना त्यांच्यावर एक पोस्टल स्टॅम्प काढला असा सन्मान मोनॅको या देशाकडून मिळवणारे आमटे कुटुंब हे जगातील दुसरे व्यक्तिमत्व होते. २००८ साली त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्यावेळी डॉ. प्रकाश आमटे यांच्यासोबत डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेतली गेली. पद्मश्री मिळवणारे पहिले दांपत्य म्हणूनही ते अलंकृत झाले आहे. 

प्रसंगी बंड, अदम्य साहस व करूणा हेच तीन गुण जग बदलायला आवश्यक असतात आणि हे तिन्ही गुण एकत्र असणारी माणसे दुर्मिळ असतात. पण हीच माणसे आपले जग बदलतात. आज हेमलकसा जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागले आहे. या दाम्पत्याच्या कार्याला जवळून बघण्याचे भाग्य लाभले आहे. आतापर्यंत अनेकदा हेमलकसा येथे जाणे झाले. दिवाळीत सुद्धा एक दिवस तिकडे जाऊन आलो त्यामुळे ऋणानुबंध आणि जवळीक निर्माण झाली आहे. नागपूरला आले की अशोकवनात या दोघांशी छान गप्पा आणि त्यांच्या प्रवासाला अधिक जाणून घेण्याचे भाग्य लाभते. मंदाताईंनी गाभारा मंदिराचा समृद्ध वारसा पुस्तक वाचून कळवले होते. हेमलकसाचा प्रवास शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. 'श्रम ही है श्रीराम हमारा' असं म्हणणार्‍या बाबा आमटे ह्यांनी वरोराच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर 'आनंदवन' उभारले. डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे हे गेली अनेक वर्षं भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून प्रयत्नरत आहे. सार्थक सहजीवनाच्या प्रकाशवाटेने चालणाऱ्या मंदाताई म्हणजे समईतील मंद तेवणारी पण प्रकाशमान ज्योत आहे. प्रेम आणि त्याग हेच या सहजीवनाचे सूत्र आहे. 

आज समाजात इतकी उंची गाठल्यावर पण गर्वाचा लवलेश किंवा अभिमान त्यांच्या वागण्यातून कुठेच दिसत नाही. एक सामान्य स्त्रीसुद्धा आपल्या कर्तृत्वाने असामान्य कामगिरी करू शकते, एकाचवेळी अविरत समाजसेवेचे व्रत करताना असंख्य अडचणींना सोडवत सगळ्याच पातळीवर एक आदर्श जीवन जगू शकते. या 'अंधाराकडून उजेडाकडे' झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. प्रत्येक नात्याच्या वलयात राहून सुद्धा आपलेपणा आणि ममत्वाने अनेकांची मने जिंकणाऱ्या डॉ. मंदाकिनी आमटे यांना भगवती जगदंबेने दीर्घायुष्य द्यावे हीच तिच्या चरणी प्रार्थना आहे आणि मंदाताई यांना साष्टांग नमस्कार आहे. बा.भ.बोरकर यांच्या जीवन त्यांना कळले हो या कवितेतील या ओळी ताईंना यथार्थ लागू होतील , 

जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो
चराचरांचे हो‍उनि जीवन, स्‍नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो 

सर्वेश फडणवीस 

#नवरात्र #लेखमाला #दिवस_आठवा

No comments:

Post a Comment