Friday, May 1, 2020

विचारांची विवेक वाणी !! 🎤🙏


श्री.विवेक घळसासी !! राष्ट्र विचारांचे उत्तम वक्ते, विद्यावाचस्पती, वक्तादशसहस्त्रेषु,सप्ताक्षरीचा अमृत वाणी मंत्रच आहे. आज काकांबद्दल लिहायला घेताना हिम्मत करूनच लिहितोय. खरंतर त्यांना आवडेल की नाही याबद्दल साशंकीत आहे. पण तरी त्यांना आवडेल ही खात्री सुद्धा आहे.

श्री.विवेक कृष्णाजी घळसासी  नाव व्याख्याने,प्रवचनातून वक्तृत्वाच्या शिखरावर आहे. काकांना वक्तृत्त्वाचा वारसाही घरातूनच मिळाला आहे. ८० च्या दशकापासून काकांची व्याख्याने व प्रवचनासाठी देश-विदेश प्रवास सुरु झाला. दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश,आंध्र प्रदेश,कर्नाटक राज्यांत मराठी आणि अमराठी श्रोत्यांसांठी अनेक व्याख्याने ते करत असतात. भारतीय तत्त्वज्ञान,संत कार्याविषयी युरोपीय देशांमध्ये केवळ युरोपीय लोकांसाठी सलग सहा महिने प्रवास-व्याख्याने,चर्चासत्रासाठी त्यांचा प्रवास झाला आहे आणि अजूनही अधून-मधून होत असतो. मराठी आणि हिंदीतून श्रीमद्‌ भागवत सप्ताह तसेच श्रीरामचरितमानस सप्ताहांचेही अनेक ठिकाणी यशस्वी आयोजन होत असते. गेल्या दोन तपाहून अधिक काळात साडेतीन- चार हजारहुन अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत आणि आजही देतात आहे. आज संपूर्ण देश आणि विदेशात व्याख्यानांच्या रूपाने सततचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. श्रद्धेय गोविंददेवगिरी महाराज त्यांना "अध्ययन शिरोमणी" ह्याच नावाने संबोधित करतात. 

विवेकजी काका धडाडीचे पत्रकार असून १५ वर्ष सोलापूर तरुण भारताचे संपादक होते. त्यांचा वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, आकाशवाणी यात ही बराच प्रदीर्घ अनुभव आहे. याद्वारे सतत जनप्रबोधन ते करत असतात. ६ वर्ष वनवासी क्षेत्रात पूर्णकालीन कार्यकर्ते म्हणून त्यांनी सेवा कार्य केले आहे. ह्या कार्यात स्मिता काकूंची सुद्धा त्यांना पूर्ण साथ होती. काकांबद्दल एक सांगण्याची गोष्ट म्हणजे त्यांना युवकांशी चर्चा करायला फार आवडते. युवकांशी बोलतांना त्यांच्यातलेच एक वाटतील इतका सहज संवाद त्यांचा असतो. सार्धशतीच्या वेळी स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचा वेध व उद्बोधक विचार "युवा चेतना-स्वामी विवेकानंद" ह्या पुस्तकात काकांनी मांडला आहे. कमी शब्दात व्यापक विचार ही काकांची लेखनशैली जी मनाला कायमच भावते आणि त्यांचा कायम आग्रह असतो की कमी शब्दांत आपले विचार मांडता यावे. माउलींच्या शब्दात सांगायचे झाले तर ' मितुले आणि सांच '.  आम्ही भावंडांनी कौटुंबिक भागवतात काकांचा सहवास अनुभवला आहे आणि आता व्याख्यानाच्या निमित्ताने,कौटुंबिक कार्यप्रसंगी ही अनुभवत असतो. 

काकांबद्दल आणखीन काय लिहिणार..त्यांच्या सहवासात जो जो आला तो अधिक त्याबद्दल सांगेल. आम्हा भावंडांचे त्यांच्या बरोबर एक वेगळेच नाते निर्माण झाले आहेत. कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य असल्यासारखाच घनिष्ठ ऋणानुबंध निर्माण झाला आहे. आजही हे स्नेहबंध निरंतर दृढ होत आहेत. काकांचे आशीर्वाद व मार्गदर्शन कायमच मिळते व ते आपल्या सर्वांचे मोठे भाग्य आहे. सहज एकदा गप्पांच्या ओघात काकांना अनुभवांबद्दल विचारले असता, त्यावेळी त्यांनी सांगितलेला किस्सा आजही आठवणीत आहे. गानस्वरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांचा सोलापुरात नागरी सत्कार होता.' मला गायला सांगायचे नाही' ही त्यांची अट होती. पण सर्वांना तर त्यांनी काही गायला हवे असे वाटत होते. श्री. शरदराव पवार यांच्यासह अनेक मंत्रीही याच मताचे होते. पण दिदींना कसं सांगायचे ? काका सूत्रसंचालन करत होते. धाडस करुन त्यांनी विनंती केली आणि दोन पदे त्या गायल्या इतकेच नव्हे तर पुढे पुण्याच्या 'बालगंधर्व' मध्ये, मा.बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात पुन्हा दीदी आणि काका एकत्र आले. तेव्हा त्या मिश्किलपणे म्हणाल्या,'आज गायची गळ घालू नका बरं !' 

खरंतर प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक विचाराने बघता येते हे काकांना भेटल्यावर कायम अनुभवता येते. "ज्ञानयज्ञातील याज्ञीक" म्हणूनच काकांचा गौरव करता येईल आणि हीच काकांची ओळख सार्थ ठरेल. विवेक विचारांच्या वाणीचा श्रवणानंद असाच उत्तरोत्तर मिळत रहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कवी बा.भ.बोरकरांच्या 'लावण्यरेखा' कवितेच्या शब्दांचा आधार घेत लेखणीला विराम देतो. 

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके 
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

No comments:

Post a Comment