ह.भ.प.श्रीराम गंगाधरपंत जोशी !! आज हे नाव नागपूर आणि महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहे. वारकरी संप्रदायाचा समर्थपणे प्रसार करणारे, संप्रदाय सक्षमपणे पुढे नेणारे आणि संप्रदायाच्या क्षमता ओळखून त्याचा प्रसार, प्रचार करणाऱ्यांमध्ये ह.भ.प.श्रीरामपंत जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल.
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारीलें देवालया।।
नामा तयाचा किंकर । त्यानें केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत।।
तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।
या अभंगात तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील भागवत-धर्ममंदिराचा पाया श्री ज्ञानदेवांनी घातला असे निक्षून सांगितले आहे. श्री ज्ञानदेवांनी घातलेल्या भक्कम पायाच्या आधारावर महाराष्ट्र भागवत धर्ममंदिर, ही वारकरी संप्रदायाची इमारत सुदृढ स्थितीत आजही उभी आहे.
महाराष्ट्रात वारकरी आणि वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये जाती-भेद-धर्माचे पाश तोडून भाविक यामध्ये सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा आहे. प्रत्यकाने तो एकदा तरी अनुभवणं म्हणजे पर्वणीच आणि ह्या वारीबद्दल श्रीरामपंत जोशी महाराजांकडून ऐकणं म्हणजे ब्रह्मानंदाची अनुभूती घेणं असा अनुभव असतो. आज वारकरी संप्रदाय पुढे नेणाऱ्यांमध्ये अनेक संतांनी,महाराजांनी मोलाचा वाटा उचलेला आहे.
वारकरी संप्रदाय श्री ज्ञानदेवांच्या काळी होता तसाच पवित्र नि तेजसंपन्न आजही आहे. याचे कारण ज्ञानदेवांनी घातलेल्या अतिशय भक्कम व विविधांगी रूपाने तो बघायला मिळतो. आपण जर आस्थेने व श्रद्धेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर ज्ञानदेवांनी घातलेल्या या भक्कम पायाची विविध अंगे आपणांस स्फटिकाप्रमाणे स्वच्छ दिसू शकतात.
ह.भ.प.श्रीरामपंत आपल्या भागवतात नेहमी सांगतात,भक्तीशास्त्रात भगवद्कथेमधे आवड असणे म्हणजेच भक्ती होय. यात भगवंताची कथा प्रेमाने गाणे,प्रेमाने श्रवण करणे या गोष्टीला भक्तीशास्त्रात महत्व आहे. कथा कीर्तनाने भक्तीचे महत्त्व सिद्ध होते. भगवंताची कथा ही एक कथासंकीर्तनरूपी यज्ञच आहे. कोणतेही साधन म्हणा भगवंताची उपासना स्वतःच्या चित्तशुध्दी करीता करायची असते त्या साधनेचे फळ हरिकथेच्या ठिकाणी ज्याचा खरा प्रेमभाव असेल त्याला प्राप्त होत असते. संत तुकाराम महाराज हे भगवंताच्या कथेची विशेष आवड ठेवणारे होते ते देवाजवळ स्पष्ट म्हणतात,
सांडुनी कीर्तन न करी आणिक काज |
नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगी ||
भगवंताची लीला सांगणारी कथा अर्थात भागवत ही भगवंताला अतिशय आवडणारी भक्ती आहे.आणि आज ह्या भक्तिमार्गावर समाजाला जोडण्याचे कार्य श्रीरामपंत जोशी महाराज करत आहे.
मला वैयक्तिक रामकृष्ण मठात महाभारत कथेतील विविध पात्र ह्या विषयावर पाच दिवस प्रवचन श्रवण करण्याचा योग आला आहे.
आज २०० वर्षांपूर्वीच्या नागपूरातील गणेशपेठ भागातील प्राचीन विठ्ठल मंदिरात ३ पिढ्यांपासून त्यांची विट्ठल सेवा सुरू आहे. वारकरी कीर्तन परंपरा त्यांना लाभली आहे. आजही वारकरी कीर्तनासाठी त्यांचा सतत प्रवास सुरु असतो. रामायण आणि भागवत या कथांमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीय कथाकारांचाच दबदबा पाहायला मिळतो. मात्र, महाराष्ट्रात भागवताचार्य श्रीरामपंत जोशी महाराज यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या ६७ वर्षांपासून त्यांचे ह्या विठ्ठल मंदिरात प्रौष्ठपदी भागवत सुरू आहे. आजही नागपूरात अनेक ठिकाणी त्यांची कथा सुरू असतेच. अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. शेगाव येथे ४०० हुन अधिक कीर्तनकारांचे संमेलन,श्री क्षेत्र काशी येथे १०००० वारकऱ्यांसह भव्य ज्ञानेश्वरी पारायणाचे व वारकरी सप्ताहाचे आयोजन त्यांनी केले आहे. अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमी आंदोलनात एक हजार वारकऱ्यांसह भव्य वारकरी सप्ताहाचे नियोजनही त्यांनी केले होते. अनेक दैनिकात महाराजांनी विपुल लेखन केले आहे. आज पुस्तक रूपाने त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. अनेक सामाजिक संस्थांना ते भागवत कथेतून आर्थिक मदत करत असतात. आज गोपालन, गोरक्षणाचे कार्य ही सुरू आहे. सध्या विश्व हिंदू परिषद,दिल्ली केंद्रीय मार्गदर्शक मंडळावर सदस्य म्हणून आहेत. विश्व वारकरी प्रतिष्ठान च्या मार्गदर्शक मंडळावर आहेत. अनेक सत्कार आणि पुरस्कारांची श्रीमंती महाराजांजवळ असली तरी प्रसिद्धीच्या मागे न लागता ह.भ.प.श्रीरामपंत जोशी महाराजांची भागवत धर्माची पताका घेऊन नित्य वाटचाल सुरू आहे. ह.भ.प.श्रीरामपंत जोशी महाराजांचे कृपाशीर्वाद सदैव असावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
No comments:
Post a Comment