Friday, May 8, 2020

तत्वनिष्ठ संशोधक मधुकर जोशी !! 🖋️📄📚


डाँ. मधुकर जोशी !! संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक,सखोल ज्ञानपरंपरेचे गौरव असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे डाँ. म.रा.जोशी सर. "मूर्ती लहान कीर्ती महान" ही म्हण यथार्थपणे त्यांनाच लागू होईल असे जोशी सर वयाच्या या टप्प्यावर असतांना सुद्धा त्यांची संशोधक वृत्ती अचंबित करणारी आहे.

डाँ. म.रा. जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. प्राचीन मराठी संत वाड.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. सरांचे २०० हून अधिक लेख एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम कडून प्रकाशित करण्यात आले आहेत.

दत्त संप्रदाय,नाथ संप्रदाय,वारकरी संप्रदाय,प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज साहित्य यावर जोशी सरांचे अनेक लेख,पुस्तकं, संशोधनपर माहिती प्रसिद्ध आहे. सध्या तंजावर येथील साडेतीन हजार मराठी हस्तलिखितांचे संशोधन ते करत आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचा प्रवास ही सुरू आहे. संतवाङ्मयातील अद्वैत तत्त्वज्ञान हेच त्यातील शाश्वत मूल्य आणि त्याची जोपासना हेच संशोधकाचे मुख्य कार्य होय असे ते सांगतात. प्रसिद्धी पराङ्गमुख ही त्यांची ओळख सार्थ ठरेल.

सात्त्विक,मितभाषी,आपुलकीने प्रत्येक गोष्टींचे निरसन करणे ही सरांची ओळख आहे. संतांचे ग्रंथ हेच उपयुक्त साधन आहे. नानाविध हस्तलिखित स्वरूपातील साहित्य शोधून, खरा पाठ, मूळ संहिता इत्यादी बारकावे तपासणे हेच संशोधनाचे पायाभूत कार्य आहे.सामाजिक जीवन आणि भाषा-व्याकरण यांचा तोल सांभाळीत,अभ्यासाच्या ओघाओघाने घडत गेलो असे ते नेहमी सांगतात.

लॉकडाऊन च्या आधी सरांचा फोन आला. प्रज्ञालोक चे लेख वाचून त्यांनी फोन केला होता. "नमस्कार फडणवीस साहेब,मी म.रा.जोशी बोलतोय असे म्हंटल्यावर मला आश्चर्य वाटले आणि भेटायला या,तुमच्या सोयीनुसार या आणि येतांना फोनकरून या म्हणाले" भेटायला गेल्यावर मला आश्चर्य वाटलं इतके पुरस्कार पाठीशी असतांना सर अतिशय आपुलकीने बोलत होते. विषयांवर बोलणे झाल्यावर निघतांना त्यांना म्हणालो की साहेब वगरे नका म्हणू तर म्हणाले,आदरयुक्त बोलल्या गेलेच पाहिजे आदर आणि मान प्रत्येकाचा ठेवावा.असं म्हंटल्यावर मी तरी निरुत्तर झालो. नमस्कार केला आणि निघालो. दोन भेटीत सरांकडून खूप शिकता आले. त्यांची विषयाची पकड आणि व्यासंग बघून तर आश्चर्य वाटतं. मराठी साहित्य क्षेत्रातील संशोधनासंदर्भात त्यांचा कुणी हात धरू शकणार नाही असं मला वाटतं. ‘रामदासी संप्रदायाचा समग्र कोश’ प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि तो लवकरच समर्थचरणी ते समर्पित करण्यासाठी उत्सुक आहेत. 'ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व' हेच संबोधन सरांना लागू होईल.

प्रज्ञालोकचे विद्यमान प्रधान संपादक ते आहेत. अप्रबुद्धांची आणि सरांची भेट होत असे. सरांचे वडील अकोल्याला राहत असल्याने अप्रबुद्ध जोशी यांच्याकडे उतरत असत. अप्रबुद्धांमुळे सरांवर श्री अण्णासाहेब पटवर्धन ह्यांच्या विचारांचा पगडा पडला आणि पुढे त्यांनी श्रीगुरुचरित्र व स्वात्मसौख्य ह्याचा अभ्यास केला.श्रीगुरुचरित्र ग्रंथावर ते फार सुंदर व सोपे विवेचन करतात. 'जे घडते ते श्री कृपेने घडते' ह्या विचारांचा त्यांच्यावर फार खोल परिणाम झाला आहे. ह्या वयातही त्यांची कुशाग्र बुद्धी,तौलनिक अभ्यास करण्याची कला,संशोधनाची आवड व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कला ह्याने आपण अचंबित होतो. नुकताच राज्य शासनाचा प्रतिष्ठित ज्ञानोबा-तुकोबा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. सरकारने एका ऋषितुल्य व तत्वनिष्ठ उपासकाचा केलेला हा यथार्थ गौरव आहे. सरांना साष्टांग नमस्कार व भगवंताने त्यांना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं

9 comments:

  1. यथार्थ गौरवपर लेख.आ.म.रा.जोशी सर हे महाराष्ट्राचे वैभवच !
    लेखनिक विद्यार्थिनी म्हणून मी सरांच्या संपर्कात आली.खरोखर व्यासंगी अभ्यासक.अभिनन्दनास्पद निर्णय! -डॉ.जयश्री शास्त्री

    ReplyDelete
  2. लेख छान झाला आहे. आदरणीय म.रा.जोशी सरांवर अशीच श्रीकृपा सदैव राहो ही सदिच्छा !!

    ReplyDelete
  3. - राजलक्ष्मी बर्वे

    ReplyDelete
  4. खूप सुंदर , नागपूरात येईन तेव्हा दर्शनास नेशील नं ?

    ReplyDelete
  5. तस्मै श्री गुरवे नमः। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती! ..संजीवनी मुलमुले

    ReplyDelete