‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’.....
'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त आपल्या नागपूरातच आहे. लहानपणापासून बडकस चौकात जाऊन मारबत बघतांना कायमच आनंद मिळत असतो. पोळ्याच्या दिवशी मारबत निघते. या काळात रोगराई वाढलेली असते त्यामुळे साधारणत: दरवर्षीच ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’
अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो. मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे. आणि ही आपली मारबत बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातून पण अनेकजण येतात. यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते. काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडल्या जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर समस्या, संकटे येत नाहीत, अशी आख्यायिका आहे. याच संदर्भाने नागपुरातही पिवळी मारबत काढण्यात येते. या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्याने शहरातील कुरीती आणि संकटे संपतात, अशी मान्यता आहे. १८८१ साली नागपूरच्या राजे भोसले घराण्यातील बंकाबाई नावाच्या राणीने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राजे भोसलेंचा पराभव झाला. पुर्वी, बंकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी ( पोळ्याचा दुसरा दिवस) मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.
या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बाकांबाईच्या नवर्यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. लहान मोठे सगळेजण मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. या दिवशी नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात. लहानपणी बाबांचा हात पकडून मीसुद्धा त्यातलाच एक असायचो. बाबा सुद्धा दरवर्षी मारबत बघायला घेऊन जायचे आम्ही मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघायचो आणि सोबत एकप्रकारे जत्रेचीच मजा कारण अनेक फेरीवाले फुगे, खेळणी इ.वस्तु विकायचे.ईंग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकरांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे. आज ह्या शेकडो वर्षांच्या परंपरेला टिकवून आपले नागपूरची ओळख आणि वेगळेपण आजही टिकून आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#मारबत #परंपरा
No comments:
Post a Comment