भृगकुलभूषण "भगवान परशुराम",भारताच्या प्राचीनतम इतिहासातलं एक असं नाव की ज्या नावापुढे एकीकडे अनेकानेक मस्तकं आदरानं झुकतात तर दुसरीकडे कैक अहंकारी , गर्वोन्नत आणि दुर्वर्तनी नेस्तनाबूत होतात.
भगवान परशुरामांच नाव जरी उच्चारल तरी,कोणाच्याही मनःचक्षुपुढे एक महाबलाढय,गौरकाय तेजस्वी अशी दिव्य आकृति उभी राहते.मुशीतून काढावी तशी प्रमाणबद्ध शरीरयष्टी लोहकांबी सारखे सुदृढ़ हातपाय,भरदार वक्ष दाढीमिशानी आच्छादित रौद्र चेहरा,कमरेला नेसलेल्या आखूड शुभ्र वस्त्रावर घट्ट आवळून बांधलेली मुंजगवताची मेखला,पाठीवर मृगाजिन आणि बाणाचा अक्षय्य भाता,एका हातात परशू तर दुसऱ्या खांद्यावर वैष्णव धनुष्य, दंड-मनगटावर, जटांवर बांधलेल्या आणि गळ्यात रूळणाऱ्या रुद्राक्षमाळा,तर खदीरांगासारख्या आरक्त नेत्रातून बरसणारा क्रोधाग्नी,परशुराम असे एका योद्ध्याच्या रुपात जनमानसात ठरलेले आहेत.
परशुरामांच हे रूप जितकं सत्य आहे,तितकंच हेही सत्य आहे की,याच बलदंड देहात एका अत्यंत तपोनिष्ठ आणि जनकल्याणाची कळकळ असणाऱ्या ऋषीचं वास्तव्य आहे आणि त्या ऋषीचं रुपही त्याच्या विचारांइतकंच प्रसन्न,शांत,गंभीर आणि आश्वासक आहे.भ्रूगुंच्या परंपरेला शोभणारी सुहास्य मुद्रा,तेजस्वी नेत्र,हातात शस्त्रांच्या जागी जपमाळ घेतलेले,शरीरावर रुधिराऐवजी भस्माचे विलेपन केलेले,वरमुद्रा धारण केलेले परशुराम खूप कमी लोकांना माहिती आहेत.जेव्हा गरज असेल तेव्हा समाजकल्याणाची कळकळ असणारांनी शास्त्र बाजूला ठेवून शस्त्र धारण करणं हाच त्यांचा खरा धर्म आहे.
शौर्य हे नेहमीच विकराळ असतं आणि अधिकार,सत्ता,संपत्ती,शास्त्रविद्येतील निपुणता ज्यांच्या जवळ आहे ,त्यांनी त्यांच्या याच क्षमतांच्या आधारावर समाजातल्या अन्य घटकांवर वर्चस्व गाजवण्याची आणि त्यांना क्षत करण्याची वृत्ती जोपासली,तर त्यांच निर्दालन करण्यासाठी अशा विकराळ शौर्याला अवतीर्ण व्हावं लागलं.या अवतरणाची जबाबदारी परशुरामांवर आली,त्यांनी ती अत्यंत कुशलतेने आणि कठोरपणे पार पाडली.आपल्या या कार्यानंतर त्यांनी सर्वस्वाच दान केलं आणि महेंद्रगिरीवर तपस्येसाठी निघून गेले.
लेखीकेशी बोलताना हा विषय समजला. लेखिका डाँ. सौ.भारती सुदामे यांची याच विषयाची अभ्यासपूर्ण कादंबरी आहे. ७०० पानांच्या या कादंबरीत व्यापक शब्दांत परशुरामांच्या जीवनकार्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. प्रत्येकाच्या संग्रही असावे अशी ही विजय प्रकाशन प्रकाशित कांदबरी "भृगुनंदन" आणि सांगायला आनंद आहे की याची हिंदी आवृत्ती सुद्धा निघाली आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#भगवान_परशुराम #भृगुनंदन #परशुराम_जयंती
No comments:
Post a Comment