Friday, February 21, 2020

आदिवासींच्या जगण्याची ‘प्रकाशवाट’ !!


‘श्रम ही है श्रीराम हमारा’ असे म्हणणार्‍या बाबांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर ‘आनंदवन’ उभारले. कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं. विकास आणि प्रकाश या त्यांच्या, अफाट कर्तृत्ववान मुलांनी बाबांचा वारसा चालवला. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे हे गेली अनेक वर्षं भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून प्रयत्नरत आहेत. 

 1973 मध्ये हेमलकशाला लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलीकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. आज मात्र तिथे सुसज्ज रुग्णालय आहे, शाळा आहे. तिथली मुलं शिकून डॉक्टर, वकील होतात. वैद्यकीय उपचारांअभावी होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प आहे. या अंधाराकडून उजेडाकडे झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची, दुर्दम्य जिद्दीची कहाणी म्हणजे ‘प्रकाशवाटा’ हे डॉ. प्रकाश आमटे यांचं आत्मचरित्र प्रत्येकाच्या संग्रही असावे असेच आहे.
 
हेमलकशाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग बघणार्‍यांना येणार नाही. तेव्हा तिथे नुसतं दाट जंगल होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली, की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. आवाज फक्त वन्य प्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीच्या पाण्याचे. साप आणि विंचू यांचे अस्तित्व पावलापावलांवर होते. गाव-शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणे ही गोष्ट तुलनेने खूपच सोपी वाटावी, अशी परिस्थिती तेव्हा हेमलकशात होती. एखाद्या खेड्यात जेव्हा आरोग्यसेवा देण्याचा प्रकल्प उभारला जातो तेव्हा तिथे राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा उपलब्ध असतात. निदान आजूबाजूला माणसे तरी असतातच असतात. हेमलकशात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. वीज नव्हती, पाणी नव्हते, राहायची जागा नव्हती, माणसेही नव्हती. होते फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी. अशा परिस्थितीत प्रकाश आणि मंदा आमटे व काही सहकार्‍यांनी मिळून प्रकल्प सुरू केला.
 
सर्वांना अस्वस्थ करणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी त्या जंगलात आलो होते ते आदिवासी वार्‍यालाही उभे राहात नव्हते. कारण त्यांना परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार! त्यांची भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांना समजावणे शक्य नव्हते. त्यामुळे खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असे नाही. पण, बर्‍याचदा प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरे गेल्यावरच त्याची तीव्रता, आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागतात.
 
चार लोकात असताना एकाकी, उदास वाटले तर मन रमवायचे मार्ग असतात. वाचन, संगीत, कुणी चित्रपट बघतो, तर कुणी मित्राकडे जातो. इथे तसे काहीच नव्हते. जंगलातली नीरव शांतता एक-दोन दिवस बरी वाटते, पण कधीकधी ती अंगावरही येते, विशेषतः तुम्ही अशा मनःस्थितीत असाल तर. या सगळ्या परिस्थितीचा सगळ्यांनाच त्रास झाला; पण त्यातून एक चांगली गोष्टही घडली. आपल्यासमोर उभ्या ठाकणार्‍या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचे आहे, हे लक्षात येऊन आम्ही त्यातून वाट काढायला शिकलो. दुसरे म्हणजे सततच्या सहवासाने, अडचणी एकत्र सोडवण्याने आम्ही सगळे खूप जवळ आलो. आमचं सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं जे अजूनही एकत्र आहे आणि आज प्रकाश आमटे यांची दोन्ही मुले डॉ. दिगंत व अनिकेतसुद्धा तिथंच राहून प्रकल्पाला नव्या क्षितिजावर नेण्यासाठी तत्पर आहेत.
 
आज ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी रक्कम लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, येथील खर्चासाठी वापरण्यात येते आहे, त्यामुळे हे पुस्तक आपण विकत घेतल्यास प्रकल्पाला आपली मदतच होईल. हे आत्मचरित्र नक्कीच प्रेरणादायी आहे. जे सत्य आहे, सुंदर आहे त्याचाच आजन्म ध्यास मिळवण्यासाठी या प्रकल्पाला आवर्जून भेट द्यावी.

सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment