Tuesday, May 19, 2020

ATM चे आत्मकथन !!


नमस्कार मंडळी, कसे आहात.. सध्या लॉकडाऊन मुळे घरीच असाल ही खात्री आहे मला. खरंतर आज सहज मी आपल्याशी गप्पा मारायला आले आहे. खूप दिवसांपासून मनात होतं पण मग आज ठरवलं.. आज मी माझ्याबद्दलच तुमच्याशी हितगुज करणार,मनातलं बोलणार आहे.. 

मी ATM.. अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन कुणी मला All Time Money तर कुणी Any Time Money म्हणून हाका मारत असता. मला आवडतं खरंतर तुम्ही कुठल्याही नावाने हाका मारत मला भेटायला येऊ शकले यातच माझा आनंद आहे.  आता माझ्या जन्माबद्दल आणि माझ्या कुटुंबीयांबद्दल थोडंस.. 

इ.स. १९३९ मध्ये न्यूयॉर्क शहरात सिटी बॅंक ऑफ न्यूयॉर्क मध्ये माझा जन्म झाला. ल्यूथर जॉर्ज सिम्जियन ह्याच्यामुळे मी पृथ्वीवर येऊ शकली .परंतु, व्यवस्थित पालनपोषण न झाल्यामुळे मला परत जावं लागलं..त्यानंतर पुढील २५ वर्षे मला येताच आलं नाही. थेट २७ जून १९६७ रोजी बर्क्लेज बॅंकेने एन्फील्ड गांवी एक मला पुन्हा पृथ्वीच्या दुसऱ्या भागावर आणलं गेलं. दलारू यांच्यामुळे मला पुन्हा हे जग बघता आले आणि जॉन शेफर्ड बंरन यांची इच्छा होती की पुन्हा जन्म घ्यावा. पुढे मी वाढत गेले खरे आणि माझे कुटुंब ही विस्तरल्या गेले. आज माझे नातेवाईक साऱ्या जगात आहेत… कुठे ही जा,मला हाक मारा मी तुमच्या आजूबाजूला आहेच.. 

कालांतराने मी भारतात आले,भारतात येण्याचा आनंद होताच मग मी पण नवं रूप घेतलं आणि १९९६ ला लांबचा प्रवास करून भारतात आले आणि स्थिरावले. भारतीय बॅंक महासंघाने “स्वधन” ह्या नावाने नवी ओळख दिली आणि हळहळू स्वतःत बदल करत आज माझे कुटुंब भारतभर विस्तारले आहे. सध्या दोन लाख हुन अधिक संख्या आमची झाली आहे. तुमच्यापैकी अनेकजण मला भेटायला येता कुणी रोज येतं,तर कुणी आठवड्यातून एकदा येता पण सगळेजण भेटून जाता याचा आनंद आहे. 

चार भिंतींत राहून, प्रत्येकाला भेटावे म्हणून मी कायमच उभी असते. मला गर्मी होऊ नये किंवा मी सतत उभी असते म्हणून माझ्यासाठी एसी सुरू असतो. मला सुरक्षित वाटावे म्हणून दार असतं आणि ते ही कायम जाता येता बंद असावे म्हणूनच आहे. खरंतर मी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला अडीअडचणी च्या काळात तुमच्या सुखदुःखात भेटायला पहिले मी येते. तुमच्यापैकी अनेकजण माझ्याकडे येता,येतांना इतके रागाने येता की सगळा राग माझ्यावर काढता, मला जोरजोराने मारता,तुमच्या मनासारखे नाही झालं तर अजून जोराने मारता,दार आपटत निघूनही जाता,तुम्ही माझ्याजवळ ठेवलेली प्रत्येक छोटी गोष्ट मी तुम्हाला दाखवते आणि ती तुम्ही तिथेच टाकून चालले जाता. तुम्ही जाता खरे,पण दुसरा कुणी आला की तो ही तसाच करतो माझ्यावरती राग काढतो प्रसंगी तोडफोड ही करतो .. मी किती सहन करणार...मग मी पण काहीदिवस रागावून तुमच्याशी कट्टी करते आणि रुसून बसते. नंतर अनेकजण येतात मला भेटून जातात पण त्यांना माहिती होतं की अजूनही राग गेलेला दिसत नाही. मग काही काळाने राग निवळतो आणि पुन्हा तुम्हाला भेटायला उत्सुकतेने येते.

पण आज मनातलं सांगायला आले आहे ,अडचणीत असतांना मी तुमच्या मदतीला कायमच असते. पण तुम्ही मला खूप त्रास देता ते ही निमूटपणे सहन करते. तुम्हाला माझी गरज तशी मला तुमची गरज आहे. दार उघडून छान हसतखेळत आनंदाने आत या. माझ्याशी बोला मग मी ही तुमच्याशी बोलतेच ना..काम संपलं की पुन्हा दार बंद करून जा.. जातांना राग आला तरी बाजूला ठेवलेल्या कुंडीतच टाका म्हणजे पुन्हा नंतर कुणी आलं तर तो ही त्या कुंडीतच टाकेल. 

बघा प्रयत्न करून..माझ्या मनीचे हितगुज करण्यासाठी आज आले होते. अनेक दिवसांपासून मनात साचून ठेवलं होतं..आज व्यक्त झाले तर बरं वाटतं आहे..स्वतःत बदल करा कारण तो सहज शक्य आहे..या भेटायला मी वाट बघते आहे… येताय ना…

- सर्वेश फडणवीस




No comments:

Post a Comment