Saturday, October 14, 2023

⚜️ विज्ञानवादिनी - रितू करिधाल श्रीवास्तव !


रितू करिधाल श्रीवास्तव हे नाव खरंतर मिशन चंद्रयानमुळे संपूर्ण देशाला परिचित झाले. आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने इसरोसोबतच देशाचे नाव उंचावणाऱ्या रॉकेट वूमन म्हणून ओळख असलेल्या आजच्या पहिल्या विज्ञानवादिनी आहेत वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव. 

पत्नी, आई, सून, बहीण, मैत्रीण या प्रत्येक नात्याला योग्य न्याय देणाऱ्या वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव या दुसऱ्या मिशन चांद्रयानामुळे घराघरात पोहोचल्या. कर्तव्यनिष्ठ, यशस्वी आणि प्रतिभासंपन्न वैज्ञानिक म्हणून जबाबदारी पार पाडणे निश्चितच सोपे नाही. त्यासाठी नियोजनपूर्वक कार्यप्रणाली आखणे अन् पूर्णतः झोकून देऊन काम पूर्ण करणाऱ्या वैज्ञानिक म्हणून रितू करिधाल श्रीवास्तव यांची ओळख आज यथार्थ ठरेल. 

इसरोमधील एक महिला वैज्ञानिक म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने भारताचे नाव उंचावले आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या रितू करिधाल श्रीवास्तव यांनी प्रथमतः स्वतःला सिद्ध केले. सर्वसामान्य घरातून आलेल्या रितू करिधाल श्रीवास्तव यांनी आपल्या बुद्धिमान कौशल्याने आणि जिद्दीने भौतिकशास्त्र विषयांत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे आचार्य पदवीसाठी लखनऊ येथे त्यांनी संशोधन सुरू केले. त्यांनतर गेट परीक्षा उत्तीर्ण करून इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर इथे एअरोस्पेस इंजिनिअरींगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि हाच त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला. 

अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी इसरोतील नोकरीसाठी प्रयत्न केला आणि त्यांची निवडही झाली आणि निकालानंतर रितू करिधाल श्रीवास्तव इसरोमध्ये रुजू झाल्या. बालपणापासून बघितलेल्या स्वप्नांना आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि एका नव्या स्वप्नाचा आणि ध्येयाचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला ज्येष्ठ वैज्ञानिकांसोबत काम करताना त्यातील आव्हानांना पेलण्याची क्षमता त्यांनी प्राप्त केली. वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांचे आज २० हुन अधिक संशोधन निबंध प्रसिद्ध झाले असून त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते यंग सायंटिस्ट अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजीज अँड इंडस कडून इसरो टीम अवॉर्ड फॉर मॉम, एएसआयटीकडून वुमन अचिव्हर्स इन एअरोस्पेस अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. 

चांद्रयान- २ मिशन डायरेक्टर आणि मंगलयान मोहिमेच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली आहे.  'मिशन मंगल' या गाजलेल्या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हिने साकारलेली भूमिका रितू करिधाल श्रीवास्तव यांच्या व्यक्तिमत्त्वावरूनच प्रेरित झाली आहे. आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा चांद्रयान ३ मिशनचे नेतृत्त्व वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांच्याकडेच आहे. आपल्या कुटुंबाचे सहकार्य आणि त्यातून मिळालेल्या समाधानातूनच आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून दृढतेने काम करण्याची इच्छाशक्ती आणि जबाबदारी रितू करिधाल श्रीवास्तव सहजतेने सांभाळत आहेत. आदित्य आणि अनिशा या दोन मुलांना मोठं करणे, त्यांचा शाळेचा अभ्यास घेणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालणे अशी कौटुंबिक सगळी जबाबदारी त्या आनंदाने पार पाडत असतात. 

१९९७ पासून वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव इसरोत कार्यरत असून अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केले आहे. आपले पती अविनाश श्रीवास्तव आणि मुलांसोबत घालविलेले क्षण कामाची ऊर्जा देतात, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. महिला सक्षमीकरणाच्या समर्थक असणाऱ्या वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांनी महिलांनी अंतरीक्ष क्षेत्रात यावे यासाठी आग्रही आहेत आणि त्यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यास त्या नेहमीच इच्छुक असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज रॉकेट वूमन म्हणून ज्यांनी आपली ओळख सार्थ ठरवली आहे अशा आजच्या विज्ञानवादिनी वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांचे जीवन प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत. 

सर्वेश फडणवीस 

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळपहिली

No comments:

Post a Comment