Monday, December 14, 2020

बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ॥


आज कार्तिकी वद्य त्रयोदशी, सकल संतश्रेष्ठ माउली ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची परममंगल अशी तिथी. त्यानिमित्ताने

पंढरीची कार्तिकी एकादशी आटोपून आळंदीस येऊ लागण्यापूर्वीच श्री ज्ञानदेवांनी संजीवन समाधीचा निश्चय केला होता, हे श्री नामदेवांच्या ‘कलियुगी जन आत्याती करिती। साहवेना की यासी कांही केल्या॥’ या कथनात स्पष्टपणे उमटले आहे. पुढे यात्रेनंतर काळाची चाहूल लागून माउलींचा जीव गलबलला व त्यांनी श्री विठ्ठलापाशी समाधीची आळ म्हणजे हट्ट धरला. त्यांनी ती पुरविण्याचे मान्य केले. हे मूर्तिमंत लडिवाळ कैवल्य सम्राट चक्रवर्ती सर्वांस अंतरणार हा विचार सहन न होऊन रुक्मिणीच्या अश्रूंचा बांध फुटला. पांडुरंगांनी तिला समजावीत म्हटले, “रुक्मिणी, या ज्ञानोबासारखा भक्त, योगिश्रेष्ठ, परोपकारी अखिल ब्रह्मांड फिरलो तरी सापडणार नाही. भारतवर्षात नारद, सनतकुमार, अंबरीश, पराशर, भगीरथ, व्यासादी भक्त होऊन गेले. मात्र, अवघ्या जनसागराला आत्मोद्धाराचा मार्ग त्रैलोक्याची ज्ञानसंजीवनी असलेल्या ज्ञानोबाने दाखविला. या महात्म्याचा केवळ स्पर्श अथवा नुसते दर्शन अथवा नामस्मरण जन्ममृत्यूही टाळते, याच्या चरणांचे वंदन मलाही पावन करते, जो सकल तीर्थांना तीर्थरूप आहे, अशा या भक्तश्रेष्ठाच्या नामाचा प्रेमपूर्वक उच्चार सकल पापे भस्म करणारा आहे, हे निश्चित आहे असे तू जाण! देवी, या विभूतीमत्त्वाला समाधिस्थ करण्याचे धैर्य खरे तर मजपाशीही नाही. परंतु, याला काही उपायसुद्धा नाही.”
 
प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने आपल्या आत्मवत अशा भक्तश्रेष्ठाला स्वहस्ते दिलेल्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रेममय श्रीमंतीचे वर्णन संत नामदेव, संत निळोबाराय, संत एकनाथ यांनी यथायोग्य आणि विस्ताराने करून ठेवले आहे. ‘अमृतानुभव’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘चांगदेव पासष्टी’, ‘अभंग’, ‘हरिपाठ’ अशा ग्रंथनिर्मितीने कैवल्यरसात चिंब न्हाऊन निघणार्‍या अमृताला जिंकण्याचे सामर्थ्य ठेवून असलेल्या माउलींच्या रसाळ वाणीवर आतापर्यंत महाराष्ट्रीय आध्यात्मिक गाथा वर्धिष्णू होते आहे. या ग्रंथांच्या अभ्यासाने कित्येक लोक कृतार्थ झाले आहेत, दुर्जन सन्मार्गाला लागले आहेत, कित्येकांचा उद्धार झाला आहे.
 
एकविसाव्या वर्षी आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांना त्यांनी समाधीची अनुमती मागितली होती. कार्तिकी वारीनंतर पंढरीपासून ते अर्धबाह्य स्थितीत राहू लागले होते. आळंदी हे अनेक सिद्धांनी समाधी घेतलेले स्थळ. म्हणून त्याचे नाव ‘सिद्धबेट.’
 
इंद्रायणी, मणिकर्णिका, भागीरथी इ. नद्यांनी बनलेले हे बेट होते. श्री नाथ म्हणतात, ‘चौर्‍यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा’ म्हणजे नाथपरंपरेच्या स्थळीच जीवंत समाधीचा निर्धार श्रीज्ञानदेवांनी केला. संतमंडळी या त्यांच्या निर्धाराने ओसंडून जावे इतका शोक करू लागली. पण, ‘ज्ञानेश्वरापाशी आनंदी आनंद’ असे होते. श्री विठ्ठलाने भावंडांना एकीकडे नेऊन व गुह्यार्थ सांगून सांत्वन केले. समाधीची सर्व सामग्री तयार झाल्यावर श्रीज्ञानदेवांनी सिद्धेश्वराचे स्थळ परमेश्वरास मागितले.
 
