आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय या नावातच प्रेम, आपुलकी, ममत्व आणि वात्सल्याची भावना जाणवते. त्यांच्या साहित्यातून आणि व्यक्तीमत्त्वातून त्या किती उंचीवर आहेत हे लक्षात येते. यशाच्या शिखरावर असून सुद्धा साधेपणा कसा जपायचा याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती. यांना प्रत्यक्ष भेटण्याची मनोमन इच्छा आहे. यांची ग्रेट भेट बकेट लिस्ट आहे. योग आला तर येणाऱ्या वर्षात ती पूर्ण व्हावी हीच सदिच्छा आहे. वाचनाची आवड निर्माण झाल्यापासून सुधा मूर्ती यांच्या लीना सोहोनी अनुवादित प्रत्येक पुस्तकातून ती आवड अधिक वाढली. सुधा मूर्ती यांचे पुस्तक, कादंबरी ह्याने कायमच त्यांच्याबद्दलचा आदर नेहमी अधिकाधिक वाढत होता आणि आता त्या आदराने त्यांच्याप्रती एक आत्मीयभाव आणि प्रेम निर्माण झाले आहे.
सुधा मूर्ती यांच्या पुस्तकातील प्रत्येक कथा या त्यांच्यासोबत प्रत्यक्ष घडलेल्या असल्यामुळे त्या सत्य घटना आहेतच पण त्याचे वर्णन त्यांच्या खास शैलीतील नेमक्या शब्दात आणि नेमक्या पद्धतीने केलेली मांडणी आणि मुख्य म्हणजे त्या कथा सकारात्मक विचार देणाऱ्या आहेत आणि वाचतांना त्या वाचकांना अधिक प्रभावित करतात. त्या मूळ कन्नड भाषेत लिहीत असल्याने त्यांच्या अनुवादित पुस्तकांतूनही तोच भाव जाणवतो. त्या कायम म्हणतात, मी देवकी असली तर माझ्या अनुवादिका या यशोदा आहेत. कारण मला जे म्हणायचं असतं ते त्या अनुवादित कथेत योग्य मांडतात. म्हणून आज सगळ्या भारतीय भाषांमध्ये त्यांची सगळी पुस्तकं अनुवादित होतात.
सुधा मूर्ती यांना एका मोठ्या वृत्तपत्रातून स्तंभलेखनाचा मान मिळाला आणि आज तब्बल अर्धा शतकाहुन अधिक पुस्तकांच्या माध्यमातून त्या अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत. 'वाइज अँड अदरवाइज’ पासून सुरू झालेल्या प्रवासाने आज फार मोठा यशस्वी पल्ला गाठला आहे. देशातल्या तरूणांसाठी आणि खासकरून आज तरुण मुलींसाठी त्या एक रोल मॉडेल आहेत. इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका असलेल्या सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकातील शिगगाव येथे झाला. सर्वसाधारण मध्यम वर्गीय एकत्र कुटुंबातील असलेल्या सुधा मूर्ती यांना बालपणापासूनच वाचनाची आवड आहे. त्या शालेय जीवनापासून हुशार आणि त्यांनी त्यांचा पहिला नंबर कधीही सोडला नाही. इंजिनिअरिंग शिक्षण सुवर्ण पदकासह प्राप्त केल्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षिका म्हणूनही कार्य केले. कालांतराने भारतातल्या सगळ्यात मोठ्या गाड्या बनवणाऱ्या टाटा स्टील कंपनीत पहिल्या महिला इंजिनिअर म्हणून नोकरी करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांना नारायण मूर्ती यांची भक्कम साथ मिळाली.
