Wednesday, June 10, 2020

वैदिक परंपरा जपणारे - आर्वीकर घराणे !!


वेदमूर्ती गोविंदराव आर्वीकर आणि वेदमूर्ती कृष्णा गोविंदराव आर्वीकर. महाराष्ट्रात वेदाध्यापनासोबत भारतीय संस्कृती आणि परंपरा टिकविण्याचे कार्य ज्या व्यक्ती आणि घराणी करीत आहेत त्यात नागपूरातील आर्वीकर घराणे आहे. गेल्या ११ पिढय़ांपासून आर्वीकर घराण्यात वैदिक परंपरा,अध्ययन आणि अध्यापन कार्य सुरू आहे. अनेक हस्तलिखित ग्रंथांचे जतन स्वतः गोविंदराव आणि कृष्णाशास्त्री व त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे.

वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ आहे. 'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते. या वेदांचे संहिता,आरण्यके,ब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते.

वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. 'वेदोऽखिलो धर्ममूलम् |' असे मनुवचन प्रसिद्धच आहे. वेदांवरून तत्कालीन आर्य जनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तीन गोष्टींच्या माध्यमातून आर्यांनी भौतिक उत्कर्ष साधला होता. वेद, स्मृती, सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणास जे बरे वाटेल ते,अशी धर्माची चार प्रकारची लक्षणे आहेत. भारतीय आस्तिक दर्शनानी आपापले तत्त्वज्ञान मांडताना वेदांचा आधार घेतला आहे. व्यासांनी वेदांचे प्रवर्तन केले व त्यांच्या शिष्यांनी वेदांचे ग्रहण करून त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली. हे सर्व शिष्य ज्ञानोपासक होते. वेदांचे अध्ययन करणे, त्यांचे अध्यापन करणे व वेदांचे संरक्षण करणे हे त्यांचे जीवित कार्य होते. 

वेदविद्या ही पोटार्थी विद्या नसून ती एक तपस्या आहे व त्यासाठी त्याग करावा लागतो. त्याशिवाय वेदविद्या येत नाही. कर्मकांडाचे पाच सहा वर्षांत शिक्षण घेता येते. मात्र, वेदांच्या अध्ययनाला कालमर्यादा नाही. आजन्म वेदांचे शिक्षण घेतले तरी ते कमीच आहे, अशी ज्ञाननिष्ठा असण्यासाठी मनोनिग्रहाचे बळ असावे लागते. 

एकाच घराण्यात राज्यस्तरीय महाकवी कालिदास संस्कृत साधना 
‘वेदमूर्ती पुरस्कार’ प्राप्त झाले असून १९६५ मध्ये आजोबा भाऊजी आर्वीकर, त्यानंतर २०१२ मध्ये गोविंदराव आर्वीकर, २०१३ मध्ये ललितशास्त्री आर्वीकर पुढे २०१५ मध्ये कृष्णाशास्त्री आर्वीकर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आर्वीकर घराण्यातील ह्या सगळ्यांना ‘वेदमूर्ती पुरस्कार’ मिळाल्याने ह्यांच्या त्यागमय जीवनकार्याचा यथोचित सन्मान झाला आहे असेच म्हणता येईल. 

आज घराण्याचा पारंपरिक वारसा आणि संस्कृती जपत गोविंदराव आर्वीकर ह्यांनी वडील भाऊजी आर्वीकर ह्यांच्या छत्रछायेत वयाच्या आठव्या वर्षांपासून ते वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंत ऋग्वेद शाकल शाखा वेदाध्ययन,षडंग,याज्ञिकचे अध्ययन केले. तीर्थरूप भाऊजी ह्यांच्या निधनानंतर १९८५ पासून आजतागायत वडिलांच्या प्रेरणेने अध्यापन कार्य सुरू केले व त्यांच्याच कृपेने अखंड आजही सुरू आहे. 

कृष्णाशास्त्री गोविंद आर्वीकर यांनी ऋग्वेद दशग्रंथ आणि कर्मकांड याज्ञिकचे अध्ययन केले आहे. १९७० ते १९७५ पर्यंत घरातच, वैदिकशिरोमणी भाऊजी आर्वीकरांकडे, तर १९७५ ते १९८४ पुण्याला वेदाचार्य विनायकभट्ट घैसास गुरुजींकडे ते शिकले. विद्यावाचस्पती बह्मश्री दत्तमहाराज कवीश्वर यांचेही मार्गदर्शन कृष्णाशास्त्रींना लाभले आहे.

आज अनेक पुरस्काराने सन्मानित असलेले हे घराणे प्रसिद्धीच्या मागे नाही. आजही वेदांचे यम नियम पाळत खऱ्या अर्थाने वेदांचे रक्षण करायचे असेल तर वेदांतील ऋचांचा उच्चार योग्य माणसाने, योग्य वेळी व योग्य परिस्थितीत केल्याने त्यातील खरा अर्थ प्रकट होतो, असे सांगितले जाते. आणि हे आर्वीकर घराण्यात बघायला मिळते. गुरु शिष्य परंपरेने चालत आलेले हे ज्ञान आजवर सांभाळले गेले आहे. कारण आज देवेश्वर हा कृष्णाशास्त्री ह्यांचा मुलगा सुद्धा पूर्णपणे ह्याच मार्गावर आहे. त्याचे ऋग्वेद दशग्रंथाच्या पाठाचे अध्ययन सुरू आहे. अशा वैदिक घराण्याचा नागपूरकरांना अभिमान वाटावा असेच ह्यांचे देवदुर्लभ कार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याचा असाच उत्तरोत्तर उत्कर्ष व्हावा हीच यज्ञ देवतेच्या चरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं

No comments:

Post a Comment