 क्षेत्र प्रदक्षिणा होऊन एकादशीस हरिजागरण झाले व द्वादशीस पारणे झाले. द्वादशीच्या रात्री कान्होपात्रा यांचे कीर्तन झाले. विश्वकर्म्याने अतिशय सुंदर कलाकुसर केलेला मंडप तेथे उभारला. समाधीच्या समोर अजानवृक्षाचा दंड स्थापन करण्यात आला. (सन्मुखपुढे अजानवृक्ष-श्रीनाथ) या कोरड्या काष्ठाला पालवी फुटल्यावर श्रीज्ञानदेवांनी सर्वांच्या पायी नमस्कार केला. अखेर त्रयोदशीचा दिवस उजाडला. सर्वांनी इंद्रायणीत स्नान करून ज्ञानेश्वरांची आदरपूर्वक पूजा केली. यानंतर प्रेमाने ज्ञानेश्वरांना सिंहासनावर बसवून विठ्ठल आणि रुक्मिणीने त्यांची षोड्शोपचारे पूजा केली, कपाळावर गंध लावला, गळ्यात दिव्य सुगंधी माळा घातल्या. विठ्ठल ज्ञानेश्वरांकडे वळले, त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या मस्तकावर अश्रूंचा अभिषेक केला. शंकर प्रभृती देव, कश्यप आदी ऋषींनी ज्ञानेश्वरांना आलिंगन दिले. याज्ञवल्क्य मुनी, आदिगुरू अवधूत दत्तात्रेयांसह मत्स्येंद्रादी नाथ परंपरा इ. सर्व ब्रह्मनिष्ठ; समाधीचे वृत्त ऐकताच त्वरेने आळंदीस आले. ज्ञानेश्वरांनी सर्वांना आदरपूर्वक नमस्कार केला, सर्वांचे पूजन केले. सर्व सोहळे पार पडल्यानंतर माउली सावकाश उभे राहिले आणि सभोवार उभ्या असलेल्या भक्तांच्या अश्रूंचे बांध फुटले. सारा आसमंत हुंदक्यांनी भरून गेला.
 
 सर्वांना वंदन करून माउली अखेरची निरवानिरव करू लागले, “माझ्याकडून आजवर कुणास काही अधिक उत्तर गेले असेल तर मला क्षमा करा, कधी मर्यादा ओलांडली असेल, तर संतमहात्म्यांनी मला करुणापूर्वक पदरात घ्यावे, आपण माझे मायबाप आहात. मी, तुमचे अजाण लेकरू आहे, माझ्यावर कृपा असू द्यावी.”
 
ज्ञानोबाच्या या निर्वाणीच्या बोलांनी सर्वांच्या हृदयाचा ठाव घेतला. दु:ख सहन न होऊन कित्येक लोक मूर्च्छित होऊन धरणीवर पडले. मोठ्यामोठ्याने आक्रोश करून भक्त ऊर बडवू लागले. निवृत्तीनाथादी भावंडांनी हंबरडा फोडला. त्यांचे निष्पाप प्रेम पाहून उपस्थितांचे काळीज हेलावले. गळ्याशी आलेला आवंढा गिळत लोक उसासे सोडू लागले. माउलींनी समाधीस्थळाला प्रदक्षिणा घातली आणि श्री विठ्ठलाने व श्री निवृत्तीनाथांनी त्यांचे हात धरल्यावर समाधीस बसण्यास आत प्रवेश केला, दाही दिशा धुंद झाल्या, गगन कालवले गेले.
 
 श्री नामदेवांनी गळ्यात हार घातलेले श्री ज्ञानदेव तुळसी, बेल, दुर्वा, दर्भ, फुले इ. अंथरलेल्या धुवट वस्त्राच्या घडीवर बसले. श्री ज्ञानदेवी पुढे ठेवली होती. “मला तुम्ही सुखी केले, आता पादपद्मी मला निरंतर ठेवा” अशी श्री विठ्ठलास प्रार्थना करून तीन वेळा नमस्कार केला आणि भीममुद्रेने डोळे झाकले. श्री नामदेव स्फुदत म्हणतात, ‘नामा म्हणे आता लोपला दिनकर। बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ॥’ श्री तुकारामांनी संतशिरोमणींबद्दल गौरव केलाच आहे की, ते ‘अभंग प्रसंगी धैर्यवंत.’ श्री ज्ञानदेव मात्र ध्येयधुंदीने अविचल व निर्मोह होते. संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय असले उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. श्री निवृत्तीनाथांनी पहिल्या पायरीवर उभे असलेल्या श्री विठ्ठलाला भुयारातून बाहेर आणले आणि शिळा लावून ते बंद केले. आकाशीच्या देवांनी अपार पुष्पवर्षाव सुरू केला. आसमंत दिव्य सुगंधाने घनदाट भरून गेला. दुदुंभीचा नाद करून, देव उच्चरवाने ‘ज्ञानदेव जयति’ असा जयघोष करू लागले. हा अनुपम्य सोहळा पाहण्यासाठी आकाशात विमानांची दाटी झाली. सर्वत्र हाहा:कार, सर्वांनी फुले वाहिली. पुढे इंद्रायणीत सर्वांनी आचमन केले व पाच वाटांनी संत बाहेर निघाले. श्री ज्ञानदेव अजूनही तिथेच आहेत, संजीवन समाधीत आहेत! प्रत्येक भक्ताला ते जवळ घेण्यासाठी, आलिंगन देण्यासाठी ते तिथेच विराजमान आहेत. संत मुक्ताई यांच्या ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेतच. त्या म्हणतात,
 
 योगी पावन मनाचा।
साही अपराध जनाचा॥
विश्व रागें झाले वन्ही।
संती सुखें व्हावें पाणी॥
शब्द शस्त्रें झालें क्लेश।
संती मानावा उपदेश॥
विश्वपट ब्रह्म दोरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥
 
 खरंतर या पावन मनाच्या योग्याचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी इंद्रायणीच्या तीरावरील आळंदी येथे जायला हवेच. आयुष्य कृतकृत्य झाल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीच.
 
- सर्वेश फडणवीस

महा MTB #मुंबई_तरुणभारत

No comments:

Post a Comment