ह्या लॉकडाऊन मध्ये शिवाजी सावंत ह्यांचे युगंधर वाचून झाले.
श्रीकृष्ण हे पात्र मुळात खरोखरच अलौकिक आहे. गेली पाच हजार वर्ष हे आम्हा भारतीयांच्या मनाला रुंजी घालत आहे. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसे वाचतांना अधिक माहिती मिळत गेली. आजवर आपल्याला राधा सांगितली गेली ती श्रीकृष्णाची प्रेमिका याच रुपात. परंतु ह्यातील प्रस्तावनेतील सर्वप्रथम आपण राधा या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. हा शब्द मुळातच एक जोड शब्द आहे. रा म्हणजे मिळो आणि धा म्हणजे मोक्ष. अर्थात राधा म्हणजे मोक्षासाठी तळमळणारा जीव. लेखक शिवाजी सावंत आपल्याला या गैरसमजांचे मुळ कारण प्रस्तावनेत सांगतात आणि पुस्तक वाचतांना विचार अधिक व्यापक होतो.
मला वाटतं आज प्रत्येकाने एकदा तरी युगंधर वाचायला हवे. आजचा तरुण म्हंटलं की उत्साह,जिद्द,सामर्थ्य,काम करण्याची प्रचंड क्षमता असलेला, ठरवले ते मिळवण्याची ताकद असलेला अशा अनेक गुणांनी युक्त व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो. इच्छाशक्तीचा चिरंतन स्रोत म्हणजे आजचा युवक आहे. युवाशक्तीचा आविष्कार झाला की अलौकिक ध्येयनिष्ठ व्यक्तित्त्व निर्माण होतात आणि भारत भूमी ही तर अशा नररत्नाची खाण आहे. त्यातच आज जन्माष्टमी म्हणून साजरी करतात असा योगेश्वर,पुरुषोत्तम,युगंधर,पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण याचा जन्मदिवस.
आज याच योगेश्वर कृष्णाच्या जवळ तरुणाईने जायला हवे असे वाटते. आजच्या तरुणांकडे असंख्य शक्ती आहेत. काम करण्याची जिद्द त्याच्याकडे आहे पण ज्या प्रमाणात शक्ती आविष्कृत व्हायला हवी तशी ती दिसत नाही व जाणवत ही नाही. श्रीकृष्ण हा सखा,रक्षक आहेच. त्याच्या प्रत्येक कृतीतून आपण बोध घेऊ शकतो. आता मैत्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण कृष्ण-सुदामा मैत्रीत आपल्याला दिसून येईल. समर्पण भावनेने आणि अपेक्षारहित केलेली मैत्री ही अशीच असेल. श्रीकृष्णाकडे यश, श्री,औदार्य,ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा गुण आढळतात. माउलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीत उल्लेख केलेला आहे.
ज्ञान,वैराग्य,ऐश्वर्य,यश,श्री,औदार्य।
हे साही गुणवर्य वसती जेथ येणे कारणे भगवंत ।।
- संत ज्ञानेश्वर
श्रीकृष्णाला अपयश हे महितीच नाही. श्री म्हणजे माझे सर्व मंगल व्हावे म्हणून श्री हा गुण आहे. त्यांनतरचा गुण म्हणजे औदार्य आज प्रत्येकाकडे असतो पण मर्यादित आहे. ज्ञान म्हणजे जगातील सर्व विषयांचे ज्ञान माझ्याजवळ असावे ही अपेक्षा असावी. इतकं सगळं असताना सुद्धा परिपूर्ण वैराग्य असावे म्हणून वैराग्य गुण. लक्ष्मी असतांना सुद्धा ऐश्वर्य म्हणजे प्रेम अपेक्षित आहे आणि कृष्णाचे प्रेम म्हणजे राधा म्हणजे प्रेम कसं करावं ते म्हणजे सुद्धा राधे सारखं, गोपिकेवर असलेलं पूर्ण समर्पण भावनेनं प्रेम ह्या सर्व गुणांनी युक्त कृष्णाचे चरित्र आहे. त्या ययुगंधर योगेश्वर श्रीकृष्णाचे प्रागट्य याचसाठी झाले आणि गोकुळातला उत्सव नंदोत्सव ह्याबरोबर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला केलेल्या उपदेशाचे स्मरण करण्याची आवश्यकता आज आली आहे ह्यातील एक गुण तरी अंगिकारण्यासाठी असते जन्माष्टमी.
आज आपल्या लोकसंख्येच्या ६५% लोकसंख्या तरुणांची आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. आज तरुणाईने त्या युगंधर कृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. तो प्रत्येक टप्प्यावर आपल्याला भेटत असतो. " सिदंती मम गात्राणि " आणि 'न योत्स्ये' असे म्हणणारा अर्जुन हा देखील तरुण युवा होता. अर्जुन सामर्थ्यशाली योद्धा होता परंतु द्वंद्वात अडकला होता. त्याला त्याचा स्व चा विसर पडला होता आणि अर्जुनाला स्वकीयांशी लढायचे होते म्हणून तो कर्तव्यच्युत झाला होता. आजचा तरुण स्वतःशी लढताना असाच होतो आहे अगदी अर्जुनासारखा आणि अशा संघर्षाच्या,संग्रामाच्या क्षणी जन्म होतो गीतेचा.
जगद्गुरू श्रीकृष्णाने जी गीता कुरुक्षेत्रावर सांगितली ती गीता आज मार्गदर्शक आहे. खरंतर गीता रणभूमीवर जन्माला आली. योद्धा हा नेहमी तरुण असतो. अर्थात वृत्तीने,विचाराने तो तरुण असतोच. अशा तरुणाला " तस्मादुनतिष्ट कौंतेय युध्दाय कृतनिश्चय" असे म्हणून गीता जागृत करते व आलेल्या संघर्षासाठी सिद्ध करते. खरंतर ही गीता आज तरुणाला मुखोद्गत असावी निदान त्यातील विचार तरी माहिती असावे ही अपेक्षा आहे. आपल्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचे निराकरण करण्याचे सामर्थ्य गीतेत आहे. गीता त्यागभावना शिकवते. व्यक्तिने आयुष्यात यशस्वी होऊन आनंदी होण्यासाठी काय करायला हवे हे गीता आपल्याला शिकवते. अशी ही श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आपल्या सर्व समस्या सोडवून वैयक्तिक उन्नती साधत राष्ट्रकार्यासाठी सज्ज होत हे राष्ट्र अधिक बलशाली करण्यासाठी योगेश्वर श्रीकृष्णच आदर्श असायला हवे.
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment