भारत !! 'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय. अशा या भरतभूमीत जन्माला येणं खरंतर ही भाग्याची गोष्ट म्हणायला हवी. विष्णू पुराणातला पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो.
उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद्भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।।
म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जी भूमी तिचे नाव आहे भारत अन् त्या भारतभूमीची संतती ते भारतीय आहेत. अतिशय चिरपुरातन इतिहास आपल्या भूमीला लाभलेला आहे. आणि ह्यात आपण जन्माला आलो आहे ही म्हणजे नक्कीच पूर्वसंचिताचे देणं आहे. गीतेत भगवंतांनी सुद्धा सांगितलं आहे..
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत I
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृज्याहम II
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम I
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे II
हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.
आज देशाला ७० वर्षांनंतर जे नेतृत्व लाभलं आहे यात नक्कीच विलक्षण असं काहीतरी असावं हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी या माणसाबद्दल काय बोलायचे. काल पुन्हा त्यांनी कोट्यवधी जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केलं. २१ दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये कुठे थोडं जीवावर येत असताना वातावरणात चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांनी छोट्याशा कृतीतून जगाला दाखवले. दीपोत्सव ह्या छोट्या ९ मिनिटांच्या कृतीतून अंधःकारावर विजय मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न देशभरात उत्साहाने संपन्न झाला. आलेल्या परिस्थिती मध्ये नेतृत्वावर किती विश्वास असावा याचे ते द्योतक मानायला हवे. समाजातील प्रत्येक घटकाने त्याला जी उंची मिळवून दिली ती शब्दातीत अशीच आहे. आज छोट्या छोट्या कृतीतून त्यांनी या जागतिक महामारीत सगळ्या देशातील जनतेला जे सांभाळले आणि सांभाळत आहेत त्याने पुन्हा प्रत्येकाच्या मनांत घर केलं आणि त्यांची प्रत्येक कृती आणि त्या कृतीतून सामाजिक जाणिव करून देण्याचे आश्वासन ते कायमच देत असतात. आज जगाला भारताच्या भविष्याची जाणीव झाली आहे.
श्री.योगी अरविंद यांनी भारताविषयी केलेले भाकित खरे होताना दिसत आहेत असे वाटते.
" India of the ages is not dead..has to do something for herself and for the world "
प्राचीन युगांचा हा भारत मृत झालेला नाही. स्वतः करिता व विश्वाकरिता तो काहीतरी ( भले ) करणार आहे.
The sun of India would rise..overflow the World.(speeches of Shri Aurobindo)
भारताचा सूर्य उगवेल व सर्व जगाला प्रकाशाने भारुन टाकेल हे त्यांचे उद्गार महत्त्वाचे वाटतात.
कर्तृत्ववान व्यक्तीकडून अपेक्षा ही तश्याच ठेवल्या जातात त्यामुळे या प्रधानसेवकाकडून १३० कोटी देशवासियांनी अपेक्षा ठेवल्या त्या रास्त आहे. आणि या जागतिक महामारीतून आपण सुखरूप बाहेर पडणार हा विश्वास वाटतो. कदाचित जगाची जी वाटचाल सुरू आहे त्याने नवा इतिहास नक्कीच लिहिला जाणार आहे आणि याचे जजीवंत आपण साक्षीदार असणार आहोत. कुठेतरी वाटतं की योगी अरविंद यांनी केलेलं भाकीत खरं होण्याची हीच तर वेळ नसेल. पण आज राष्ट्रीय नेतृत्वाची जी वर्धिष्णू वाटचाल सुरू आहे त्याने विश्वास आहेच की भारताचा सूर्य आपल्या प्रकाशाने संपूर्ण जगाला व्यापून टाकेल. शेवटी ह्याच संघगीताच्या ओळी मनात येतात,
विश्व में गूँजे हमारी भारती जन जन उतारे आरती
धन्य देश महान धन्य हिंदुस्थान
✍️ सर्वेश फडणवीस
#9baje9minute #9Pics
No comments:
Post a Comment