आज देशामध्ये खरी लढाई लढत आहेत, ते म्हणजे डॉक्टर,सफाई कामगार,पोलीस अधिकारी आणि कोरोनाला हरवण्यासाठी अत्यावश्यक कामं करणारा प्रत्येक कर्मचारी. देशभरातून या 'कोरोना कमांडो'ची प्रशंसा केली जात आहे. कोरोना व्हायरस दिवंसेदिवस रौद्ररुप धारण करत आहे. कोरोनाचे सावट आज संपूर्ण जगावर आहे. आज त्याने कहर माजवलेला आहे. आपण प्रत्येकजण केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निर्देशांचे पालन करत आहोत आणि आलेल्या या संकटाशी घरूनच लढाईच्या तयारीत आहोत.
पण या लढाईत प्रत्यक्ष युद्ध भूमीवर लढणारे डॉक्टर, पोलीस कर्मचारी,सफाई कामगार,जनतेने निवडून दिलेले सेवक,सामाजिक भान जपत सेवा कार्य करण्याऱ्या सेवा भावी संस्था,परिसर स्वच्छ राहण्यासाठी सकाळी येत असलेले सफाई कामगार आणि इतर ज्ञात-अज्ञात जे या संकटाशी आपल्या प्रकृतीला जपत कार्य करणारे सारे जण सर्वप्रथम यांच्याबद्दल आदरयुक्त कृतज्ञता अर्पण करण्याची आवश्यकता आहे. ज्या परिस्थितीत हे लढत आहे यानें मनाच्या कोपऱ्यात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. यांच्या कौतुकास्पद कार्यासाठी शब्द सुद्धा कमी पडतील इतकं मोठं काम ही सारी मंडळी करतात आहे. आज कोरोनाशी सगळ्यात जवळचा संबंध हा आरोग्य विभागाचा आहे तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा संबंध हा प्रत्यक्ष आहे. ही सगळी मंडळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळताना दिसत आहेत. समाजातील बरीच दानशूर व्यक्ती व संस्थांनी आर्थिक मदत दिली आहेच पण या लढाईत सर्व डॉक्टर, नर्स आणि आरोग्य विभागाच्या संबंधित प्रत्येकाने देशासाठी आपलं जीवन वाहून घेतलेले सकारात्मक चित्र देशाने बघितले आणि बघतोय आणि ह्यासाठी खरंच संपूर्ण देश यांच्या अतुलनीय कार्यासाठी सदैव ऋणात राहील हीच अपेक्षा आहे.
वर्दीतला देवमाणूस अर्थात पोलीस. प्रत्येक वेळी ड्युटी करून जेव्हा घरी जात असेल तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट चालू असेल. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना तर काही होणार नाही ना. आपण सतत बाहेर असतो, शेकडो लोकांच्या संपर्कात येतो, आपल्याला काही झालं तर ठीक पण आपण हा आजार घरी तर घेऊन जाणार नाही ना घरातल्या कुठल्याही गोष्टीला हात लावताना मनात भीती तर असेलच..शेवटी ती सुद्धा माणसेच आहे. पोलीस कर्मचारी आता तर या संकटाशी संपूर्ण समर्पण भावनेने सामना करत आहेत, कुठल्याही साधनेशिवाय दिलेले कार्य करतात आहे. आम्ही पूर्ण क्षमतेने, प्राणपणाने लढू हा त्यांचा विश्वास आहे आणि ते दिवसरात्र एकत्र करत काम करत आहे आणि आम्हाला काळजी फक्त आमच्या कुटुंबियांची आहे.
सफाई कामगार ह्या दोघांच्या खालोखाल ह्यांचे कार्य सुद्धा त्याच पूर्ण समर्पित भावनेने सुरू आहे. परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी ते काम करत आहे. घरचा कचरा रोज बाहेर पडावा त्याची विल्हेवाट लागावी यासाठी कचऱ्याची गाडी रोज २-३ दा दारात येते. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांच्या डोक्यात सतत हेच चालू असत. हे संकट लवकर टळावे आणि पुन्हा सारे सुरळीत व्हावे. सगळे सफाई कर्मचारी आलेलं काम पूर्ण करत आहेत कुणीच टाळाटाळ करत नाहीत.
कृपया सहकार्य करा,घरातच रहा,विनाकारण बाहेर पडूच नका, ह्या संकटाशी लढणाऱ्या कोणत्याच पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागाचा कर्मचारी, डॉक्टर, सफाई कामगार किंवा ह्याबाबत संबंधित कोणताही कर्मचारी ह्यांच्याशी वाद घालू नका ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत हे समजा आणि सहकार्य करा.
पुढच्यावर्षी ऑस्कर,गोल्डन ग्लोब अवॉर्ड, फेमिना,आयफा यांसारखे पुरस्कार सोहळे नकोच,ते नट नट्या,खेळाडू रेड कार्पेट वर चालणारे नकोच,पुढच्यावर्षी ह्या आलेल्या संकटात धैर्याने समोर गेलेली माणसं अर्थात डॉक्टर,नर्स,आरोग्य विभाग संबंधित सारे जण,सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते,समाजसेवक,दुकानदार, घरपोच सामान आणून देणारे कार्यकर्ते,पोलीस,सफाई कर्मचारी हे सारे जण त्या रेड कार्पेट वर चालावे आणि त्यांचा गौरव व्हावा. कारण खरं तर आज हे धन्यवादास पात्र आहेत आलेल्या परिस्थितीला धैर्याने समोर जात आहेत आणि आज आपण ह्यांच्यामुळे सुखाचे चार घास एकत्रितपणे येऊन खाऊ शकतो आहे. ह्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाहींच. आपण आपल्या कर्तव्याची जाण ठेवत सकारात्मक दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे.
स्वस्थ रहा,घरी रहा,काळजी घ्या…
✍️ सर्वेश फडणवीस
#IndiaFightsCorona #Corona_commando
No comments:
Post a Comment