रेणुका देशकर..सप्ताक्षरीचा शब्द मंत्र असंच यांचा गौरव करण्यात येईल. आज निवेदन आणि सूत्रसंचालन या अनोख्या क्षेत्रांत गेली वीस वर्षे,जवळपास साडेतीन हजार हुन अधिक कार्यक्रमांची अनुभवांची शिदोरी त्यांच्याजवळ आहे. नागपूर आणि नागपूरकरांना अभिमान आणि हेवा वाटेल असेच रेणुका देशकर यांचे कार्य आहे.
आज कुठलाही कार्यक्रम असो रेणुका देशकर यांच्या निवेदन अथवा सूत्रसंचालन याने कार्यक्रम प्रत्येकवेळी वेगळीच उंची गाठतो. अनेक श्रोते याच साठी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात की त्यांना रेणुका देशकर यांच्या निवेदनाची मेजवानी मिळेल. अतिशय अभ्यासपूर्ण आणि अनोखी शैली ही रेणुका देशकर यांच्या निवेदनाची उत्तम आणि जमेची बाजू आहे. अभ्यासोनी प्रगटावे या समर्थ उक्तीचे रेणुका देशकर यथार्थ पालन करतांना जाणवतात. कारण त्याचा प्रत्यय श्रोत्यांना त्यांच्या निवेदनातून कायमच जाणवत असतो.'वाचन आणि प्रचंड वाचन' हीच त्यांच्या निवेदनाची शैली म्हणता येईल. कायम श्रोत्यांना नवनवीन माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि ह्याच शैलीसाठी त्या आज साता-समुद्रापार अमेरिकेत सुद्धा कार्यक्रम सादर करून आल्या आहेत.
नवविधाभक्तीचे सारे पैलू त्यांच्या निवेदनात दिसतात. आवाजाची बाजू सुद्धा अतिशय समृद्ध आहे. वाचनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. घराण्यात निवेदन वा सूत्रसंचालन याचा वारसा नसतांना आज स्वतःच्या जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी वेगळी उंची गाठली आहे. रेणुका देशकर हे खरंतर अष्टपैलू आणि एकमेवाद्वितीय असं व्यक्तिमत्त्व म्हणता येईल. आज त्या सप्तकच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना सादर करत असतात आणि नागपूरकर रसिक त्यांना भरभरून उपस्थिती दर्शवत आशीर्वाद देत असतात.
खरं सांगायचं तर प्रत्येक व्यक्ती मध्ये कुठला तरी सुप्तगुण असतो. आपल्या संपर्कातील असलेल्या व्यक्तीचा तो गुण अंगिकारण्याचा प्रयत्न करावा आणि यशस्वी वाटचाल करावी हाच जगण्याचा नियम आहे आणि आज रेणुका देशकर यांची कारकीर्द उंचावर आहे पण तरीही पाय जमिनीवर आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमात ते कायमच जाणवते. उपजतच असलेला गुण आणि त्याला छान खत, पाणी दिले की झाड छान आनंदाने बहरत असते आणि रेणुका देशकर यांचे निवेदन क्षेत्र असेच बहरत आहे आणि त्या स्वतःला कायम एकलव्याचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करत आहेत त्यांची एकलव्यासारखी कायम नवनवीन आणि नाविन्यपूर्ण शिकण्याची वृत्ती समर्पक आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक व दिशादर्शक आहे. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने रेणुका देशकर यांचे कार्य सुरू आहे. त्यांच्याशी भेटल्यावर त्या कायम एक मंत्र देत असतात त्या म्हणतात,"आपण जे कार्य करतो त्यातही समाधान महत्वाचे आहे आणि तेच अधिक महत्वाचे आहे कारण त्यातूनच आपण एक दिवस नक्कीच यशोशिखरावर जात असतो." त्यांच्या कार्यशैलीसाठी त्या सदैव चिरपरिचित राहणार आहेत यात शंकाच नाही. आपल्या कार्यातील जिद्द आणि चिकटीला सलाम आणि भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा !! 💐🙏
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment