Sunday, July 24, 2022

जय भगवान चिंतामणी देवा वरदेशा ।



भारतीयांचे आवडते आराध्य दैवत म्हणजे श्री गणेश आहे. हिंदू धर्मीयांच्या कोणत्याही पूजेचा प्रारंभ श्री गणेशाच्या पूजेनेच होतो. त्यामुळे श्री गणेशाच्या पूजेला व भक्तीला अग्रगण्य स्थान आहे. भारतात श्रीगणेशाची २१ अतिशय  महत्त्वाची स्थाने मानलेली आहेत. त्यापैकीच एक व श्री गणेशाचे चिंताहरण व मायामोहाचा विनाश करणारे मूर्त रूप श्री चिंतामणी गणेशाचे स्थान ‘श्री क्षेत्र कळंब’ येथील श्री चिंतामणी देवस्थान आहे. आज आपण याच श्री चिंतामणी गणपतीच्या मंदिरातील गाभाऱ्यात जाणार आहोत. 

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपातळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायर्‍या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.

या कळंबच्या एका ऋषीचा गृत्समदांचा उल्लेख वैदिक वाङ्मयात मोठ्या सन्मानाने येतो. पण मुळात गृत्समद हे वाचकमुनी यांचे सुपुत्र नसून इंद्र व वाचकमुनीची पत्नी मुकुंदा याचे अपत्य होते ही कथा आली आहे. त्यानंतर शापवाणी, गृत्समदास ही व्याधी अशा सर्व कथा या कळंब चिंतामणी स्थानात गुंतून पडल्या आहेत. गृत्समद ऋषी मोठे शेतीतज्ज्ञ व गणिती होते. वेदवाङ्मयात मात्र फक्त 'अतसी' म्हणजे लोकरीचा उल्लेख येतो. याच गृत्समद ऋषीने कापसाच्या बोंडापासून कापूस वेगळा करून त्याचे तंतू केले व त्या तंतूचे जाडेभरडे वस्त्र विणले. आज मानवास कापसाचे वरदान मिळाले आहे. अर्थात कापडाचा जनक म्हणून गृत्समदांचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. याच क्षेत्री अहिल्या तिच्या सौंदर्यावर भाळणारे गौतम ऋषी, प्रत्यक्ष इंद्रदेव यांच्या कथा विणल्या आहेत. श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा
उद्धार त्रेतायुगात श्रीरामांनी केला. शापवाणीने इंद्राचे कुष्ठ, गृत्समदाची व्याधी गणेश कुंडातील जलस्पर्शाने नाहिशी झाल्याची दंतकथा येथेच घडली आहे अशी लोकमान्यता आहे. 

'गणानां त्वा गणपतिं हवामहे,
कविं कवीनांमुपश्रवस्तम्,
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणपस्ते,
आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम्'

हा मंत्र गृत्समदांनी रचला आहे. या मंत्रात ते म्हणतात, 'हे बृहस्पते, आपण सर्वगणांचे गणपती म्हणजे गणांचे प्रमुख
आहात, सर्व कवींमध्ये श्रेष्ठ आहात.' बृहस्पती वाणीचे अधिदैवत आहे. म्हणजे बृहस्पती एका अर्थाने गणपतीच आहेत. ॐकार शब्द ब्रह्मवाचक आहे. ब्रह्मणस्पती म्हणजे वाङ्मयाची किंवा साहित्याची देवता, असे उपनिषदकारांचे म्हणणे आहे. कदाचित म्हणूनच गणपतीची मूर्ती ही ॐकाराच्या आकाराची घडविली असावी, असे वाटते.

श्रीगणेशपुराण आणि श्रीमद् मुद्गलपुराण यांत उल्लेखित असा हा चिंतामणी आहे. महर्षि गौतम ऋषींनी इंद्रदेवास शापमुक्त होण्यासाठी विदर्भातील कदंबक्षेत्री जाऊन श्री गणेशाची तपश्‍चर्या करण्यास सांगितलेले ते हेच कळंब स्थान आहे, इंद्राच्या घोर तपश्‍चर्येने प्रकट झालेले श्री गणेश येथेच आहे. इंद्रास शापमुक्त करणारा चिंतामणी गणेश भक्तांना चिंतामुक्त करणारा आहे. देवराज इंद्राने श्री गणेश पूजनास्तव पृथ्वीजल न वापरता प्रत्यक्ष स्वर्गातून श्री गंगेला आवाहन करून त्या पाण्याने श्री पूजन केले आणि प्रत्येक १२ वर्षांनी श्री गंगेस श्रीचरण धुत रहाण्यास सांगितले. त्यानुसार प्रत्येक १२ वर्षांनी येथील कुंडातील पाण्याची पातळी वाढते आणि श्री चिंतामणीचा पदस्पर्श झाला, की पाण्याची पातळी आपोआप कमी होऊ लागते.

