Monday, July 4, 2022

स्नेहवन ज्ञानग्रामाचे उद्गाते - अर्चना व अशोक देशमाने


मला कायम वाटतं भारत हा वैविध्यपूर्ण आहे. इथं पावला पावलावर आपल्याला अफलातून आणि अजब माणसं मिळतात. कधी त्यांच्या कार्यातून तर कधी त्यांच्या उपकारातून ही माणसं लाखमोलाचा संदेश देऊन जातात. यांच्या सहवासातून पण जी उर्जा मिळते त्याला तोडच नाही. कालचा अनुभवही खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा होता. आळंदी पुणे येथील स्नेहवनाच्या माध्यमातून ५० मुलांचे पालकत्व स्वीकारणारे अशोक देशमाने यांची भेट झाली. नागपूरला समरसता संमेलना निमित्ताने ते आले होते. येण्याच्या आधी कळवल्याने निवांत भेट झाली. अशोक देशमाने आणि अर्चना देशमाने हे दाम्पत्य आज ५० मुलांचे पालक आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, यांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाचे अद्भुत काम हे दोघे करतात. नुकतीच तिशी ओलांडणारे हे दोघेजणही खूप चांगले कार्य आळंदी येथे स्नेहवनाच्या माध्यमातून करतात आहे. 

अशोक देशमाने दादा कवी मनाचे आणि संवेदनशील माणूस आहेत. वारकरी संप्रदायाचे पाईक. घरात वारीची परंपरा आहे. मूळ मराठवाड्यातील असलेले अशोक दादा २०१२ साली सॉफ्टवेअर क्षेत्रांत कार्य करण्यासाठी पुण्यात आले. परंतु या कामात त्यांचे मन रमले नाही आणि चाकोरीबद्ध आयुष्य न जगता काहीतरी वेगळं करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. स्वामी विवेकानंद, बाबा आमटे, प्रकाश आमटे यांच्या कार्यातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि स्नेहवन चे काम २०१७ साली पूर्णपणे सुरू झाले. 

२०१२-२०१७ मध्ये आपल्या पगारातील दहा टक्के रक्कम वंचित मुलांच्या शिक्षणासाठी ते देतच होतें आणि प्रसंगी शनिवार -रविवार वंचित, फुटपाथवर असणाऱ्या मुलांना शिकवायला देखील जात होते. पण विदर्भ, मराठवाड्यातील नैराश्यग्रस्त शेतकरी आत्महत्या करत असतांना त्यांच्या मुलांचे भविष्य कसे असेल या जाणीवेने ते अस्वस्थ होते आणि त्यातूनच स्नेहवनाची सुरुवात झाली. त्यांच्याशी बोलतांना त्यांनी काही छायाचित्र दाखवली आणि ती भीषण परिस्थिती बघून वाईट वाटले. आपण सुखासीन आयुष्य जगत असतांना आपल्या गावातील, प्रसंगी राज्यातील आपल्या भावावर दोन वेळ खाण्याची आबाळ असतांना शिक्षण तर दूरच आधी त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढून त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करायचे या उद्देशाने स्नेहवनाची सुरुवात झाली. खरंतर या दाम्पत्याचा लग्न करून गुण्यागोविंदाने संसार करण्याचा हा काळ पण 'आयुष्यभर कोणतीही तक्रार करायची नाही' या अटीवर अशोक दादा व अर्चना वहिनी दोघे विवाहबद्ध झाले. लग्न झाल्यावर अर्चना देशमाने यांनी २० मुलांच्या संसाराला आकार दिला. दहा बाय दहाच्या दोन खोलीत 'स्नेहवन' चालायचे, या दाम्पत्याचा हा संघर्ष डॉ. रवींद्र कुलकर्णी व त्यांची पत्नी अनुभवत होते. आणि त्यातूनच त्यांनी 'स्नेहवन'ला दोन एकर जमीन दिली. आळंदीजवळील कोयाळी फाटा येथील या जागेवर ही संस्था आता उभी आहे, खरंतर आज कुठल्याही शासकीय मदतीशिवाय या संस्थेत ५० मुलं एकत्र निवासी आहेत.

स्नेहवनात मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अन्य भागांतील ५० निवासी मुले तसेच १३० वंचित घटकातील कचरा गोळा करणारी, भीक मागणारी दुसरी ते बारावीपर्यंतची मुले आहेत. स्वतःच्या ३ वर्षाच्या आनंदी या मुलीसह या १८० लेकरांचे हे तरुण दाम्पत्य मायबाप आहे. ही मुले बाहेरील शाळेत शिक्षण घेतात. संपूर्ण खर्च व जबाबदारी स्नेहवन उचलते आहे. आपल्यासारख्या दातृत्वाची भावना असलेली चांगली माणसं आज स्नेहवन बरोबर आहेत. १० ते ५ शाळा झाली की या वेळेनंतर 'स्नेहवन' म्हणजे जीवनशिक्षणाची कार्यशाळा, पुस्तकी ज्ञानाशिवाय कृतियुक्त शिक्षणावर अधिक भर देणारी आहे. येथे दहा गायींची गोशाळा आहे. त्याच्या व्यवस्थापनासह तीन हजार लीटर बायोगॅसची निर्मिती रोज होते. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी इथे १२ हजार पुस्तकांचे वाचनालय आहे. वाचलेल्या पुस्तकांवर मुले स्वतंत्र चर्चा करतात. मुलांनी झाड-वेलीसारखे फुलावे, बहरावे तसेच मुलांनी मुलांसाठी काम करावे ही व्यवस्था देशमाने दाम्पत्याने प्रेमाने निर्माण केली आहे. 

कोरोना काळात परिस्थिती बिकट होती पण ज्ञानेश्वर माउलीच्या कृपेने सगळं निभावले. प्रत्यक्षात अजून स्नेहवनात गेलो नाही पण जे ऐकलं त्यातून आता पुण्याला गेलो की सगळ्यात पहिले स्नेहवन ला भेट देण्याची मनस्वी इच्छा आहे. पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातील मित्र यादीतील मित्रांना आग्रहाची विनंती आहे आपण आळंदी ला माउलींच्या दर्शनार्थ गेलात तर स्नेहवन ला आवर्जून भेट द्या. अशोक दादांच्या कार्याला सोबत करू शकलात तर त्यांना आनंद होईल. ही जगा वेगळी माणसं झुक्या दादामुळे या माध्यमातून प्रत्यक्षात अनुभवता आली त्याबद्दल त्याचे विशेष आभार आहे. स्नेहवनला आवर्जून भेट द्या. 

Snehwan- A Ray of Hope

संपर्क - अशोक देशमाने - स्नेहवन संस्था - आळंदी, पुणे
           8796400484 / 8237277615

✍️ सर्वेश फडणवीस

P.C - Shama Deshpande

No comments:

Post a Comment