Monday, August 3, 2020

बखर अयोध्येची !!


बखर अयोध्येची !!

राम मंदिर - भारताच्या इतिहासातील सातवे सोनेरी पान..

काही पुस्तकं अशी असतात की एकदा हातात घेतली की पूर्ण संपवल्याशिवाय बाजूला ठेवताच येत नाही. असंच एक पुस्तक नुकतंच वाचून काढले भारतीय विचार साधना पुणे प्रकाशित डॉ. गिरीश आफळे लिखित " बखर अयोध्येची " !! ह्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतच स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असते तर त्यांनी इतिहासातील सातवे सोनेरी पान असाच उल्लेख केला असता अशी नोंद आहे. 

आज इतिहासात सर्वात दीर्घ दिलेल्या लढ्याचे नाव सांगायचे झाले तर ते आहे रामजन्मभूमी आंदोलन आहे. आज राम जन्मभूमी आंदोलन यशस्वी झाले आहे त्यासाठी हजारो राम भक्तांचे बलिदान सार्थकी लागले. ५०० वर्षाच्या ऐतिहासिक लढ्यानंतर आता ५ ऑगस्टला मंदिराचे भूमिपूजन होऊन बांधकाम सुरू होईल येणाऱ्या काही वर्षात भव्य मंदिर पूर्णही होईल पण त्याचा इतिहास आणि त्या आंदोलनास समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचून संग्रही ठेवले पाहिजे कारण ह्याचा इतिहास येणाऱ्या पिढीला माहीत करून देण्याचे दायित्व आपल्यावर आहे आणि आपणच हा ऐतिहासिक इतिहास जतन करून ठेवलाच पाहिजे कारण आपण खरतरं भाग्यवान आहोत की हे आपल्याला 'याची देही याची डोळा' हे अनुभवता येणार आहे. 

ह्या पुस्तकातील जो घटनाक्रम वाचला तो सर्वश्रुत आहेच ६ डिसेंबर  १९९२ ला ती वादग्रस्त वास्तू पाडून कार सेवकांनी ओट्यावर रामलला विराजमान केले आणि तब्बल २८ वर्षांनी मा.सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देऊन भव्य राम मंदिराचा मार्ग मोकळा केला आहे. या आंदोलन संदर्भातील संपूर्ण माहिती बखर अयोध्येची या पुस्तकात दिली आहे. ह्यातील माहितीचा खजिना शब्दातीत आहे. पुरातत्व खात्याने या ठिकाणी केलेले सर्व फोटो या पुस्तकात आहेत. वैदिक परंपरेपासून सुरू झालेल्या अयोध्येचे वर्णन ह्या पुस्तकात संदर्भासहित मांडले आहे. येणाऱ्या नव्या पिढीला रामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास  समजून घेण्यासाठी सर्वात योग्य व संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. बाबर सेनापती मिर बाकी याने रामजन्म भूमी मंदिर पडले तिथपासून ते ६ डिसेंबर १९९२ व त्यापुढील इतिहास ह्यात मांडलेला आहे.

पुस्तकात पूर्वकाळा पासून श्रीराम जन्मभूमी अयोध्येत एकूण ७९ लढायांचे दाखले दिले आहेत. आणि प्रत्येक वेळेस हिंदूंनी अतिशय कडवा संघर्ष कसा केला आहे याचे वर्णन केले आहे. १ फेब्रुवारी १९८६ रोजी प्रभू श्री रामचंद्रांची बंदिवासातून मुक्तता, राष्ट्रमंदिराचा शिलान्यास, अडवाणींनी संपूर्ण देशांत काढलेली रथयात्रा या प्रकरणांचे वर्णन खूपच मंत्रमुग्ध करणारे आहे. विश्व हिंदू परिषदेने उभारलेले  देशव्यापी आंदोलन, साधू, संत महंत यांचे मोलाचे योगदान यात संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन कसे झाले ? आणि दोन्ही कारसेवा कश्या पार पडल्या यांची अगदी अचूक क्रमशः मांडणी केली आहे. मुस्लिम हवालदाराने सांगितलेला अनुभव, कोठारी बंधूंची निर्दयी हत्या असे एक ना एक प्रसंग वाचताना भावूक होत आज ज्यावेळी भव्य मंदिराचा शिलान्यास होतांना जे भावनिक समाधान होतं ते अतिशय आनंद देणारे आहे. 

आपण सहजतेनं म्हणत होतो भव्य मंदिर निर्माण व्हावे पण ह्या मंदिरासाठी ज्यांचे बलिदान झाले त्यांचे स्मरण करणे हीच आपली प्राथमिकता असायला हवी. कारण हे फक्त मंदिर नाही तर अखिल भारतीय मानवाच्या परवलीचा शब्द आहे राम आणि त्याचे जन्मभूमीवर असलेले मंदीर. ह्याचा रक्तरंजित इतिहास आपण जाणून आहोतच. आजवर अनेक लढाया ह्या परकीयांशी झाल्या पण ही लढाई स्वकीयांशी झाली आणि आज त्याच ठिकाणी आता भव्य राम मंदिर निर्माण होणार आहे. ५ ऑगस्टला तो सुदिन प्रत्येकासाठी सुवर्णक्षण असणार आहे. छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्णनासारखेच काहीसे हे भूमिपूजन ऐतिहासिक असणार आणि ह्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे साक्षीदार आपण होणार आहोत. श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी आजवर झालेल्या आंदोलनाची यशोगाथा येणाऱ्या पिढीला सांगण्यासाठी प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे हे पुस्तक.. " बखर अयोध्येची "


बखर अयोध्येची 

प्रकाशन- भारतीय विचार साधना पुणे 

मूल्य - ₹ २००

✍️ सर्वेश फडणवीस 

No comments:

Post a Comment