कळंब येथील चिंतामणीच्या गाभाऱ्यात इ.स. २००७ साली गंगा आली होती व त्याने गाभारा पूर्ण भरला होता. या कळंबचे स्थान आज तालुक्याचे असते तरी पूर्वी ते खेडे होते आज गावात प्रचंड आर्थिक उलाढाल वाढली आहे व गावाच्या केंद्रस्थानी श्री कळंबराज चिंतामणी आले आहे. मुळात हे मंदिर म्हणजे एका पाताळ गुंफेतील स्थान आहे, असे सुप्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ डॉ. पु. नि. फडके म्हणतात. म्हणजेच त्यांच्या सिद्धांतानुसार या महापाषाणयुगीन गुंफेत श्रीची स्थापना झाली. मुळात मंदिराचे स्थापत्य पाताळस्थापत्य शैलीचे ठरते. एखाद्या विहिरीत आपण उतरतो की काय असा भास होतो. व याच भूगर्भात चिंतामणीचे गर्भगृह आहे. 

कळंबच्या गणपती स्थानापर्यंत जाण्यास म्हणजेच खाली उतरण्यास मजबूत पायऱ्याचे जिने आहेत. एका बाजूने जायचे व दर्शनार्थीनी दर्शन झाले की दुसऱ्या जिन्याने वर यायचे अशी ती रचना आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे तळामध्ये एक अष्टकोनी कुंड असून त्यास गणेशकुंड म्हणतात व या कुंडाच्या उभय बाजूंना दोन व्हरांडे असून तळात २५-३० भक्त एकावेळेस सहज मावू शकतात. येथील गणेश प्रतिमा चतुर्भुजांकित असून ती मध्यभागी असलेल्या गर्भगृहात विराजमान आहे. प्रतिमा शेंदूरलिपीत असल्याने आपण तिला केवळ बाह्यरेषांनी बघू शकतो . 

चिंतामणी गणेशाचा मुकूट मात्र मूर्तीलाच असावा. सोंड मात्र वामहस्ताजवळ असून २ ते ३ फूट उंच आहे. विशाल भालप्रदेश, बारीक पण अत्यंत तेजस्वी नेत्रद्वय, शूर्पकर्ण, लंबोदर, उदर बंधांकित, डावा पाय दुमडून यक्षराज वामसुर वासनात आहेत. विशेष पूजा अर्चेच्या दिवशी चिंतामणींना अलंकार घालण्याची प्रथा आहे. प्रतिमा अत्यंत मनोहर आणि रेखीव आहे. 

देवालयाचा जीर्णोद्धार यादव कालखंडात झाला असून प्रतिमेच्या उभय बाजूस शिवलिंग आहे. येथील एका खोदकामात एक सर्वतोभ्रद गणेश प्रतिमांही आढळली असून ती अगदी पायऱ्यांच्या आधीच्या भव्य सभामंडपात प्रतिष्ठित आहे. सर्वतोभद्र म्हणजे स्तंभाच्या चारही बाजूंना गणपतींचे अंकन असते तसे ते येथे आहे. आज मंदिरात प्रशस्त धर्मशाळा असून चांगल्या सोयी झाल्या आहेत व अक्षरशः रोज हजारो भक्त व विशेष गणेशोपासक या मंदिरात भेट देतात. कळंबच्या श्री चिंतामणी दर्शनाने मन तृप्त आणि शांत होते. तर अशा या विदर्भ अष्टविनायकातील कळंबच्या चिंतामणी मंदिरास एकदा नक्की भेट द्यायला हवी. कै. गजाननशास्त्री पुंड रचित आरतीत म्हणतात, 

जय भगवान चिंतामणी देवा वरदेशा । 
पंचारती करितो तुज कदंबक्षेत्रेशा ।।  

सर्वेश फडणवीस 

No comments:

Post a Comment