Tuesday, March 17, 2020

नर्मदेचा 'भेडाघाट' !!

सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं
द्विषत्सु पापजातजातकादिवारिसंयुतम् ।
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ।। 

आदि शंकराचार्य यांनी नर्मदाष्टकात नर्मदेची स्तुती केली आहे. ही स्तुती म्हणतांना सुद्धा नर्मदा आणि तिचा खळखळणारा आवाज आजही मनाला रुंजी घालत असतो. नर्मदा, अखंड,वैराग्य आणि आनंद देणारी नदी. नर्मदा नदी जगातल्या प्राचीन नद्यांपैकी एक. धार्मिक व आध्यात्मिक कारणासाठी जगामध्ये एकमेव नदी जिची संपूर्ण प्रदक्षिणा आजही आपण करू शकतो. ठराविक यम-नियम पाळून हीची प्रदक्षिणा नक्कीच अंतर्मुख करते कारण नर्मदा नदी ही आनंददायिनी,सुख व कल्याण करणारी आहे. 

नर्मदेचा सुंदर किनारा,किनाऱ्यावरची वनं, विस्तीर्ण होत जाणारे तिचे पात्र,साधू संतांच्या तपसाधनेने पवित्र झालेला परिसर म्हणजे नर्मदा नदी आणि ह्याच नर्मदेवर पुढे संगमरवरी चमत्काराच्या भेडाघाट चा ​"धुवांधार" धबधबा आहे. स्तिमित कारणा-या ​संगमरवरी पहाडांचे अभूतपूर्व​ दर्शन घडवणा​-या​ भेडाघाटला ​नर्मदा​ अर्धवर्तुळाकृती कड्यावरून ​​"धुवांधार" या अतिव सुंदर धबधब्या च्या रुपात खाली झेपावते. शुभ्र फेसाळत्या पाण्याचा हा धुवांधार उंचीने कमी असला तरी जलप्रपात सौंदर्यात मात्र सर्वोत्तम आहे नायगरा ची आठवण करून देणारा आहे.​ ​दगडगोट्यांवरून तोल सावरण्याची कसरत करत,​ ​तुषार अंगावर घेत, जल​ ​धुक्यात वेढलेला लावण्यमय​ धुवांधार जवळून ​बघणं​​ हा एक रोमांचक अनुभव दरवेळी आनंद देत असतो. उंची कमी असल्याने तो पावसाळ्यात नदीचं पाणी वाढल्यावर  लुप्त होवून जातो. 

धुवांधार ला गाजावाजा करत मोठया आवेशात उडी मारणारी नर्मदा नंतर संगमरवरी कड्यांच्या बंधनात जखडल्यावर एकदम शांत होते. आकाशात झेपावणारे नर्मदातटाचे शेकडो फूट उंचीचे हे संगमरवरी खडक सौंदर्याच्या​​ ​चमत्काराचे आल्हाददायक दर्शन घडवतात. नर्मदेच्या ​पारदर्शी,​नितळ, संथ पाण्यात पडलेल्या या कड्यांच्या वैविध्यपूर्ण  नयनमनोहारी जलदृष्य देखावे मन मोहून घेतात. दिवसा, चकाकत्या सूर्यप्रकाशात हे दृश्य अधिकच झळाळून आकर्षक होते; तर चांदण्यारात्री या खडकांची दिसणारी शोभा काही औरच असते आणि ती अनुभवण्यासाठी एकदा शरद पौर्णिमेच्या रात्री शारदीय चांदण बघायला भेडाघाटला नक्की जायला हवे.  

भेडाघाटच्या पुढे पंचवटीत पाऊण तासाचा नौकाविहार ही महा विलक्षण अनुभूती आहे. पांढ-या खेरीज गुलाबी,निळसर नटलेले हे संगमरवरी कडे,काही ठिकाणी गडद रंगांच्या भेगा,भोकं, यांनी उठावदार झाले असून,खडकांना नानाविध आकार प्राप्त झालेले आहेत. नौकाविहार करतांना ते अनुभवता येणं म्हणजे सुखद अनुभव असतो. आजोळ जबलपूर ला असल्यामुळे नर्मदेचे चे दर्शन होतेच. भेडाघाटच्या संगमरवरी खडकात शांत झालेली नर्मदा आणि धुवांधारला रौद्र आवाज करत कोसळणारी नर्मदा हीचे दोन विविध रूपे एकाच ठिकाणी बघायला मिळतात. आणि ह्याची अनुभूती घेण्यासाठी नर्मदा कायमच खुणावत असते.. 

✍️ सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment