Wednesday, April 29, 2020

आनंदघन प.पू.विजय काका !! 🚩🙏



प.पू.श्री.विजय काका पोफळी. दत्तसंप्रदायकवर्धक प.पू. पंडित काका धनागरे यांचे उत्तराधिकारी हीच त्यांची मर्यादित ओळख न राहता आज त्यांचे नाव आपल्या सद्गुरुंच्या संकल्पपूर्तीसाठी अत्यंत कष्टपूर्वक पूर्णत्वास नेलेल्या साधकाचे आदर्श जीवन कसे असावे ह्याचे आदर्शवत सद्गुरू म्हणून गौरव व्हावा असेच प.पू. काकांचे कार्य आहे. 

विजयादशमीच्या सुमुहुर्तावर नागपूर येथे प.पू. काकांचा जन्म झाला. लहानपणापासून लाभलेल्या एका थोर दत्तावतारी संतपुरुषाचा सहवास,मार्गदर्शन व कृपाछत्रामुळे आणि हे अधिकारी सत्पुरुष म्हणजे प.पू. समर्थ सद्गुरू श्री पंडित काका धनागरे महाराज होते. ब्र.प.प.श्री टेंब्येस्वामी महाराजांनी संपादित केलेली दत्तभक्तीची वेल पुढील संवर्धनाकरिता इंदोरचे संतश्रेष्ठ प.पू.श्री नाना महाराज तराणेकर यांना सुपूर्द केली. नाना महाराजांच्या करकमलाद्वारे प्राप्त झालेल्या दत्तभक्ती संप्रदायवर्धनाचे व्रत अखंडपणे आयुष्यभर जोपासणाऱ्या प.पू.पंडित काकांनी आपले शिष्योत्तम प्रिय अशा प. पू.श्री.विजय काका पोफळी यांना गुरुवार दि.१ नोव्हेंबर २००७ रोजी,अश्विन कृ.सप्तमी १९२९ (पूर्ण गुरुपूष्यामृत योग) या सुमुहुर्तावर गुरुपदी आरुढ केले आणि आपले उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले. आज प.पू. विजय काकांच्या रुपात प्रत्यक्ष पंडित काकाच कार्यरत आहेत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. सुदैवाने काकांच्या कार्यावर शब्दांची ओंजळ वाहताना गुरुपुष्यामृत योग यावा हा सुद्धा मी कृपाशीर्वाद समजतो.  

प.पू.श्री विजयकाकांनी २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात वाशीम येथील श्री वासुदेव आश्रमाचे रुपांतर एका भव्य दिव्य अशा दत्त नर्मदा मंदिरात केले. प.पू.श्री पंडित काकांनी तीन वर्षात केलेली नर्मदा परिक्रमा व प.पू.श्री विजयकाकांनी सद्गुरूमाऊली दत्तलीन झाल्यानंतर नेमक्या तीन वर्षात एकहाती निर्माण केलेले दत्तनर्मदा मंदिर या गुरुशिष्यांचे अलौकिक सामर्थ्य,तादात्म्य भक्तोद्धार्णाकरिता कार्यरत असल्याची प्रचिती आपल्याला येते. याही सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले होते.

गुरुपौर्णिमा,कुष्मांड नवमी, मंदिरस्थापना वर्धापनदिन,वाशीम येथील उन्हाळी संस्कार शिबीर यासारख्या असंख्य प्रसंगविशेष व नित्य उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य,संसारिक माणसांना उपासनेच्या माध्यमातून कर्मशुद्धी घडवणाऱ्या,नित्य संध्या-गायत्रीच्या उपदेशातून,वासुदेवाश्रम अभ्यासिकेच्या माध्यमातून प.पू.सद्गुरू श्री विजयकाकांचा अखंड प्रवास सुरु आहे. 

प.पू.श्री पंडितकाका देहात असतांना प.पू.श्री विजयकाका म्हणाले होती की आपला अमृतमहोत्सव आपण भव्यदिव्य व थाटामाटात साजरा करू. पण दैवी योजनेनुसार पंडित काका दत्तचरणी लीन झाले पण सद्गुरूंना दिलेले वचन हा मानस धरून पू.श्री विजयकाकांनी चतुर्वेद संहिता स्वाहाकार करण्याचे योजिले. वर्षभर दर महिन्याच्या शुद्ध नवमीला मास माहात्म्य साधून श्रीपवमान याग,श्रीदत्त याग,श्रीसौर याग,श्रीरुद्र याग,श्रीमन्यु याग, श्रीमहालक्ष्मी याग,श्रीविष्णुपंचायतन याग,श्रीनवग्रह याग,श्रीगायत्री याग,श्री नर्मदा याग संपन्न केले. यागाची सांगता श्रीचतुर्वेद संहिता स्वाहाकाराने झाली.भव्य दिव्य या स्वाहाकारात उपस्थित राहून ती अनुभूती सद्गुरू कृपेने मी अनुभवली आहे. माझ्या पाहण्यात 'न भूतो न भविष्यती' असा पहिला श्रीचतुर्वेद स्वाहाकार सोहळा आहे. 

सद्गुरूकृपेने मला या आश्रमात जाण्याचा योग ३-४ वेळा आला आहे. तेथील मनःशांती,पावित्र्य,देवांच्या अस्तित्वाची जाणीव व प.पू.विजय काकांच्या आदरातिथ्य हे सगळं दुर्मिळ आहे हे प्रकर्षाने जाणवते. आपण ही एकदा नक्की जाऊन या मग एकदा गेलात की जातच राहाल इतका सुंदर आश्रम व दत्तनर्मदा मंदिर परिसर आहे.दत्तसंप्रदायवर्धक प.पू. काकांचे कृपाशीर्वाद सदैव असावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. 

नर्मदे हर !!

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

5 comments:

  1. Replies
    1. श्री गुरु देव दत्त
      बढ़िया प्रस्तुति
      नारायण
      बन्सी पाठक, कोराडी

      Delete
  2. खुप सुंदर... नर्मदे हर...!

    ReplyDelete
  3. धन्यवाद..🙏 हर नर्मदे !!

    ReplyDelete