श्री मारुती चितमपल्ली !! हे नाव आज जगभर आदराने घेतल्या जाते. व्यक्तिगत मी स्वतः मनस्वी आनंदी आहे की ह्यांच्यावर ह्या निमित्ताने का होईना शब्दफुलांची ओंजळ समर्पित करता येते आहे. ज्येष्ठ साहित्यिक,व्रतस्थ वनसंत ,अरण्यातील आत्ममग्न ऋषी मारुती चितमपल्ली. ह्या माणसाने निसर्ग वाचला आहे. तब्बल चार दशकांचा काळ त्यांनी जंगलात घालवला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे निसर्गाच्या इतक्या निकटतम सान्निध्यात वातावरणातील बदलांचे निसर्गातील विविध घटकांवर होणारे परिणाम अत्यंत जवळून त्यांनी अनुभवले आहे. या अवलोकनातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी उमगल्या आणि आज प्रत्येकाला अभिमान वाटावा असे कार्य चितमपल्ली सरांनी केले आहे.
जंगलातील मुक्कामात असंख्य वन्यजीव-पक्ष्यांच्या प्रजातींचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील वास्तव्यात समुद्री पक्षी तसंच समुद्री जीवांच्या हालचालींचाही अभ्यास केला. त्यातूनही पावसाळ्यापूर्वीचे सृष्टीतील असंख्य आश्चर्यजनक बदल त्यांनी टिपले आहेत. शिवाय जंगलावरच ज्यांचे जीवन अवलंबून आहे अशा हजारो आदिवासी कुटुंबांना भेटले त्यांच्याबरोबर जंगलात राहिले, त्यांचा विश्वास संपादन केला. पशुपक्ष्यांप्रमाणेच आदिवासींनाही उपजतच निसर्गचक्रातील बदलांचे ज्ञान असते आणि ते ज्ञान ते सहसा कोणाला देत नाहीत, हे देखील त्यांनी पाहिले. परंतु अशी असंख्य निरीक्षणे त्यांनी स्वत:ही अनुभवली आणि टिपली आज तब्बल २१ हुन अधिक पुस्तकांमध्ये त्यांचा सविस्तर उल्लेख आढळतो.
मारुती चितमपल्ली ह्यांच्याविषयी लिहितांना कुठल्या गोष्टीला स्पर्श करावा हे कळतच नाही. कारण हात लावील ते सोने असं त्याचं कार्य आहे. निसर्ग,पक्षी,प्राणी,मासे,वृक्ष,जंगल ह्या शब्दांच्या पलीकडचे विश्व त्यांनी आपल्याला दाखवले नव्हे त्यांच्या लेखणीतून ते प्रत्यक्ष घेऊन गेले आहेत. जंगलात जातांना कुठल्या गोष्टी अनुभवायला हव्या ही दृष्टी त्यांनी दिली आहे. निसर्ग माणसाला कायमच खुणावत असतो फक्त आपण त्याच्याकडे जाण्यासाठी तयार नसतो आणि हे व्रतस्थ वनऋषी अनेक दशकं तिथं जाऊन राहिले आहेत.
पक्षी,प्राणी वृक्ष आणि त्यांच्या प्रजाती ही अत्यंत संवेदनशील आणि बदलत्या हवामानाशी स्वत:ला जुळवून घेणारी निसर्गाची आश्चर्यकारक निर्मिती आहे. अशी हजारो निरीक्षणे, टिपणे आजही त्यांच्या संग्रही आहेत. वर्षांनुवर्षे त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली तेव्हा कुठे त्यांच्या दिनक्रमातील बदलांचे हे रहस्य त्यांना उलगडले. खरंतर अशी रहस्ये एका दिवसात समजत नाहीत. वन अधिकारी असल्याने वर्षांनुवर्षे जंगलात राहिल्यामुळे त्यांचे आश्चर्यकारक विश्व समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली आणि आज कथा,कादंबरी,ललित लेखनाच्या बरोबरीनेच चितमपल्ली सरांची ग्रंथसंपदा आपल्याला वाचता येत आहे. त्यांचा वाचकवर्ग कायमच त्यांच्या नव्या साहित्याची वाट बघत असतो. साहित्य प्रसार केंद्र या राजाभाऊ कुळकर्णी ह्यांच्या प्रकाशन संस्थेने त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित केलीच पण आत्मीय आणि जिव्हाळ्याचे नाते जपलें आहेत. आजही तेच ऋणानुबंध मकरंद कुळकर्णी ह्यांनी टिकवून ठेवले आहेत. आज त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ते सांभाळून आहेत.
मारुती चितमपल्ली ह्यांनी ६६ वर्षे जंगलात भटकंती केली आहे. जवळपास ५ लाख किमी प्रवास केला आहे. आज १३ भाषांचे ज्ञान,त्यात मूळ संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करता यावा म्हणून संस्कृत भाषा शिकले आहेत.४ कोशांचे लेखन पूर्ण झाले आहे. प्राणी कोषाचे काम प्रकाशनाच्या वाटेवर आहे. मत्स्य कोष,वृक्ष कोषाचे काम ही पूर्ण होत आले आहे. पक्षीकोशाची तिसरी आवृत्ती सुरू आहे. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत राहत सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. हा दुर्मिळ ठेवा समोर आणण्याच्या सकारात्मक प्रेरणेतूनच हे सर्व त्यांना साध्य झाले आहे. पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्या पाठीशी असतांना वयाच्या या टप्प्यावर तरुणालाही लाजवेल अशी काम करण्याची त्यांची कारकीर्द आहे. चकवा चांदणं ह्या आत्मचरित्रातून चितमपल्ली ह्यांच्याबद्दल अधिक जाणून घेता येईल. परमेश्वराने त्यांना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
No comments:
Post a Comment