शेफ विष्णू मनोहर !! आज नागपूर पुढे महाराष्ट्र आणि साता-समुद्रपार अमेरिकेत "विष्णूजी की रसोई" च्या माध्यमातून शेफ विष्णू मनोहर या मराठी बल्लवाचार्याचे पाऊल पुढेच पडते आहे. असं म्हणतात,एखाद्याच्या मनात घर करायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून जातो आणि खरंच आहे ज्यांनी वेगवेगळे हटके पदार्थ आणि सूत्रसंचालनाच्या ‘मेजवानी’ ने सगळ्या खवय्यांच्या मनात घर केलंय असे अस्सल नागपूरकर शेफ विष्णू मनोहर. सांगायला कायमच अभिमान आणि आनंद वाटतो की स्वयंपाक कलेविषयी जबरदस्त पॅशन असणारे वल्ली अर्थात विष्णू मनोहर हे आज सर्वत्र परिचित आहेत.
मुळात मानवाचा जन्म हा खाण्यासाठी च झाला आहे. आज खाणे हा मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. त्यात सध्या कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे तर खाणे हे थोडं जास्तच होत आहे आणि खवय्येगिरी करणारा तर खाण्यासाठी कायम तयार असतो. त्यात विष्णूजीं सारखे बल्लवाचार्य असतील तर मग काय म्हणावे. जगातील प्रसिद्ध शेफ पैकी अस्सल नागपूरकर शेफ श्री विष्णू मनोहर. लेखक,कवी,अभिनेता आणि एक यशस्वी उद्योजक ह्यांसारख्या अनेक वलयांच्या भोवती असतांना सुद्धा एक सच्चा,हरहुन्नरी,निर्मळ आणि तितकाच प्रेमळ बाप-माणूस म्हणजे विष्णू दादा आहेत.
आज स्वतःच्या मेहनतीने आपले स्वतंत्र साम्राज्य निर्माण करणारे यशस्वी उद्योजक म्हणजे शेफ विष्णू दिगंबर मनोहर आहे. ह्यांच्या शून्यातून इथवरचा प्रवासाचे साक्षीदार माझे बाबा आहेत.श्री. दिगंबर मनोहर आणि बाबा ह्यांचा चित्रकारितेचा प्रवास सोबत झाला आहे. बर्डीवरील मोदी नं.२ मधील जुनाट घर ते आजच्या नागपूरातील अनोख्या वास्तू इथवरचा हा प्रवास केवळ नशीबाचा भाग नव्हता तर त्यामागे विष्णू दादांची कठोर मेहनतीत प्रवीण दादा आणि प्रफुल्ल दादा व सुचिता ताई ह्यांनी दिलेली तेवढीच मोलाची साथ असल्याने आज विष्णू दादा विश्वविक्रमी वाटचाल करतात आहे. इ-टीव्ही मराठीवरील गाजलेल्या "मेजवानी परिपूर्ण किचन" ह्यातून विष्णूदादा घरोघरी पोहचले आहेत. पण इथेच न थांबता ते आपले सामाजिक दायित्व देखील तेवढ्याच तत्परतेने पार पाडतआहे. मैत्री परिवार ह्या सामाजिक संस्थेशी सुद्धा विष्णू दादा जुळल्या गेले आहेत आणि सामाजिक जाणीव जपण्याचे हे कार्य ही प्रत्येकाला गौरव वाटावा असेच आहे.
नागपूरच्या या अन्नपूर्णसाधकाने २०१७ ला आपल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या निमित्ताने नागपूर चे नाव वेगळ्या क्षितिजावर नेले. सलग ५३ तास कूकिंग करत जवळपास ७५० हुन अधिक पदार्थांचे विक्रम करत ऐतिहासिक विश्वविक्रम आपल्या नावावर केला. विष्णू दादा पदार्थ बनवत होते आणि तिथे उपस्थित असलेले लोक ते चाखत होते. ती चव अजूनही जिभेवर आहे. मुळात काही गोष्टी या शब्दात मांडता येत नाही आणि खरंच ज्यांनी त्या वेळी ते पदार्थ चाखले तो नक्की त्या बद्दल सांगू शकेल.
मी माझ्या सारख्या असंख्य मित्र - मैत्रिणींचे role-model म्हणून आम्ही विष्णूजीं कडे बघतो. कामानिमित्त बाहेर असताना आपली महाराष्ट्रीयन पद्धत अतिशय सोप्या शब्दात " Masteer Recipes" ह्या स्वतंत्र You Tube चॅनेल च्या माध्यमातून आमच्या पर्यन्त नवनवीन खाण्याचे पदार्थ ते पोहोचवत आहेत. मुळात कूकिंग ची आवड प्रत्येकाला असतेच पण घरी प्रत्येकाला करता येईलच अस नाही. पण जेव्हा शिक्षणाच्या आणि कामाच्या संदर्भात माझी पिढी बाहेर पडली तेव्हा विष्णूजींच्या चॅनेलच्या माध्यमातून अनेक पदार्थ करून खाता आले आणि करण्याचा उत्साह पण आला. अतिशय सोपे झटपट पदार्थ करण्याचा विष्णू दादांचा अनुभव लाजवाब आहे.
विष्णू दादा खरंच अन्नपूर्णेचे खरे उपासक आहेत. अस्सल महाराष्ट्रीयन आणि वऱ्हाडी पदार्थाची चव आणि काही वेळा काही पदार्थ हे 'विष्णूजी की रसोई' मधीलच खावे. एक ठिकाणी वाचलेलं आठवतं; ' विष्णू मनोहर! नाव जरी घेतलं तरी पोट आणि मन प्रसन्नतेने भरून जातं.' मध्यंतरी १००० किलो ऑरगॅनिक भाजी बनवण्याचा विक्रम केला त्या भाजीची चव पण अफलातून. पुढे खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम विष्णूदादाच्या नावावर आहे. नुकतीच साबुदाणा खिचडी,जळगाव ला वांग्याचे भरीत बनवण्याचा विक्रम ही त्यांच्या नावावर आहे. विक्रम आणि विष्णू खरंतर आज एका नाणाच्या दोन बाजू आहेत की काय इतके वेगवेगळे अभिनव प्रयोग विष्णू दादा करत असतात.
वैविध्यपूर्ण पदार्थांची चव पुरवून त्यांना तृप्त करणारे व स्वतःच्या जीभेतून (वाणीतून) लोकांना जिंकून त्यांच्या ह्रदयात कायम स्थान प्राप्त करणारे असे विष्णू दादा आहेत. त्यांच्याबद्दल हेच म्हणावेसे वाटते की, खाण्याच्या माध्यमातून अनेक मानवी मने जोडणाऱ्या आपल्या सारख्या अन्नपूर्णेच्या उपासकाला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभकामना.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
Khup chaan watla sarvesh , kiti atmiyateni ani oghavtya basher lihila ahess thanks a lot dear ,modify no 3 chi athawan kadhun dole panawLet
ReplyDelete