आज गुरुपौर्णिमा !! 🙏🏼🌺🙏🏼
अतीव प्रेमादराने,कृतज्ञतेने करुणा भाकण्याचा शिष्यांचा हक्काचा दिवस. श्री सद्गुरू म्हणजे माया,ममता,प्रेम आणि वात्सल्याने प्रत्येक शिष्यावर कृपेचा वर्षाव करणारी माउली. श्री सद्गुरू म्हणजे चालते-बोलते ईश्वरच म्हणता येईल .आपण सारे 'गुरु' या शब्दाचे महत्त्व जाणतोच. गुरु शिष्याला आत्मसाधन देतात व त्याला आत्मसाक्षात्कारी बनवतात व पुढे त्याचे आत्मकल्याण ही करतात.
मी ज्या परंपरेचा पाईक आहे त्याबद्दल आज लेखन करतो आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्यापासून श्री.पूर्णानंद महाराज,श्री.रामानंद महाराज,श्री.माधवराव महाराज व विद्यमान पीठाधीश श्री.दाजी महाराज या श्री सद्गुरु परंपरेचा पाईक झालो.
पाटणबोरी हे गाव यवतमाळ जिल्यातील केळापुर तालुक्यातील पांढरकवड्यापासून आंध्रप्रदेशच्या वाटेवर वसलेले आहे. यांच गावात पांच पिढ्यांपासून मठाची परंपरा आजतागायत चालू आहे.१९०९ च्या दसऱ्याला मठात चतुर्थ दत्तावतार प.पू.श्री.वासुदेवानंद सरस्वती आले आणि तेथेच त्यांनी श्री गुरुचरित्र पारायण करण्याची आपली मनीषा बोलून दाखवली. प.पू.श्री.टेंबेस्वामी यांनी आठवडाभर मुक्काम केला नि पारायण केले. रोज गावात भिक्षा मागून ते आपला उदरर्निर्वाह चालवत.
प.पू.श्री.माधवराव महाराज यांच्या अवतार समाप्तीनंतर श्री मठाची धुरा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव थोर अवतारी पुरुष संतश्रेष्ठ श्री दाजी महाराज सांभाळत होते. २८ ऑगस्ट २०१८ ला महाराजांनी आपली अवतार लीला समाप्त केली. आज श्री सद्गुरू देहरूपाने नसले तरी तत्वरूपाने सदैव आहेत याची प्रचिती कायमच असते.
नांदेड जिल्यातील (धनगर) टाकळी येथील टेंबेस्वामींचे समकालीन दाजी महाराज यांनी सांगून घेतलेला हा पुनर्वतार आहे. त्यावेळी त्यांनी माधवराव महाराज यांना सांगितले होते की मला आठव्या वर्षी सर्पदंश होईल. त्याची कथा ही विस्तृतपणे देतो आहे.
श्री.दाजी महाराज व नागसर्प यांचा फार जवळचा संबंध दिसून येतो.त्यांच्या जन्मवेळी नागराजाने दर्शन दिले होते.त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी ते नागपूर येथे श्री दादाजी काळू यांच्या घरातील विहरीवर कपडे धूत असताना साबणाची वडी दोन फर्शांच्या मधल्या सांदित पडली.ती उचलताना अत्यंत विषारी नागाने त्यांच्या तर्जनीस दंश केला.साबणाच्या वडीसोबतच बोटामध्ये दात रुतलेल्या अवस्थेत तो नाग वर आला.परंतु विष शरीरात भिनले नाही,ते तर्जन व मध्यमा यांच्या सांध्याजवळ तसेच गोठून राहिले. ती जागा विषाप्रमाणे काळी पडलेली दिसत असे.
श्री.दाजी महाराज यांची राहणी नेहमी साधी व नीटनेटकी असते. धोतर,कुर्ता,उपरणे व काळी टोपी असा त्यांचा अगदी साधा वेश असतो. सोवळे अत्यंत कड़क. पण आजच्या आधुनिक युगातील व्यक्तींना जाच होणार नाही यावर त्यांचा कटाक्ष असे. प. पू. महाराजांचा स्वभाव अगदी मितभाषी होता. बोलणे मोजकेच होते. आवश्यक त्याच्याशी आवश्यक तेवढेच. विनाकारण चर्चा,तर्क-कुतर्क,त्यांच्या स्वभावास पटत नसे. त्यांच्या मनाचा मोठेपणा थक्क करुन सोडणारा होता. वृत्ती टोकाची क्षमाशील होती. त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान ज्यांनी राबवले त्यांच्याठाई सुद्धा ममत्व कमी झाले नाही.’निंदकाचे घर असावे शेजारी’ आणि ‘झाकली मूठ स्व्वालाखाची’ही त्यांची महत्वाची जीवनसूत्रे राहीले होते . निर्लेप,निरपेक्ष,निस्पृहवृत्ती.त्यांच्या सद्गुरु तीर्थरूपांच्याच तोडीची होती .व्यवहार दक्षताही तशीच होती. गृहस्थाश्रमाचे आचरण करीत त्यांनी मोक्षसाधना केली तरी संसाराकडे किंचितही दुर्लक्ष केले नाही.
श्री.दाजी महाराजांच्या आत्मिक,अध्यात्मिक व यौगिक सामर्थ्याची चर्चा केलेली,स्तुती केलेली त्यांना अजिबात आवडत नसे.पण तरीही शिष्याने असे केले तरी मातृवत प्रेमाने त्याचे कौतुकच करत असत.
प.पू.सद्गुरुंचा साधकाने साधन करावे हाच अट्टाहास होता.कायम दिलेले साधन नित्य नियमित करण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. ते स्वतः ते करत असत आणि शिष्यांकडून ही करवून घेत असत. अशा सद्गुरूंची प्राप्ती होणे ही दैवी कृपा आहे असेच समजतो. एक तप त्यांचा सहवास आणि त्यांची कृपा हे ही शब्दांत न मांडणारे आहे.
असंख्य शिष्य,साधक,आणि भक्तांवर आपल्या कृपेची साऊली कायम राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.
केवळ भाग्यवंतासच श्री सद्गुरुंची प्राप्ती होते. त्याहीपेक्षा ते भाग्यवंत ज्यांना सद्गुरुसेवेची संधी मिळते. त्या भाग्यवंतात अगदीच थोड़े असे परमभाग्यशाली असतात ज्यांना श्रीगुरुकृपा लाभते. गुरुकृपेशिवाय जीवन व्यर्थ आहे. श्रीसद्गुरुकृपेशिवाय
सन्मार्गाचे ज्ञान नाही.ज्ञानाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही.
राहो सदैव रसना रत राम नामी ।
नेवो प्रभो मजसी शेवटी सौख्य धामी ।
हे एवढे करी न वेळ दिनासी द्याया ।
दाजी गुरू नमन हे तव दिव्य पाया ।।
।। श्री सद्गुरूचरणार्पणमस्तु ।।
✍️ सर्वेश फडणवीस
#गुरुपौर्णिमा
No comments:
Post a Comment