Tuesday, April 5, 2022

नात्यातील गोडवा जपणारे चितळे बंधू मिठाईवाले


आज चितळे बंधू या नावातच प्रत्येक मराठी माणसाला आपलेपण आणि अभिमान वाटतो. चितळे यांच्या कुठल्याही दुकानात गेल्यावर बाकरवडी आणि आंबा वडी घेवून बाहेर पडणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर कृतार्थ भाव सहज बघायला मिळतात. पण हा इथवरचा प्रवास म्हणावा तसा सोपा नाही. या कुटुंबाने चार पिढ्यांचा वारसा जपलेला आहे. प्रत्येक पिढीने आपले पूर्ण समर्पण भावनेने कार्य करत आज चितळे बंधू या ब्रँडने जी उंची गाठली आणि सतत नवनवीन प्रयोग करत हा उद्योग यशोशिखरावर नेताना त्यांनी आपल्या प्रत्येक सहकाऱ्यांबरोबर जी सहजता आणि जे विश्वासाचे नाते निर्माण केलें आहे ते फॅक्टरी मध्ये गेल्यावर पदोपदी जाणवतं.

मधल्या काळात पुण्यात आपल्यापैकी कुणीही आणि कधीही गेले तरी बाकरवडी आणि आंबा वडी घेऊनच या असा आग्रह आपण करायचो. या दोन्ही पदार्थांबद्दल प्रत्येकाच्या मनात कायमच कुतूहल होते. हे कसे तयार होतात ? आज इतकी मोठी मागणी असून सुद्धा कुठेही याच्या चवीत फरक पडलेला नाही आणि संपली असे कुठेही ऐकीवात नाही. मध्यंतरी पुणे मुक्कामी असतांना चितळे बंधू पार्टनर इंद्रनील चितळे यांना हक्काने फॅक्टरी बघण्याचा आग्रह धरला. त्यांनी ही विनंती मान्य केली आणि पुण्यातील खेड-शिवापूर येथील रांझेगाव येथे पोहोचलो. खरंतर फॅक्टरी बघण्याचा हा पहिलाच अनुभव होता पण ज्या पद्धतीने आणि शिस्तीत इथे काम चालते ते बघून आपण थक्क होतो आणि अडीच-तीन तास संपूर्ण फॅक्टरी बघून आपल्याला अभिमान वाटतो आणि मनात आपलेपणाची भावना निर्माण होते. मराठी उद्योजकाची ही भरारी आणि आजवरचा प्रवास बघतांना आपण थक्क होतो. एका रात्रीत हे वैभव उभे झाले नाही. प्रत्येक पिढीने त्याग, परिश्रम, जिद्द, चिकाटीने हा व्यवसाय केला आहे आणि येणारी चौथी पिढीही त्याच जिद्दीने करते आहे.

या फॅक्टरीत दररोज जवळपास २० तास काम चालते. सकाळी पावणे पाचला येथील दिवस सुरू होतो आणि सणासुदीच्या काळात २४ तास काम चालू असतं. दुकान उघडताच अवघ्या ३-४ तासांमध्ये दुकानातील बाकरवडीचा संपूर्ण माल संपून जातो, म्हणजे या बाकरवडीचे लोक किती चाहते आहेत याची कल्पना येईल. पण बाकरवडी संपली या बद्दल बडेजाव न बाळगता का संपली याबद्दल विचार होऊ लागला, मागणी वाढली आणि तिचा पुरवठा आपण करू शकत नाही तर हे आपले अपयश आहे असा विचार आताच्या पिढीने केला आणि मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आज बाकरवडी संपली हे कुठेही ऐकू येत नाही. ग्राहकांना संतुष्ट करणे हाच ध्यास घेऊन बाकरवडीचे उत्पादन वाढत गेले. पण बाकरवडीच्या तिखट आणि आंबट – गोड चवीची जादू ही महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता आता सातासमुद्रापार गेली आहे .

खरंतर या सगळ्याची सुरुवात श्री भास्कर गणेश चितळे यांनी  १९३९ साली सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे 'चितळे डेअरी'  नावाने केली. त्यांनी असाच उपक्रम आधी सुरू केला होता पण दुर्दुवाने त्यात त्यांना अपयश आले. अपयशामुळे खचून न जाता त्यांनी पुन्हा नवा व्यवसाय सुरु केला. पुढे या व्यवसायात अतिशय उत्तम प्रतिसादामुळे श्री रघुनाथ भास्करराव चितळे यांनी व्यवसाय विस्तारण्याचे काम हाती घेऊन, मुंबईतही अनेक वर्षे दुधाचा पुरवठा केला आणि कालांतराने ते पुण्यात स्थायिक झाले. १९५० साली श्री रघुनाथराव चितळे (भाऊ साहेब) व श्री नरसिंहराव चितळे (राजाभाऊ) या दोन बंधूंनी पुण्यात 'चितळे बंधू मिठाईवाले' ची पहिली शाखा सुरु केली. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ पासून सुरू झालेला हा प्रवास श्रीखंड, चिवडा, फरसाण, शेव, अशा चटपटीत पदार्थांचे उत्पादनापर्यंत वाढतच गेला. या व्यवसायात यश मिळत गेले आणि त्यांनी १९५० सालच्या मध्यात पुण्यात डेक्कन जिमखाना येथे भाड्याने जागा विकत घेतली आणि पहिले दुकान सुरू झाले.

