Friday, June 26, 2020

असा बालगंधर्व आता न होणे..



मराठी संगीत रंगभूमीवरील अनभिषिक्त सम्राट,नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांची आज जयंती.

जशा जन्मती तेज घेऊन तारा
जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई घेऊन कंठात गाणे
असा बालगंधर्व आता न होणे

रतीचे जया रूप लावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे
सुधेसारखा साद,स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे

ग. दि. माडगूळकर ह्यांच्या ह्या ओळी बालगंधर्व ह्यांनाच लागू होतात. माझ्या पिढीला बालगंधर्व ह्यांची ओळख खरंतर सुबोध भावे  ह्यांच्या अभिनयातून झाली असेच म्हणता येईल. नांदी,संगीत नाटक ह्यासारख्या अनेक गोष्टी ह्या चित्रपटातून समजल्या बालगंधर्व ह्यांची व्याप्ती खरतर त्यातून समजली. पुढे बालगंधर्व उमगले ते १९२५ साली प्रकाशित झालेले सदाशिव विनायक बापट संपादित लो. टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका खंड दोन मधून त्यात ज्या आठवणी मला वाचायला मिळाल्या त्या आजच्या दिवसाचे औचित्य साधत योग्य वाटतात कारण लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी चे हे वर्ष आहे. आणि बालगंधर्व ह्यांनी त्या लिहिलेल्या आहेत पार्थ बावस्कर  ह्या माझ्या अभ्यासक मित्राने लोकमान्य टिळक ह्यांच्यावर वर्षभर लेखमाला चालवली ह्या संदर्भात बोलतांना त्यांनी मला हा संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिला. त्यातील ही आठवण..

लोकमान्य बळवंतरावजी टिळक यांच्या आठवणीच्या अमूल्य ग्रंथाच्या प्रथम खंडांतील आठवणी मी वाचीत असतां मलाही सहज आणखी काही प्रसंग आठवू लागले. माझ्या स्वतःच्या कामानिमित्त काही थोड्या प्रसंगी मी त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांजकडे गेलो होतो. त्यांचा आवाज फार मोठा असल्याने बोलतांना ते रागावून बोलत आहेत असे जरी प्रथम मला वाटले, तरी त्यांनी इतक्या प्रेमळपणानें, कळवळ्याने आणि साधकबाधक प्रमाणांचा सर्व बाजूंनी शांतपणे विचार करून प्रत्यक्ष आपल्या मुलांस जसे समजावून सांगावे  त्याप्रमाणे सर्व गोष्टी मला समजावून देऊन, अखेर हाच उपाय योग्य आहे असेंच अगदी तंतोतंत मला पटवून दिलेले आहे. असे जे काही त्यांच्या भेटीचे अपूर्व योग आले ते अजून माझ्या पूर्ण लक्षांत आहेत व तेव्हापासून माझ्या अंतःकरणांत लोकमान्य बळवंतरावजी हे कोणी अवतारी पुरुष आहेत असाच विश्वास पटलेला आहे. असो; आज अवांतर आणखी एक आठवण पुढे देत आहे.

लोकमान्य मंडालेहून सुटून आल्यावर, आम्ही नुकताच बसविलेला
विद्याहरण नाटकाचा प्रयोग पाहाण्यास पुणे येथे एका रविवारी त्यांस बोलाविलें होते. लोकमान्यांस नाटकाची अगर गायनाची विशेष हौस नसतांहि व त्यावेळी कामाच्या गर्दीमुळे त्यांस बिलकुल फुरसत नसतांहि. ज्याच्या त्याच्या उद्योगास उत्तेजन देण्याच्या त्यांच्या स्वभावास अनुसरून त्यांनी आमचे आमंत्रण मान्य केलें, व कबूल केल्याप्रमाणे ते ठराविक वेळी नाटकगृहांत आले. ही बातमी आंत आम्हांस,तोफेच्या सरबत्तीने जसे एकाद्या भूपतीचे स्वागत जाहीर व्हावे तसे, बाहेर प्रेक्षकांकडून त्यांच्या झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाच्या अपूर्व स्वागताने कळली, हे सांगावयास नकोच. कामाचा त्यांच्यामागें लकडा असतांहि त्या दिवशी अखेरपर्यंत नाटक पाहाण्यास ते बसले होते.मध्यंतरी काही वेळ नाटक पाहून झाल्यावर त्यांस आम्ही उपहाराकरितां आंत बोलाविले. त्यावेळी त्यांनी आमच्या सर्व खेळाविषयीं व एकंदर सर्व साधारण व्यवस्थेविषयी इतक्या बारकाईनें, आस्थेवाईकपणाने व चौकसबुद्धीने आम्हांस माहिती विचारली की,जणुं काय आपली स्वतःचीच ती एक संस्था आहे ! नंतर सीनसीनरीविषयी त्यांनी काही मार्मिक सूचना केल्या व म्हणाले की, "आमच्या कृष्णाजीपंतांनी अशीच नाटके लिहिली तर हलींच्या परिस्थितीला त्यांचा विशेष उपयोग होणार आहे.जर्मनीमध्ये तर काही एका विशिष्ट हेतूनेच हली नाटके लिहिली जातात व करमणुकीबरोबर राष्ट्रास योग्य असे शिक्षण देण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. आमच्या व्याख्यानास जसे ठराविक लोक येतात तसाच तुमच्या नाटकाचाहि ठराविक प्रेक्षकवर्ग आहे. म्हणून शान देण्याचे बाबतीत त्याचीहि उपेक्षा होता कामा नये."

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व
(यशस्वी नट, मालक गंधर्व नाटक मंडळी, पुणे.)

✍️ सर्वेश फडणवीस 

#बालगंधर्व

No comments:

Post a Comment