Sunday, June 26, 2022

ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।

गोव्यातील समृद्ध अशा राज्यातील मंदिरांच्या गाभाऱ्यात आपण दर्शनार्थ जातो आहे. मागच्यावेळी आपण मंगेशाच्या मंदिरात प्रवेश केला यावेळी म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आहोत. महालसा या नावातच मोठा गर्भितार्थ आहे. महालसा मधील ‘म’ म्हणजे ममत्व आणि माया. ‘ह’ म्हणजे हर्ष किंवा आनंद. ल म्हणजे लसत्व अर्थात तेज.

मार्दोल धर्मक्षेत्रस्थ शालिग्राम शिलास्थिते

ज्ञानाभय प्रदानेन पाहि सर्वान् महालसे ।।

महालसा देवी हे श्री विष्णूचे स्त्री रूप म्हणजेच श्री विष्णूचा मोहिनी अवतार आहे. या देवीच्या बाबतीत अनेक दंतकथा प्रचलित आहेत. देव आणि दानव यांच्यात युद्ध झाले तेव्हा दैत्य गुरू शुक्राचार्य यांनी संजीवनी विद्येचा उपयोग करून दानवांना पुनर्जीवित केले. परंतु देवांकडे अशी विद्या नसल्याने देवांचा पराभव झाला तेव्हा सर्व देव श्री विष्णूंना शरण गेले त्यांनी यावर काय उपाय करता येईल असा प्रश्न श्री विष्णूंना विचारला.विष्णूनी त्यांना अमृत प्राप्त करण्याचा उपदेश दिला व त्यासाठी समुद्र मंथन करावे असे सांगितले. 

देव आणि दैत्य यांनी समुद्र मंथन सुरू केले. या मंथनातून एक एक दिव्य अशी रत्ने बाहेर पडू लागले. यातूनच अप्सरा आणि अमृताचा सुंदर कलश आला. हा कलश पहाताच देव आणि दैत्य झटापटी करू लागले. कारण अमृत पिण्यामुळे अमरत्व मिळणार होते. या संकटातून पार होण्यासाठी विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले सर्वजण त्या रूपाकडे मोहित होऊन त्यांच्याकडे पहातच राहिले तेव्हा दैत्यांचे भान हरपून गेले आणि मोहिनीने देवांना अमृत पाजले, आणि दैत्य तसेच राहिले. त्या अवताराचे नाव मोहिनी. ती मोहिनी म्हणजेच साक्षात महालसा नारायणी आहे.

एका आख्यायिकेनुसार, महादेव मोहिनीच्या रूपावर प्रचंड मोहित झाले आणि त्यांनी त्यावेळी मोहिनीकडून वचन घेतलं होतं की जेव्हा ते मार्तंड भैरवाचा जन्म घेतील तेव्हा ती म्हाळसा म्हणून जन्म घेईल आणि तेव्हा ते तिच्याशी विवाह करतील. महादेवाचा मल्हारी मार्तंड हा अवतार भूतलावर आला आणि मणी-मल्ल या दैत्याचा वध केल्यावर तिमा शेट यांच्या घरी म्हाळसा जन्म घेते. पुढे मल्हारी आणि मोहिनीचा अवतार असणारी म्हाळसा यांचा विवाह होतो ही आख्यायिका जय मल्हार मुळे प्रचलित झाली आहे.  

गोव्यातील वेर्णेंच्या टेकडीवर एक तळं आहे, तिथे खालून नैसर्गिक झरा वाहतो आणि या तळ्यात कायम पाणी असतं. हे तळं कधीपासून इथे आहे हे कोणालाही माहीत नाही, आणि तिथेच शेजारी श्री म्हाळसेचे अप्रतिम मंदिर होते. सासष्टीमधील हे प्राचीन मंदिर पोर्तुगीज येईपर्यंत येथेच होते कालांतराने या मंदिराची जुनं मंदिर अशी ओळख झाली आणि आज मुख्य मंदिर म्हार्दोळ येथे बघायला मिळतं आणि वेर्णेंला आता 'जुनं म्हार्दोळ' असे म्हटले जाते. सारस्वत ब्राह्मण गोव्यात येण्याआधीपासूच म्हाळसाची उपासना सुरू होती. म्हार्दोळच्या या देवीचं मंदिर वेर्णें येथे सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत होतं पण नंतर देवी म्हार्दोळ येथे आली. पोर्तुगीजांच्या काळात हे स्थलांतर झाले. हे मंदिर त्या काळी नक्कीच नष्ट केलं गेलं पण या भग्न मंदिराचे पुनर्निर्माण झाले आणि देवीच्या या मूळ ठिकाणी आज एक मंदिर बघायला मिळतं.

जेव्हा इतर मंदिरातील मूर्ती हलवल्या गेल्या तेव्हा बहुदा म्हाळसाची मूर्तीही हलविली गेली. देवीचे सोन्याचे दागिने पण दुसरीकडे नेले आणि पोर्तुगीजांच्या नकळतपणे ही मूर्ती हळूच हलवली आणि ती प्रियोळ येथे आणली. त्या गावच्या देसाई लोकांनी तिचं मनापासून स्वागत केलं आणि तिचे रोजचे विधी, पूजा अर्चा हे सगळं व्यवस्थित व्हावं यासाठी जमेल ती सगळी मदत केली. अडचणीच्या काळातील ही मदत मोलाची होती. पेशव्यांच्या दरबारात एक मंत्री होते, ते उच्च पदावर होते. त्यांचं नाव होतं, रामचंद्र मल्हार सुखटणकर. तो काळ होता १८ व्या शतकाच्या मध्याचा. त्यांनी पेशव्यांकडून या देवीच्या मंदिरासाठी जमीन मिळवली आणि मग तिथे देवीचं मंदिर उभं राहिलं. आज हेच मंदिर बघायला मिळतं. पुढे मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला आणि आताचे म्हार्दोळचं श्रीम्हाळसा नारायणी देवीचं मंदिर वास्तुकलेचा सर्वोत्तम नमुना म्हणून बघायला मिळतो आहे. 

श्रीम्हाळसा नारायणी या मंदिरात उभ्या स्वरुपात आहे. तिला चार हात आहेत. जमिनीवर पडलेल्या राक्षसाच्या अंगावर ती उभी आहे. देवीच्या उजव्या बाजूला या राक्षसाचं शीर आहे, हा राहू आहे; यानेच अमृत वाटपाच्या वेळी लबाडी केली होती. तिच्या उजव्या पुढच्या हातात तिने अजून एका राक्षसाला त्याच्या केसाला धरून धरलेलं आहे, याचं नाव विरोचन. या राक्षसाने गुडघे टेकलेले आहेत. तिच्या पुढच्या डाव्या हातात देवीने चंद्रासूर राक्षसाचं छाटलेलं शीर धरलेलं आहे. तिने मागच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात अमृत कुंभ धरलेला आहे. छाटलेल्या शिरातून खाली पडणारं रक्त चाटणारा सिंह देवीच्या डाव्या हाताला खाली उभा आहे.  देवीच्या भोवती असणार्‍या प्रभावळीवर देवीचं नाव लिहिलेलं आहे तसेच शंख, चक्र, शेष ही चिन्हे कोरलेली आहेत. या सगळ्या गोष्टी श्रीविष्णू यांच्याशी संबंधित आहेत. देवीच्या गळ्यात जानवं तर आहेच. ही प्रतिमा अतिशय सुंदर आहे. मंदिर परिसरात मुख्य मंदिराच्या उजव्या हाताला श्री शांतादुर्गा देवीचं स्वतंत्र मंदिर आहे. या मंदिरात जे काही विधी, सोहळे होतात, त्यात नेहमी शांतादुर्गा उजव्या हातालाच असते कारण श्री म्हाळसा देवीने तिला वचन दिलं होतं की मंदिरात तिला नेहमी अग्रपूजेचा मान दिला जाईल, त्यामुळे उजव्या बाजूचा मान नेहमी श्री संतेरीचाच असतो. येथे इतर देवतांचीही मंदिरे आहेत. 

इथे बरेच सण आणि उत्सव साजरे केले जातात पण इथलं शारदीय नवरात्र खूप मोठ्या प्रमाणात साजरे  केले जाते. नऊ रात्री इथे मखरोत्सव साजरा होतो. इथला माघातील जत्रोत्सव माघ कृष्ण चतुर्थी ते दशमी या काळात साजरा होतो, यात दोन्ही देवींच्या दररोज वेगवेगळ्या वाहनांमधून मिरवणुका निघतात. दर रविवारी येथे पालखी सोहळा आयोजित केला जातो. गोव्याच्या इतर मंदिरांप्रमाणे या मंदिराच्या प्रांगणातही सुरेख दीपस्तंभ आहे. हे मंदिर त्याच्या विशाल पितळी घंटेसाठी प्रसिद्ध आहे. ही देवी कितीतरी गौड सारस्वत ब्राह्मण, कऱ्हाडे ब्राह्मण, दैवज्ञ ब्राह्मण, भंडारी, शिंपी अशा कुळांची कुलदेवता आहे. अशी या म्हार्दोळच्या आई म्हाळसा नारायणीची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव असावी हीच तिच्या चरणी प्रार्थना आहे. 

सर्वेश फडणवीस 

8668541181


No comments:

Post a Comment