दुधाच्या व्यवसायात वृद्धी होत असतांना नरसिंहराव चितळे यांना
कारखान्यात एका गुजराती आचारीने बाकरवडी दाखवली होती, त्यात त्यांनी बदल करून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. दुकानात विक्रीसाठी उपलब्ध असलेली बाकरवडी पुण्यातील खवय्यांना इतकी भावली की आज ती जगभ्रमंती करते आहे आणि याच बाकरवडी ने चितळे बंधूंना जगभर पोहोचवले आणि मराठी उद्योजकांच्या यादीतील मानाचे पान त्यांच्या नावावर झाले आहे.

पुढे १९७० च्या दशकात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे नरसिंहरावांना जपान दौऱ्यावर पाठवण्यात आले होते. तिथल्या उद्योगांचे झालेले यांत्रिकीकरण पाहून ते थक्कच झाले. जितक्या वेगानं तिथे कामे होत होती, ते पाहून त्यांना नवी प्रेरणा मिळाली आणि त्याच प्रेरणेतून १९८९ साली काही संशोधनाने जर्मनी आणि युरोपमधून खास बाकरवडी बनवण्यासाठी मशीन डिजाईन करून घेऊन त्या मशीन्स भारतात आणल्या. यामुळे आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे अर्धे काम सोपें झाले आहे. ९० च्या दशकात बाकरवडी चे उत्पादन व खप हे दिवसाला ३०० किलो इतके होते. वाढत्या मागणीमुळे त्याकाळात रघुनाथरावांनी मुंबईच्या प्रभादेवी बरोबर, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात येथे हि चितळे बंधूंच्या शाखा सुरु केल्या. त्याकाळी शाखा असणं ही जरा निराळी आणि नवीन गोष्ट होती. पण चितळेंनी त्यात यश मिळवून दाखवले. आज हा आकडा भरपूर वाढलेला दिसून येतो,

आज बाकरवडी चे एका तासाला ११०० किलो उत्पादन होते त्यातील ८० % पाकिटबंद विकले जाते, २०% पुण्यातील स्टोअरमध्ये विक्रीस उपलब्ध केले जाते आणि विशेष म्हणजे इतके उत्पादन करूनही बाकरवडी शिल्लक राहत नाही. चितळे एक्सप्रेस नावाने नवी दालने उभी झाली आहेत तेथेही चितळे यांचा सगळा माल उपलब्ध होतो आहे. एक्सप्रेस मध्ये पण बाकरवडी आणि अन्य पदार्थ वेळेत पोहोचवणे, त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी विविध संशोधन सुरू झाले आणि बऱ्याच संशोधनात यश हाती आले आहे. आज पॅकिंग सुद्धा मशीन ने होत असल्यामुळे बाकरवडीची शेल्फ लाईफ ही वाढली आहे,  ज्यामुळे विदेशातून होणारी बाकरवडीची मागणी सुद्धा वेळेत पूर्ण करण्यात चितळे बंधू मिठाईवाले यांना मोठं यश आले आहे.

आज फक्त पुण्यातील २४ मोठ्या स्टोअर्सद्वारे किरकोळ विक्री सुरू आहे. चितळे एक्सप्रेस नावाने उघडले जाणारे आउटलेट महाराष्ट्र आणि गोव्यात ४० हुन अधिक आहेत. संपूर्ण भारतात १० हुन अधिक राज्यातील २ लाखांहून अधिक किरकोळ विक्रेते चितळे यांची उत्पादने विकत आहेत आणि सर्व खंडांमध्ये निर्यात होते आहे. चितळेंच्या सगळ्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय उत्पादनांपैकी, म्हणजे आंबा बर्फी, पेढे, श्रीखंड,  बाकरवडी सगळ्यात जास्त विकली जाते आणि त्याची शेल्फ लाईफ वाढल्याने मागणी आणि पुरवठा दोन्ही वाढला आहे. प्रक्रियेतील  जागतिक विस्तारामुळे, नवीन उत्पादन युनिटची आवश्यकता होती आणि तेच लक्षात घेऊन सध्याच्या रांझेगाव फॅक्टरीला लागूनच असलेल्या नवीन जागेत उत्पादन सुरु होणार आहे.

चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी आज जगन्मान्य ओळख बनली असली तरी 'बाकरवडी म्हणजे चितळे' हे समीकरण जगाच्या पाठीवर कुठेही मराठी माणूस असेल त्याच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कारण बाकरवडी वर मूळ हक्क जरी गुजरातचा असला तरी तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकमान्यता मिळवण्यासाठी चितळे यांनी घेतलेले कष्ट जगजाहीर आहे. विश्वसनीयता, उच्च गुणवत्ता आणि सचोटीपूर्ण पारदर्शी व्यवहार यातूनच त्यांनी आपले नाव कमावलेले आहे. चार पिढ्यांनी आपल्या चिकाटीने व बदलत्या काळाशी मैत्री करून त्या प्रमाणे स्वतःत अजून सुधारणा व बदल करून एवढे मोठे साम्राज्य उभे करून दाखवले आहे आणि याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हा कौटुंबिक व्यवसाय आहे. कुठल्याही उद्योजकाने चितळे बंधू उद्योगाकडून शिकण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मालाची गुणवत्ता आणि व्यवहारातील सचोटी या दोन्ही बाबत ते सतत दक्ष आहेत म्हणून त्यांचा आज नावलैकिक टिकून आहे आणि नात्यातील गोडवा जपण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत.

✍️ सर्वेश फडणवीस 

#ChitaleBandhuMithaiwale

No comments:

Post a Comment