एका मुलाखतीत त्यांनी खूप छान किस्से सांगितले, त्यात त्या म्हणतात, आपली कंपनी काढण्याचा निर्णय नारायण मूर्ती यांनी घेतला, त्यावेळी जमवलेले १०,००० रुपये त्यांनी इन्फोसिस च्या निर्मितीसाठी दिले. ते देताना त्यांनी नारायण मूर्ती यांना सांगितले की पुढली ३ वर्ष घराची पूर्ण काळजी आणि खर्च मी बघेल तुम्ही आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. नारायण मूर्ती यांनी सुरवातीला आपल्या घरीच इन्फोसिसचे ऑफिस बनवले असताना सुधा मूर्ती यांनी वालचंद ग्रुप मध्ये जॉब करायला सुरवात केली. एकाच वेळी जेवण बनवणारी, घर सांभाळणारी त्या सोबत एक क्लार्क आणि इन्फोसिसची प्रोग्रामर अश्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी नारायण मूर्ती यांना इन्फोसिसच्या उभारणीत पूर्ण सहकार्य केले. इतका प्रचंड पैसा असताना सुद्धा अगदी साधं आयुष्य जगण्यात सुधा मूर्ती यांना आत्मिक समाधान मिळतं असं त्या कायम सांगतात. 'साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी' ह्याचे चालते बोलते मूर्तिमंत उदाहरण म्हणेज सुधा मूर्ती. आयुष्याच्या प्रवासातील प्रत्येक टप्यावर त्यांच्या संपर्कात येणारी, त्यांना भेटणारी माणसं त्यांच्यासाठी आपली होती आणि टाटा सोडताना जेआरडी टाटा यांनी सुधा मूर्तीना काही उपदेशाचे बोल सांगितले होते. ज्यावर सुधा मूर्ती आजही यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.
सुधा मूर्ती ह्यांची आणखीन एक ओळख म्हणजे त्यांचं अफाट वाचन आणि त्यांनी लिहिलेली वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके आहेत. कौटुंबिक, प्रेम, काल्पनिक, तसेच सामाजिक विषय अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी भारत सरकारने त्यांचा २००६ साली राष्ट्रपती अब्दुल कलमांच्या हस्ते 'पद्मश्री' ने गौरव केला आणि आता विद्यमान सरकारने २०२३ मध्ये पद्मभूषण देत सन्मान केला. मुळात त्यांचे कर्तृत्व इतके मोठे आहे, अशांना पुरस्कार दिला, तर तो त्या सन्मानाचा सन्मान होतो. काही व्यक्तींचं कर्तृत्व आणि उंची दिलेल्या सन्मानाने उजळून निघतात. पण काही असे असतात, की ज्यांची उंची गाठणं पुरस्कारालाही शक्य होत नाही. पुरस्कार दिल्याने अथवा न दिल्याने त्यांच्या स्थानात आणि कर्तृत्वात कोणताच फरक पडत नाही. त्यांचं स्थान त्या ध्रुव ताऱ्यासारखं स्थिर, अढळ असतं आणि हाच विचार सुधा मूर्ती यांना पद्मभूषण जाहीर झाल्यावर नकळत मनात आला.
आजवर प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला असून अभियंता, शिक्षिका, लेखिका, समाजसेविका, उद्योजिका, सॉफ्टवेअर इंजिनिअर, क्लार्क, ट्रस्टी, गृहिणी, आई अश्या नवंरत्नांनी अलंकृत असलेल्या आणि आता राष्ट्रपती मनोनीत राज्यसभा खासदार म्हणून नवी जबाबदारी संपूर्ण समर्पण भावनेतून वहन करणाऱ्या सुधा मूर्ती आहे. प्रत्येक भूमिकेला पूर्ण न्याय देत जगातील सर्व मातृशक्तीसाठी आदर्श निर्माण करणारी ही स्वयंसिद्धा आम्हाला प्रेरणादायी आहे. सुधा मूर्ती आपणांस साष्टांग नमस्कार आहे. आपण करत असलेले कार्य सतत वर्धिष्णू राहावे हीच आई नवदुर्गेच्या चरणी प्रार्थना आहे.
सर्वेश फडणवीस
#नवरात्र #लेखमाला #दिवस_नववा
No comments:
Post a Comment