ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय. निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक यांनी संत ज्ञानेश्वरांचे आणि त्यांच्या साहित्याचे वर्णन केले आहे. मुळात माउली आणि आळंदी म्हंटले की मनात आत्मीयतेची वेगळीच भावना निर्माण होते. याच माउलींच्या संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आणि आषाढी एकादशी पालखी प्रस्थानाचे औचित्य साधत आपण संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्यात दर्शनार्थ जाणार आहोत.
ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार या दिवशी माउली समाधिस्थ झाले. खरंतर आळंदीचे नाव ऐकले की, ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्यप्रेमाने ओसंडून जात असलेली दयाघन ज्ञानमूर्ती एकदम डोळ्यांपुढे उभी राहते. सासरीअसलेल्या लेकीची, आईचे नाव ऐकले म्हणजे जी अवस्था होते, अगदी तशीच स्थिती तुम्हा आम्हा मराठी लेकरांची, श्रीज्ञानेश्वर माऊलींसंबंधी काही ऐकले की होते. मग तो मराठी माणूस सोलापूरचा असो, नाहीतर नागपूरकडील असो, उलट तो जितका दूर राहत असेल तितके त्याला ज्ञानेश्वर माउलींचे आकर्षण अधिक असते.
आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या काठी खेडच्या (राजगुरुनगर) दक्षिणेस वसले आहे. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले, त्यावरून हे नाव पडले. याचे कुबेरगंगा असेही नाव होते. कुबेराने हिच्या काठी धन पुरून ठेवले होते. ज्ञानदेवांच्या पासून पुढे देहूला श्री तुकाराम महाराज तिच्या काठीच राहिले, तेव्हा ती ज्ञानोबा- तुकारामाची 'इंद्रायणी' म्हणून आबालवृद्धांच्या तोंडी बसली. साधू हे तीर्थांना तीर्थत्व प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मूळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे. याचे अनेक पौराणिक संदर्भ ही सापडतात आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. ही देवाची आळंदी म्हणून प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या ६४ व्या अध्यायात आळंदीची वारूणा, अलका, कणिका, आनंद व सिद्ध क्षेत्र अशी नावे आलेली आहेत. मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे. ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वीही सिद्धेश्वर हे शंकराचे स्थान प्रसिद्ध होते; म्हणून या आळंदीस 'सिद्धेश्वर' म्हटलेले असावे. ज्ञानेश्वर महाराजांच्या देवळाला लागून पश्चिमेस हरिहरेंद्र ह्या नाथपंथीय स्वामींची समाधी आहे. तेथे त्यानंतर देऊळही बांधले आहे. आजही हा संपूर्ण परिसर अतिशय देखण्या आणि सुस्थितीत आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ज्या इमारतीत आहे, त्याला 'देऊळवाडा' म्हणतात. या इमारतीचे आवार भव्य आणि प्रशस्त आहे. चारी दिशांना मोठ्या भिंती आहेत. दक्षिण बाजूखेरीज बाकीच्या तीन भिंतीत उंच दरवाजे आहेत. पूर्वेच्या बाजूस गणपती आहे म्हणून त्या बाजूच्या डावीकडील दरवाजाला 'गणेशद्वार' म्हणतात आणि आत उजवीकडे 'हनुमानद्वार' देखील आहे. पश्चिमेस नदी आहे. तेथून पूर्वी पाणी आणीत; म्हणून त्या दरवाजाला 'पाणदरवाजा' म्हणतात. उत्तरेकडील दरवाजाला 'महाद्वार' म्हणतात. त्या दारातून आपणास आत जाता येते आणि तेथून समाधी सन्मुख दिसते.
देवळात प्रवेश करताना एक गोष्ट चटकन डोळ्यांत भरते; ती ही की देवळाची जी पहिली पायरी आहे, त्या पायरीचे दर्शन सर्वजण प्रथम घेतात. भाविक वारकरी या पायरीवर पाय न ठेवता ती ओलांडून आत जातात. याचे कारण या पायरीच्या मध्यभागी हैबतबाबा या भक्ताचा देह विसर्जित केला आहे. पंढरपूरला विठोबाच्या देवळाच्या प्रवेशद्वारी जशी नामदेवाची पायरी आहे, तशीच ही हैबतबाबांची पायरी आहे. माऊलींचे भक्त देवळात जाताना त्या पायरीला वंदन करतात.
तेथून पुढे गेल्यावर काळी तुकतुकीत घडीव शिळा दिसते. यालाच श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी म्हणतात. याच्याखालील जागेत सुमारे सातशे वर्षांपूर्वी ज्ञानदेव स्वतःच्या पायाने चालत जाऊन आसन घालून ध्यानस्थ बसले. ती जागा बंदिस्त केल्यामुळे त्यांचा देह आपल्याला दिसू शकत नाही, पण तेथून ते भक्तांची काळजी वाहत आहेत याचे प्रत्यंतर हमखास येते. सन १७५० मध्ये पुरंदर येथील आंबेकर देशपांडे यांनी या जागेवर सध्याचा गाभारा बांधला. नंतर १८७१ मध्ये या गाभाऱ्यावर शिखर बांधण्याचे काम त्या वेळचे पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार नंदराव नाईक यांनी केले. १९७७ साली या गाभाऱ्यात बिर्लाशेटजींच्या जयश्री चॅरिटी ट्रस्टने संगमरवरी दगड बसवून दिला आहे. त्यामुळे गाभारा स्वच्छ व प्रसन्न दिसतो. या गाभाऱ्यात समाधीजवळ विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. 'सकळ - तीर्थाचिये धूरे' असणारी पूज्य माता- पितरे व अंतरंगातील दैवत ही दोन्ही एकाच मूर्तीत साठविली आहेत. या गाभाऱ्याच्या पूर्व दिशेला एक लहान दार आहे. त्या पलीकडे शेजघर आहे. या शेजघरात पूजा-अर्चा याचे साहित्य ठेवण्यात येते.
समाधीचे दर्शन घेतल्यावर प्रदक्षिणा करायची पध्दत आहे. पूर्व दिशेने या प्रदक्षिणेस आरंभ होतो. दारातून गेल्यावर लगेच एक हेमाडपंथी पद्धतीने बांधलेला मंडप लागतो. त्यात सोळा खांब आहेत. या मंडपात गणेशाची फार जुनी मूर्ती आहे. श्रीगणपती चे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर लगेच मुक्ताबाईचा मंडप लागतो. तेथे मुक्ताबाईचे देऊळ आहे. हा मंडप सन १८८१ मध्ये आळंदीचे साक्षात्कारी स्वामी श्रीनृसिंह सरस्वती महाराज यांनी बांधला. प्रदक्षिणा करीत आपण महाद्वारापाशी येताना तेथे सोन्याचा पिंपळ म्हणून जो प्रसिद्ध अजान वृक्ष आहे, तो वाटेत लागतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचे महापुण्य या वृक्षापाशी उदयाला आले आणि तेथेच संन्यासी महाराजांची गाठ पडली. आणि या ससगळ्या भावंडांचा जन्म झाला. माउलींच्या माउलीचे हे तपश्चर्येचे स्थान आहे. ज्ञानरायाच्या देवळात या वृक्षाखाली जो बसतो त्याचा संसार सुखाचा होतो. ते सुख अक्षय अनंत असे आत्मसुख आहे. यावर सर्व वारकऱ्यांचा दृढ विश्वास आहे. आळंदी हे तीर्थस्थान आहे. माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात गेल्यावर प्रेम, वात्सल्य आणि ममतेने मनात वेगळीच भावना निर्माण होते. लक्ष्य वारकरी ऊन,वारा,पाऊस यांची तमा न बाळगता जवळपास वीस दिवस आळंदी ते पंढरपूर पालखीत चालत जातात. आपणही आज मनाने आळंदीत माउलींच्या दर्शनार्थ जाऊ या.
रामकृष्ण हरी.
सर्वेश फडणवीस
8668541181
No comments:
Post a Comment