आशा बगे !! आज हे नाव मराठी साहित्य विश्वात अनोख्या शैलीतून लिखाण करत मराठी मनावर अधिराज्य करणाऱ्या लेखिका म्हणून अलंकृत झाले आहे . २००६ ला प्रतिष्ठित साहित्य अकादमी सारख्या पुरस्काराची श्रीमंती पाठीशी असतांना सुद्धा आशाताई आजही साध्या,सरळ आणि ममत्व जपणाऱ्या आहेत.
स्त्रियांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा वेगवेगळ्या अंगांनी विचार ही आशाताईंच्या लेखनाची ताकद आहे. त्यांच्या कथा व कादंबऱ्यांतील अनुभवविश्व मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारे असले तरी त्याची मांडणी वेधक व विचार करायला भाग पाडणारी असते. मराठी साहित्यात कथा-वाङ्मयात आशा बगे यांचे नाव एका वेगळ्या परिमाणाच्या कथा लिहिणार्या लेखिका म्हणून स्थिर झाले आहे.
मराठी साहित्य व संगीताचे शिक्षण घेणाऱ्या आशाताईंनी कधीही नोकरीचा विचार केला नाही. घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासणाऱ्या आशाताईंची सुरुवात ‘ सत्यकथे ’पासून झाली.
आजवर एवढे मानसन्मान मिळूनसुद्धा त्यांचा साहित्य वर्तुळातील वावर कमीच राहिला. या वर्तुळात चालणाऱ्या राजकारणापासून त्यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले. लेखन करत राहायचे आणि वाचकांना नवनवीन साहित्य देत राहायचे हीच आजही त्यांची इच्छा आहे. सहज भेटीत त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत विचारले असतांना त्या म्हणाल्या ," लेखन व संगीत हीच माझी साधना आहे, त्यात रमायला आवडतं." म्हणून त्याबाबतीत कधीच विचार केला नाही.
आशाताईंचे कथासंग्रह,कादंबऱ्या आणि ललितलेखन हे वेगळ्याच धाटणीचे आहेत. मला व्यक्तीक आवडलेली कादंबरी "चक्रवर्ती". आपले सद्गुरू प.पू.श्री मामासाहेब देशपांडे ह्यांच्यावरती त्यांचे जे लिखाण आहे ते शब्दातीत आहे.शक्य असल्यास स्वतंत्रपणे आवर्जून वाचावी.त्यात त्यांनी प्रत्येक पात्राला जो न्याय दिला आणि चरित्र नायकाचे जे वर्णन केले आहे त्यावरून त्यांची साहित्यसंपदेची जाण होते आणि वाचतांना नकळत हात जोडले जातात. या कादंबरी निमित्ताने त्यांची पहिली भेट झाली आणि कादंबरीबद्दल अधिक जाणून घेता आले. त्यानंतर आशाताई आणि बगे कुटुंबीयांशी वेगळेच ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.
आशाताईंची राहणी अतिशय साधी आहे. वयाच्या या टप्प्यावर असतांना सुद्धा कुणी भेटायला आले तर त्यांच्या हातचे खाल्ल्याशिवाय जाऊच शकत नाही. त्यांचा वावर अतिशय सहज असतो. कुठेही पुरस्कारांची श्रीमंती त्या मिरवत नाही. त्यांना जवळून भेटल्यावरच त्या अधिक समजतील असा माझा अनुभव आहे.
कायम आनंदी,जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणाऱ्या आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेक लेखनही केलं आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्यामुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे. आशय,अभिव्यक्ती आणि संगीताचे माध्यम या तिन्ही गोष्टींच्या एकत्रित रसायनाने आशाताई यांचे अनुभवविश्व म्हणजे भारतीय परंपरेला समर्पित झालेल्या स्त्रीचे समृद्ध अनुभवविश्व आहे. भारतीय जीवनातले कर्मकांड, व्रतवैकल्ये, सण, उत्सव, कीर्तनादी गोष्टींचे भरपूर ज्ञान सद्गुरूपरंपरेने त्यांना लाभले आहे आणि त्यामुळेच त्यांची शब्दश्रीमंती नित्यनूतन आणि वर्धिष्णू अशीच आहे.
आशताईंचे लिखाण हृदयाचे ठाव घेणार आहे. खरंतर त्यांचे लिखाण म्हणजे वाचकांच्या मनातला एक कप्पाच असतो.श्री.राम शेवाळकर यांच्या नावाने सुरू झालेला पहिलाच ‘साहित्यव्रती’ पुरस्कार मिळणे हा सुद्धा त्यांच्या दीर्घ लेखन कारकीर्दीचा यथोचित गौरवच आहे असं मला वाटतं. "साहित्यव्रती" हे नामाभिधान हीच त्यांची यथोचित ओळख होईल. वाचकांना समृद्ध करत असलेल्या आशाताईंना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच श्री सद्गुरुंच्या चरणी प्रार्थना आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
No comments:
Post a Comment