श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म आहे असे महर्षि वसिष्ठ यांनी वर्णन केले आहे.श्रीराम हेच राष्ट्राचे चैतन्य आहेत. राष्ट्र निमार्णासाठी भक्ती निर्माण करणे महत्त्वाचे आहेच. पण राम म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे राम हे समीकरणच आहे.भारतीय संस्कृती निसर्गाशी सुसंगत आहे. मोठा इतिहास असलेल्या या संस्कृतीमध्ये अनेक राजे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या आचार विचाराने या राष्ट्राला सशक्त केले. त्यातच श्रीराम यांनी आपल्या सुसंस्कृतपणाने परंपराच निर्माण केली.राष्ट्रभक्ती काय असते हेच श्रीरामाने सांगितले. श्रीरामांकडील युद्ध आणि राजनीती सर्वसमावेशक होती.सर्वांना समान न्याय उच्चनीच असा कसलाच भेदभाव नाही असे हे श्रीराम आहेत. क्षात्रधर्माचे मूर्तिमंत स्वरूप श्रीराम रणकर्कश आहेत. कोदंड हे त्यांचे प्रतीक आहे. प्रेमासाठी प्रेम,कर्तव्यासाठी कर्तव्य आणि चरित्र्यासाठी चारित्र्य हे रामराज्याचे मूळ सूत्र आहे. भारतीय सांस्कृतिक आदर्शाचा चिरंतन दीपस्तंभ म्हणजे रामायण वा रामकथा.
कोरोनानामक महामारीने आज संपूर्ण जग त्रस्त आहे. रोजचे आकडे ऐकताना याची भीषणता अधिक जाणवते. आणि ह्याच जाणीवांचा विचार करत विद्यमान सरकारने ऐतिहासिक मालिका रामायण दाखवून,रामनामाने जी ऊर्जा,मानसिक धैर्य दिले त्याने विद्यमान सरकार अभिनंदनास पात्र आहे. खरंतर कुठल्याही कलाकृतीला बनवायला जी मेहनत लागते त्यासाठी शब्दच नाही. १९८८ मध्ये जेव्हा रामायण ही कलाकृती प्रेक्षकांच्या समोर आली असेल तेव्हा किती गोष्टींना सामोरे जावे लागले असेल देवच जाणो. पण तरी रामायण हे आजही तसंच नितांत सुंदर, गोड आणि आनंददायी आहे. नुकतंच हे ही समजलं की दूरदर्शन वरील रामायण मालिकेने सर्व रेकॉर्ड मोडले. रामनामाची गोडी मुळातच अवीट आहे. रोज सकाळी आणि रात्री दूरदर्शनवर रामायण बघण्याची सवयच लागली होती. सगळे प्रसंग ऐकून,वाचून माहिती होतेच पण ते चित्रमय बघतांना वेगळाच भाव असतो.कधी कधी हे ही मनात येतं की सरकारला माहिती असावे की चैतन्याची स्फूर्ती ही श्रीराम आहेत आणि म्हणूनच पहिला निर्णय रामायण दाखवण्याचा घेतला. कारण या संकटात सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करते आहेच. पण रामनामाच्या नौकेत आपण तल्लीन होतो आणि जवळपास महिनाभर रामकथेत आपण मंत्रमुग्ध झालो होतो. हे दिवस कसे गेले समजले सुद्धा नाही.
खरतरं ही असंख्य सद्गुणांच्या लोकोत्तर रसायनाने साकारलेल्या श्रीरामांच्या विभूतीमत्त्वाची जादू असंच म्हणता येईल.त्यांच्याबद्दल वाचल्याशिवाय, बोलल्याशिवाय, लिहिल्याशिवाय,ऐकल्याशिवाय भल्याभल्याना राहता येत नाहीच.जे उत्तम,उदात्त,उन्नत आणि मधुर ते सर्व श्रीरामांमध्ये आढळल्याने त्यांच्या चिंतनात आपल्या मनाला सुखद आनंद मिळतो. राष्ट्रपुरूष श्रीरामांच्या सर्वांगीण चारित्र्याचा आदर्श आपण सर्व जण आपला ध्येयविषय बनवून आलेल्या संकटावर मात करण्यासाठी तत्पर राहुया..
✍️ सर्वेश फडणवीस
#रामायण #दूरदर्शन #लॉकडाऊनडायरी
No comments:
Post a Comment